Homeन्यूज अँड व्ह्यूजचमत्कार को नमस्कार!...

चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!

2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन आले होते. भय्यू महाराज भोंदू होते असे माझे अजिबात म्हणणे नाही. परंतु त्यांनी कॅप्टन खरातएवढा अतिरेक केला नाही. शेवटी चमत्कार दाखवल्याशिवाय कुणीही नमस्कार करत नाही. ठाकरे कुटुंबियांना काहीतरी त्यांनी चमत्कार दाखवला असेलच. त्यामुळेच ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे भक्त होते. तत्कालीन खासदार राजन विचारे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम असे अनेक शिवसेना नेते भय्यू महाराजांच्या संपर्कात असत, किंबहुना आश्रमात नियमित जात असत.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच त्यांनी देशभरातील संतांची जमवाजमव सुरू केली होती. या संताना एकसंघ ठेवण्यासाठी संत संमेलन असे व्यासपीठ तयार केले होते. या संत संमेलनात भय्यू महाराज यांना स्थान मिळावे यासाठी दस्तूरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी आग्रह धरला होता. मोहन भागवत हेसुद्धा भय्यू महाराजांचे निकटवर्तीय होते. त्यांनीही एकदा इंदूर येथील भय्यू महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान भय्यू महाराजांचे निस्सिम भक्त होते. भय्यू महाराजांनी सांगितलेली एक पूजा करण्यासाठी ते मुख्यमंत्री असताना आपला कोणताही ताफा न घेता पुणे जिल्ह्यातील एका प्राचीन मंदिरात आले होते. दत्त संप्रदायातील नवनाथ महाराजांचे भय्यू महाराज उपासक होते. तशी ते साधनाही करत. एवढ्या राजकारण्यांच्या जवळ असलेल्या भय्यू महाराज यांचा एंड कसा झाला हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

भय्यू

कॅप्टन अशोक खरात याचेही प्रस्थ बऱ्यापैकी वाढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी खरात यांच्या भक्तांची मांदियाळी आहे. दुसऱ्यांचे भविष्य सांगणारा खरात मात्र महिन्याभरात आपल्यासोबत काय होणार आहे हे जाणू शकला नाही. खरात यानेच निर्माण केलेल्या ट्रॅपमध्ये तो अडकला. शेवटी नियती कुणालाच सोडत नाही. खरात आपल्याला ब्लॅकमेल करणाऱ्या शिपायाची तक्रार करण्यासाठी गेला आणि तोच कसा एक्सपोज झाला याच्या कहाण्या आपण गेले काही दिवस टीव्ही तसेच इतर माध्यमांवर ऐकत, पाहत आहोत. कॅप्टन खरात यानेसुद्धा आपला चमत्कार अनेक राजकारण्यांना दाखवला होता. त्यामुळेच त्याच्याकडे राजकारण्यांची गर्दी वाढली होती. परदेशातील आफ्रिकन देशांमध्ये सोन्याच्या खाणी आढळतात. या देशांमध्ये व्यापारी मंडळी कॅप्टन खरात याला घेऊन जात. कॅप्टन खरात हा सोने कोठे सापडणार हे निश्चितपणे सांगत असे. त्यामुळे ही व्यापारी मंडळी खरातला नियमितपणे आफ्रिकेतील छोट्याछोट्या देशांमध्ये घेऊन जात असत.

खरातच्या भक्त रूपाली चाकणकर यांना पहिला प्रसाद मिळाला. खरातचे पाद्यपूजन केल्यामुळे हा प्रसाद मिळालाच, परंतु यामागे चाकणकर यांचे कर्तृत्वही त्याला कारणीभूत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अत्याचारीत महिलांची बाजू घेण्याऐवजी या बाई अत्याचार करणाऱ्या पुरुषांच्या पाठीशी उभ्या राहिल्याचे आपण दोन उदाहरणावरून पाहिले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबियांची बाजू या बाईंनी लावून धरली. त्याचबरोबर डॉ. संपदा मुंडे आत्महत्त्या प्रकरणात डॉक्टर संपदा यांच्या कुटुंबियांना मदत करण्याऐवजी संपदा यांचे कॅरेक्टर बिघडवण्याचे पाप या बाईंनी केले. त्याचा प्रसाद उशिरा का होईना त्यांना मिळाला.

भय्यू

राज्यातील राजकारण्यांना चमत्कार दाखवणाऱ्या कॅप्टन खरात याचे विकृत चाळे समोर आल्यानंतर सर्वपक्षीय राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यातील बारा मंत्री आणि विरोधी पक्षातील आमदार खरातच्या संपर्कात होते. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून मजबूत झाले आहेत. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून अनेक पुरावे गृह खात्याच्या हाती लागणार आहेत. या प्रकरणात एसआयटीची घोषणा गेल्या आठवड्यात झाली असली तरी गेले महिनाभर या प्रकरणातील तथ्य आणि पुरावे शोधण्याचे काम वरिष्ठ पातळीवर सुरू होते. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने हे सर्व पुरावे अर्थात त्यांच्या ताब्यात राहणार आहेत. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना विरोधी पक्षातील नेत्यांनाही सावधगिरीचा इशारा दिला आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्कः 9892514124)

Continue reading

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार...

ठाकरेंच्या ‘किचन कॅबिनेट’मध्येच होता अस्तनीतला निखारा!

सचिन अहिर ठाकरे कुटुंबियांना धडा शिकवून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेले. खरे म्हणजे सचिन अहिर यांचे राजकारण बारा वर्षांपूर्वी सुनील शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाने संपवले होते. सचिन अहिर राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोणाची सरशी?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणाऱ्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जूनला ही निवडणूक होत असून या निवडणुकांचा निकाल 22 जूनला लागेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे या निवडणुकाही लांबल्या आहेत. यापैकी नऊ आमदारांची मुदत 2022...
Skip to content