Homeटॉप स्टोरीमुंबईत मोफत लसीकरणाला...

मुंबईत मोफत लसीकरणाला तिलांजली!

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला असला तरी येत्या एक मेपासून या लसीकरणाला सुरूवात केली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचवेळी ही मोफत लस राज्य सरकारच्या शासकीय लसीकरण केंद्रांवरच दिली जाईल. खाजगी केंद्रांवर या लसी मोफत मिळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत तरूणांना मोफत लस मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत लसीकरणाचा कार्यक्रम मुंबई महापालिका राबवत असून मंगळवारीच मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी १८ ते ४४ वर्षे वयाच्या तरूणांचे लसीकरण फक्त खाजगी केंद्रांवरच करण्यात येईल, असे जाहीर केले होते. खाजगी केंद्रांवर होणारे लसीकरण विनामूल्य नसेल, असे टोपे यांनी स्पष्ट केल्यामुळे मुंबईत तरी तरूणांना लसीकरणासाठी पैसे मोजावे लागणार हे स्पष्ट झाले. राज्यातल्या इतर भागात लसीकरणाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जे काही निर्णय घेईल त्यावरच सरकारच्या या मोफत लसीकरणाचे प्रत्यक्ष स्वरूप अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

हा कार्यक्रम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. ज्येष्ठ मंत्र्यांची समिती १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन करणार असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई

१८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी डोसेस आवश्यक असून त्यासाठी ६५०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दर महिन्याला दोन कोटी लस देण्याची राज्याची क्षमता आहे. सध्या लसींची उपलब्धता नसल्याने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातल्या लसीकरणाला प्रारंभ होणार नाही. कोविन ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चिती करूनच लस घेता येईल. थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नसल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. ही केंद्रे कोरोना पसरविणारे ठरू नयेत यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन टोपे यांनी युवा वर्गाला केले.

सध्या जेथे लसीकरण सुरू आहे त्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील. राज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून प्रत्येकी  दिवसाला १०० डोस दिले तरी एका दिवसात १३ लाख लोकांचे लसीकरण होऊ शकते. सध्या लस वाया न जाऊ देण्याचे राज्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. राष्ट्रीय सरासरीच्या खूपच कमी असून योग्य प्रमाणात लस वापरणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचे श्रेय जाते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सध्या कोवॅक्सिन लस उपलब्धतेची टंचाई जाणवत असून ही लस बनविणाऱ्या कंपनीने सध्या १० लाख लस देण्याचे मान्य करतानाच जुलै, ऑगस्टमध्ये दरमहा २० लाख लस देऊ शकतो असे पत्र दिले आहे. कोविशिल्ड लस प्रति महिना १ कोटी डोस मिळू शकतात असे त्या कंपनीने तोंडी कळविले असून दोन्ही लसींच्या उपलब्धतेनुसार प्रमाण ठरवून त्या दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

रशियन लस स्पुटनिकबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येत आहे. ही लस योग्य दरात आणि प्रमाणात मिळाली तर त्याचाही  आंतर्भाव केला जाईल. ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या दोन कंपन्यांच्या लसीचा पुरवठा होऊ शकतो, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content