देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले पण त्यांनी राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चार वेळा जात आहेत. पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे. बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर, या एकाच विषयावर बोलतात. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांवर पंतप्रधान का बोलत नाहीत?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी विचारला आहे. राम मंदीर उद्घटनाच्या इव्हेंटमधून लहर निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. पण त्यात त्यांना यश आले नाही, असेही ते म्हणाले.
प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठकीवेळी भिवंडी येथे रमेश चेन्नीथला प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाची पूजा करतात. आम्हीही रामभक्त आहोत. राम मंदिराला काँग्रेसने कधीच विरोध केलेला नाही. परंतु प्रभू श्रीरामाच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याला आमचा विरोध आहे. जे काम शंकरार्यांनी करायचे ते काम पंतप्रधान मोदी करत आहेत. अयोध्येतील संपूर्ण कार्यक्रमात प्रभू रामापेक्षा जास्त फोकस फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा देशाच्या धर्मनिरपेक्षतेला तोडण्याचे काम करत आहेत. त्याला आमचा विरोध असून देशहितासाठी व देशाच्या विकासासाठी केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे.
खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. याआधी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किमीची यात्रा काढली. पण कोणत्याच राज्यात यात्रेमध्ये अडथळे निर्माण केले गेले नाहीत. परंतु आसाममधील भाजपा सरकार भारत जोडो न्याय यात्रेत जाणीवपूर्वक अडथळे आणत आहे. आसामचे लोक हजारोंच्या संख्येने न्याय यात्रेत सहभागी होत, राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, हे राहुल गांधींचे विधान बरोबर आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
आ. रोहित पवारांवरील ईडी कारवाई राजकीय..
भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी ईडीचा गैरवापर करत आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अशाच पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरील ईडी कारावाईही राजकीय हेतूने प्रेरित आहे. देशभरात भाजपाच्या एकाही नेत्यांवर ईडी, सीबीआयची कारवाई झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्ष ईडी व सीबीआयच्या मदतीने सरकार चालवत जात आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
याावेळी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अनिस अहमद, AICCचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरगे, सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.