Homeमाय व्हॉईसचला काकू चला.....

चला काकू चला.. वाईन रामायण होतेय सुपरफाईन!

“प्रचारावाचोन हालो नये,

प्रचारावाचोन चालो नये,

प्रचारावाचोन बोलो नये, 

इहलोकी कदापि”

या पाडगावकर यांच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेले ‘वाईन रामायण’.. मोठ्या सुपर मार्केट्समध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने निर्णय काय घेतला, राज्यात वाईन रामायणच सुरू झाले. राज्यातील विरोधी पक्षाने हे राज्य मद्यराष्ट्र करण्याचा चंग शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आघाडी सरकारने बांधला असल्याचा आरोप केला. त्यानंतर शेजारच्या भाजपाशासित मध्य प्रदेशमध्ये दारूबाबत काय धोरण आहे, असे तेथील पत्रकार मित्रांना विचारले असता त्या सर्वांनी बॉम्बच फोडले. त्यापैकी एक बॉम्ब मीही येथेच फोडला. त्यावर अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी हे खरे आहे का? अशी विचारणा केली. आज या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता आणखी मोठा बॉम्ब फुटला!!

तो बॉम्ब म्हणजे मध्य प्रदेश सरकारने चक्क 20 टक्क्याने दारू स्वस्त केली आहे. आता आहे की नाही हा मोठा बॉम्ब. दारू 20 टक्के स्वस्त करून ते सरकार थांबलेले नाही. महाराष्ट्र सरकारने तर सुपर मार्केट्समध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी दिली आहे तर मुख्यमंत्री मामांनी सुपर मार्केट्समध्ये दारू विक्रीला ठेवण्याचे योजले आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर, भोपाळ, जबलपूर आणि ग्वालीयर या मोठ्या शहरांतील सुपर मार्केट्समध्ये दारू ठेवण्याविषयी सकारात्मक धोरण स्वीकारले आहे. तसेच ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा एक कोटी आहे त्यांना घरात बार निर्माण करण्याची परवानगी फक्त 50 हजार रुपयांच्या शुल्कात मिळणार आहे. शिवाय सामान्य माणूस घरात बियरच्या 24 बाटल्या वा टिन्स तसेच 10 दारूच्या बाटल्या ठेवू शकतो, असे जाहीर करून दारू आणि पाणी, सर्वांना एकाच पातळीवर आणले आहे (समान भावनेचा विजय असो..).

सध्या मध्य प्रदेशात देशी दारूची 2544 दुकाने आहेत तर विदेशी दारू देणारी 1061 दुकाने आहेत. या दुकानांच्या संख्येत भरीव वाढ करण्याचा मानस अबकारी खात्याने व्यक्त केला आहे. यासंबंधात मायाळू मामांवर अबकारी खात्याने विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात सेवन करण्यात येत असलेल्या देशी, विशेषतः महुआच्या दारूला प्रोत्साहन देण्याचा इरादाही काही अबकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यादरम्यान एक विलक्षण माहिती हाती आली. ती अशी की- गुजरातमध्ये दारूबंदी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु याच गुजरातमध्ये चोरटी दारू मोठ्या प्रमाणात मिळते हेही सर्वांना ठाऊक आहे. गुजरातला पुरवण्यात येणाऱ्या चोरट्या दारूपैकी 70 टक्के दारू मध्य प्रदेशातून जात असते अशी कुजबुजही कानावर आली..

“पेटता घरे पेटवावी विडी

प्रत्येक माणूस मानावी शिडी,

शिडीवरून मारावी उडी

खुर्चीवर सत्तेच्या”

हे मंगुअण्णा म्हणतात तेच खरे!!

1 COMMENT

  1. पूर्वी लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईचा आधार घेत, आता कोरडा घसा ओला होत रहावा म्हणून तमाम दारूप्रेमी मुंबईकरांनी मध्यप्रदेशात शिफ्ट होऊन मुंबईवरचे लोकसंख्येचे ओझे कमी करावे हेच सुचवताय ना काळे!!

Comments are closed.

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content