Homeमाय व्हॉईसध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना...

ध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना स्वप्नातले कारंजे दाखवायला??

“thousands have lived without love, not one without water” हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे माहीत असेल. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आता सर्वांनाच जाणवू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्याने ठाणे शहरातील नागरिकांवर मोठ्या पाणीकपातीचे संकट ओढवले होते. त्यातून महापालिका प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. परंतु ठाणेकर नागरिकांना पाणी मनस्ताप आता वारंवार होऊ लागला आहे आणि अजून सर्व उन्हाळा बाकी आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याने ठाणे महापालिकेच्या जल विभागाची झाडाझडती घेणे गरजेचे झाले आहे.

ठाणे शहराच्या अवाढव्य परिसराला पाणीपुरवठा करणे सोपे नाही हे आम्हीही जाणतो. सर्वांना पाणीपुरवठा करणे जमत नसेल तर जनतेला 24 तास पाणीपुरवठ्याची स्वप्ने महापालिका आणि बिल्डर मंडळी कशाच्या जोरावर दाखवतात? गेल्या महिन्यापासून बिल्डर मंडळींनी तर कमालच केलेली दिसते. प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आदी अनेक वर्तमानपत्रात स्वप्ननगरीच्या जाहिराती देऊन नागरिकांच्या डोक्याचे भजेच करत असतात. काय तर म्हणे 24 तास पाणी, पाण्याची कारंजी, तरण तलाव, त्या तलावाच्या बाजूला वॉटर स्पोर्ट्स आणि संकुलाच्या आत हिरो-हिरॉईन्सना रोमान्स करता येईल इतकी गर्द नाही परंतु पुरेशी झाडे! आदी.. काय वाट्टेल ते लपेटत असतात. आता नागरिकांना द्यायलाच पुरेसे पाणी उपलब्ध नाही. तर अशा जाहिरातींना प्रशासनानेच पायबंद घालायला नको का?? आणि या सर्व जाहिराती गुळगुळीत पानांवर रंगसंगतीत दणक्यात प्रसिद्ध झाल्यावर कोणाची बिशाद आहे, हे सर्व खोटे आहे म्हणण्याची??

पावसाळा संपत आला की पाणीपुरवठ्याबाबतचे वर्तमानपत्रांचे मथळेही चमकदार असतात. ‘पाणीपुरवठ्याची चिंता मिटली’, ‘यावर्षी ठाणेकरांची तहान भागणार’ ‘पुरेशा पाण्याने सरकारची चिंता मिटली’… वगैरे… एकदा का पाऊस संपला आणि नवरात्राचे वेध लागले की जल विभागाला विविध दुरुस्तीचे डोहाळे लागायला सुरुवात होते. कधी पाणीकपात तर बऱ्याच वेळा कमी दाबाचा पाणीपुरवठा. पाणीकपात झाली की कमी दाबाने पुरवठा हे त्याच्याबरोबर येतेच. हा कमी दाबाचा पुरवठा सुमारे चार-पाच दिवस तरी पिच्छा सोडत नाही. अशी पाणीकपात महिन्यातून दोन-तीनदा तरी होतेच. म्हणजे एकूण 15/20 दिवस पाण्याच्या नावाने नागरिक बोंबा मारत असतात. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या ठाणे शहराला हे शोभणारे आहे का? प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याचा विचार केला असता तर नागरिकांना पाणीटंचाईला सामोरेच जावे लागले नसते. शिवाय साकेत परिसरात पाईप लाईन्सखाली टँकरचीही गर्दी पाहवयास मिळाली नसती.

अलीकडच्याच वर्तमानपत्रात वाचले की महापालिका प्रशासन ध्यानधारणा केंद्र स्थापन करणार आहे. का तर म्हणे ठाणेकरांची मनःशांती प्रशासनाला महत्त्वाची वाटते. ध्यानधारणा केंद्राचा प्रस्ताव टोपलीत टाकण्याच्या लायकीचाच आहे. ठाणेकरांची मनःशांती इतकी महत्त्वाची वाटते तर प्रथम शहराचा पाणीपुरवठा सुधारा, रस्त्यांची सुधारणा करा, टी एम टी बससेवा सुधारा, कचरा नीट उचला, जागोजागी उभारलेली गॅरेजेस हलवा, रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवा.. जनतेच्या मनःशांतीसाठी अशा अनेक गोष्टी पालिका करू शकते.

काही महिन्यांपूर्वी आयुक्त म्हणाले होते की, शहरातील धूळ कमी केली पाहिजे. बरोबर आहे. पण प्रथम महापालिका मुख्यालयातील तळघरात किती मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे ते पाहून घ्या. तळघरच काय? पण, मुख्यालयाच्या इमारतीचीच रया गेल्यासारखी दिसत आहे. तुम्ही म्हणाल काय लिहिता, असे कुठे असते का?

“लिखा लिखि की बात नही|

मै कहता आखन देखी||” (कबीर जी)

आता सध्या प्रशासनाच्या कामात रोज हस्तक्षेप करायला लोकप्रतिनिधी नाहीत. तेव्हा संधीचा फायदा घेऊन प्रशासन लोकाभिमुख करा इतकेच सांगणे. नाहीतर..

“आपलेच खाऊन आपल्याच बसतात बोकांडी

जीआरचा पायखुट घातलेले लाल बैलही 

कधीच सोडवत नाहीत आपली मान

तथाकथित लोकसेवक गेंड्यांच्या जाचातून

आता आपणच यांना अश्व लावूया लोकहो…”

अशी अवस्था झाल्यास सावरायला कोणीच येणार नाही!!

Continue reading

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...

‘य. दि.’ स्मरणाच्या निमित्ताने दिसली मुणगेकरांची वैचारिक दिवाळखोरी!

यशवंत दिनकर फडके उर्फ य. दि. यांचा पहिला एन्काऊंटर सुमारे 50 वर्षांपूर्वी चर्चगेटजवळील केसी महाविद्यालयात 'बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालीझम'च्या वर्गात झाला. त्यांचा विषय अर्थातच राजकारण, खास करून महाराष्ट्रातील राजकारण असा होता. काही काळानेच पत्रकारितेत रीतसर प्रवेश झाल्यावर मात्र विविध...

घाटकोपर पूर्व चकचकित तर, पश्चिम ओंगळवाणे!

मुंबई महापालिका असो, मध्य रेल्वे असो, मेट्रो असो वा अगदी मुंबई प्राधिकरण असो. या सर्व सरकारी यंत्रणानी घाटकोपर स्थानकाच्या पश्चिम परिसरावर धडधडीत अन्याय केल्याचे दोन दिवसांच्या पाहणीत आढळून आले. पूर्वी पूर्व भाग अगदी चिंचोळा होता. तेव्हापासून त्या भागात जाणे...
Skip to content