Sunday, April 27, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजभारत पुन्हा "चॅम्पियन"!

भारत पुन्हा “चॅम्पियन”!

मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसीच्या “चॅम्पियन्स चषक” क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाने जेतेपदावर विजयाची पुन्हा एकदा मोहोर उमटवली. चॅम्पियन स्पर्धेतील हे भारताचे विक्रमी तिसरे विजेतेपद होते. याअगोदर भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली होती. आता तिसरे विक्रमी जेतेपद पटकावून भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. गेल्या दोन वर्षांत आयसीसी स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी निश्चितच लक्षवेधक आहे. २०२३च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली होती. परंतु ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाल्यामुळे तेव्हा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा जेतेपदाला गवसणी घातली होती.

यंदाच्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या खेळातील जाणकारांनी आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतालाच जेतेपदाची पहिली पसंती दिली होती. भारतीय संघाने या स्पर्धेत शानदार खेळ करून रुबाबात विजेतेपद पटकावून क्रिकेटमधील या जाणकारांचा अंदाज सार्थ ठरवला. खेळाच्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन प्रमुख अंगात भारतीय संघाने सरस प्रदर्शन करुन निर्णायक लढत जिंकली. या स्पर्धेत चॅम्पियनला साजेसा खेळ भारताने केला. त्यामुळे भारतच या स्पर्धेचा जेतेपदाचा दावेदार होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणारा भारत हा एकमेव संघ होता. तसेच भारताने आपले बहुतेक सर्व सामने सहज जिंकले. दुबईतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना सहाय्य करते हेच ध्यानात ठेवून भारताने या स्पर्धेसाठी तब्बल ५ फिरकी गोलंदाज आपल्या संघात घेतले होते. भारतीय संघाची ही रणनीती चांगलीच यशस्वी ठरली. बहुतेक सर्व सामन्यात ४ फिरकी गोलंदाज भारतीय संघाने खेळवले. भारताची ही चालदेखील यशस्वी ठरली. या ४ भारतीय फिरकी गोलंदाजांनी तब्बल २६ बळी घेऊन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. युवा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने या स्पर्धेत पदार्पण करताना आपल्या गोलंदाजीची सुरेख जादू पेश केली. त्याने तब्बल ९ बळी घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची गोलंदाजी खेळणे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना काहीसे जड जात होते. हेच चित्र वारंवार बऱ्याच सामन्यात बघायला मिळाले.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकला. बऱ्याच मोठ्या अवधीनंतर भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या महमद शमीने सुरेख मारा करून बुमराहची उणीव जाणवू दिली नाही. काही सामन्यांत शमीच एकमेव वेगवान गोलंदाज भारतीय संघात होता. भारताचा हा विजय सांघिक वृत्तीचा होता. संघातील प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी चोख पार पाडली. रोहित शर्माने कुशल नेतृत्त्व करून संघात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला. तसेच सातत्याने खेळाडूंमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण केली. भारतीय संघ अडचणीत असताना कधी फलंदाजांनी तर कधी गोलंदाजांनी सुरेख खेळ करुन भारतीय संघाची नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. कर्णधार रोहित, विराट, गिल, अय्यर, राहुल यांनी आपल्या शैलीदार फलंदाजीची छान झलक पेश केली. निर्णायक न्युझिलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावूनदेखील न्युझिलंडवर बाजी उलटविण्यात यश मिळविले. तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा हे दोन संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले होते. यावेळी मात्र भारताने ४ गडी राखून ही लढत जिंकून आपल्या मागील पराभवाची परतफेड केली. तसेच यंदाच्या या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा न्युझिलंडला नमविण्याचा पराक्रम केला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझिलंडने द. आफ्रिकेचा ५० धावांनी दणदणीत पराभव केला होता. या लढतीत न्युझिलंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३६२ धावा अशी विक्रमी धावसंख्या रचली होती. सलामीवीर रविंद्र आणि माजी कर्णधार विल्यमसन यांनी दमदार शतके ठोकली होती. त्यामुळे भारताविरुद्धची अंतिम लढत जोरदार होईल अशी अपेक्षा होती. परंतु गटातील साखळी सामन्यात भारतीय फिरकी माऱ्यासमोर न्युझिलंडची फलंदाजी लडखडली होती. निर्णायक लढतीतदेखील तेच चित्र पुन्हा बघायला मिळाले. भारतीय फिरकी माऱ्यासमोर न्युझिलंडला जेमतेम २५० धावांचा टप्पा गाठता आला. तेथेच भारताने अर्धी बाजी मारली. कर्णधार रोहितने ७६ धावांची धमाकेदार खेळी करुन भारतीय विजयाचा पाया रचला. त्याने गिलसोबत शतकी भागिदारी करून भारताला जोरदार सलामी करुन दिली. गिलने ३१, अय्यरने ४८, पटेलने २९, राहुलने नाबाद ३४ धावा करुन भारताचा विजय निश्चित केला. सामनावीर म्हणून रोहित शर्माचीच निवड करण्यात आली. स्पर्धेतील रोहितचे हे पहिलेच अर्धशतक होते. पण ते त्यांनी निर्णायक लढतीत केल्यामुळे त्या खेळीचे मोल खूपच जास्त आहे.

भारताने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी आणि ११ चेंडू राखून सहज पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने आपल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीतील झालेल्या पराभवाचा बदला घेलला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २६४ धावात रोखले. मग विराट कोहलीने ८४ धावांची झकास खेळी करुन भारतीय विजयाची दारे उघडली. त्याला अय्यर ४५, पटेल २७, राहूल नाबाद ४२, पंड्या २८ धावा करुन यांनी चिवट फलंदाजी करुन भारतीय विजय निश्चित केला. या पराभवामुळे सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगले. भारताने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झाली. आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वन डे विश्वचषक स्पर्धा, टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धा या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान रोहित शर्माला मिळाला. तो क्रिकेटविश्वातील हा मान मिळवणारा पहिला कर्णधार ठरला. फिरकी गोलंदाज अक्सर पटेलला ५व्या क्रमांकावर आणि के. एल. राहुलला ६व्या क्रमांकावर खेळवण्याची भारताची रणनीती यशस्वी ठरली. या दोघांनी झकास फलंदाजी करुन आपल्याला दिलेल्या क्रमांकाचे योग्य ते चीज केले.

भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरने आपल्या चिवट फलंदाजीची छान झलक पेश केली. त्याने या स्पर्धेत २४३ धावा केल्या. न्युझिलंडच्या रविंद्रननंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा अय्यर दुसरा फलंदाज होता. भविष्यात त्याला आपल्या छोट्या खेळींचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यासाठी अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण बऱ्याचदा अर्धशतक झाल्यानंतर तो तंबूत परतल्याचे चित्र बघायला मिळत होते. बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. परंतु यजमानांची कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यांना एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच तेथील क्रिकेटप्रेमींनी सामन्यांकडे पाठ फिरवली. बन्याच सामन्यात स्टेडियम अर्धे रिकामेच होते. गटातच बाद होण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडूनदेखील त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा डाव २४१ धावांतच आटोपला. भारताने २४२ धावांचे विजयी लक्ष ४३व्या षटकात अवघे ४ गडी गमावून सहज पार केले. माजी कर्णधार विराटने नाबाद शतकी खेळी केली तर अय्यरने अर्धशतकी खेळी करुन त्याला चांगली साथ दिली.

पाकिस्तानचा शेजारी देश असलेला बांगलादेशची कामगिरीदेखील सुमारच झाली. त्यांनाही गटातच आपला गाशा गुंडाळावा लागला. यंदा या स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या अफगाणिस्तानने बलाढ्य इंग्लंडचा अटीतटीच्या लढतीत ८ धावांनी पराभव करुन स्पर्धेत सर्वात धक्कादायक विजयाची नोंद केली. इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांनी ३२५ धावांची मोठी मजल मारली. सलामीवीर झारदानने १७७ धावांची जबरदस्त खेळी केल्यामुळे अफगाणिस्तानला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडचा माजी कर्णधार रुटने झुंजार शतकी खेळी करून विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे त्याचे प्रयत्न वाया गेले. अफगाणिस्तानच्या ओमरझायीने ५ बळी घेऊन इंग्लंडला विजयापासून रोखले. इंग्लंड संघाची या स्पर्धेतील कामगिरीदेखील निराशाजनक झाली. त्यांनादेखील एकही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे गटालच बाद होण्याची नामुष्की गत यजमान असलेल्या इंग्लंडवर आली. त्यांच्या प्रमुख खेळाडूंनी निराशा केल्यामुळेच त्यांना गुणांचे खाते उघडता आले नाही. अफगाणिस्तानने या गटात विजय मिळविल्यामुळे या गटातून उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी सर्वच संघात चुरस बघायला मिळाली. परंतु शेवटी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने आपले शेवटचे सामने जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

भारताने जरी ही स्पर्धा जिंकली असली तरी भविष्यात क्षेत्ररक्षणात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. या स्पर्धेतील भारताची क्षेत्ररक्षणाची कामगिरी अत्यंत सुमार होती. तब्बल ९ झेल भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले. अंतिम सामन्यात तर तब्बल ४ झेल भारतीय क्षेत्ररक्षकांना घेता आले नाहीत. सुदैवाने नशिब बलवत्तर असल्यामुळे हे झेल भारताला महागात पडले नाहीत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आता चाळीशीकडे झुकू लागले आहेत. भविष्याच्या दृष्टीने संघबांधणीचा विचार केला तर त्यांना आणखी किती काळ संधी द्यायची याचा विचार निवड समितीने गांभिर्याने करायला हवा. २०२७मध्ये पुढची वनडे विश्वचषक स्पर्धा द. आफ्रिकेत होणार आहे. त्यासाठी संघबांधणी आतापासूनच सुरु करायला हवी. चांगले खेळाडू लगेचच तयार होत नाहीत. ते तयार व्हायला किमान २-३ वर्षांचा वेळ जातो, हेदेखील निवड समिती सदस्यांनी ध्यानात ठेवायला हवे. दुबईत झालेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कोणीच पदाधिकारी उपस्थित नव्हते. ही गोष्ट मात्र निश्चितच खटकणारी होती. चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा जिंकून भारताने वन डे सामन्यातील आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, असेच म्हणावे लागेल.

Continue reading

आयपीएलचे वैभव!

यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान संघाचा सर्वात तरुण डावखुरा फटकेबाज फलंदाज १४ वर्षं आणि २३ दिवसांचा असलेल्या वैभव सुर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २० चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार मारुन ३४ धावांची धमाकेदार खेळी करुन साऱ्या भारतीय...

प्रशिक्षक म्हणून दिसणार का टेबल टेनिसपटू शरथ कमल?

तब्बल २२ वर्षे भारतीय टेबल टेनिसची सेवा केल्यानंतर ४२ वर्षीय शरथ कमलने अखेर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नुकताच विराम दिला. आपल्या चमकदार खेळाचा ठसा उमटवणाऱ्या शरथने या खेळात यशाची अनेक नवनवी शिखरे सर केली. त्यामुळे भारताचा तो आतापर्यंतचा सर्वोत्तम टेबल...

बिकट आहे वाटचाल ब्राझील फुटबॉल संघाची!

एका जमान्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्राझील फुटबॉल संघाची सध्या मात्र काहीशी बिकट वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाप्रमाणेच ब्राझील फुटबॉल संघाचीदेखील परिस्थिती गेल्या काही वर्षांत अत्यंत खराब झाली आहे. विक्रमी ५ वेळा मानाची विश्वचषक...
Skip to content