“मुकी बिचारी कुणीही आणि ‘कशीही’ हाका…” मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता, हे जनता अजून विसरलेली नाही. जनतेची काळजी आम्हालाच आहे, अशा आविर्भावात सर्व आंदोलने सुरु हॊती. अखेर सर्वसमंतीने पूल पाडून नवे बांधकाम सुरु करण्याबाबत एकमत झाले. मात्र, पूल पाडल्यानंतर शीव रेल्वेस्थानकात उतरणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या हालाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी ‘अर्थपूर्ण मौन’ स्वीकारल्याचे दिसत आहे.

काही कामानिमित्त दोन दिवस शीव येथे जावे लागले. पूर्वेकडे जाताना कसरत करावी लागत आहे. नवीन पूल होणार आहे म्हणून जनता हेही सहन करत आहे. परंतु या महानगरातील रेल्वेसकट सर्व यंत्रणा जनतेची जीवघेणी परीक्षाच घेत असल्याचा संतापजनक अनुभव यावेळेस आला! जेमतेम दोन फूट रुंद असलेल्या जागेतून प्रवाशांनी मार्ग कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी एकदोनदा करूनच दाखवावे असे माझे आव्हान आहे! एका पालकमत्र्यांना तर या दोन फुटाच्या रस्त्यावरून सरळ रेषेत चालताच येणार नाही, याबाबत मी बेट लावायला तयार आहे.
या अरुंद पायवाटेत खाचखळगे नसते तर आश्चर्य वाटले असते. तेही बरोबर घेऊन नोकरदार मंडळींना कामावर जावे लागत आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुमारे तीन वर्षेतरी चालणारच. मग तीन वर्षे जनतेनेही हे हाल स्वीकारायचे का? शहर नियोजन करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे, हेही मुंबईकरांना कळायला हवे. नाही का? पूल पाडण्याआधी आम्हीच जनतेचे कैवारी असे दाखवणारे लोकप्रतिनिधी आता कुठे बरे ‘गायब’ झाले? पावसाळी पिकनिकला तर गेले नाहीत ना!
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
अगदी बरोबर! निगरगट्ट राजकारणी! आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दाखवायला जागे होतील.