Homeमाय व्हॉईस‘मातोश्री’तल्या 'कान'खोज्यांना आतातरी...

‘मातोश्री’तल्या ‘कान’खोज्यांना आतातरी नारळ द्या!!

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय नाट्यावर एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव प्रचंड बहुमताने जिंकल्याने आता जवळजवळ पडदा पडल्यातच जमा आहे. कारण, आता ही लढाई न्यायालयात लढली जाणार असून न्यायालयीन लढाईत काय होईल हे आताच सांगता येणे कठीण आहे. मात्र अशा प्रकारच्या लढाया दीर्घ काळ लढल्या जातात. शेवटी हाती काहीच लागत नाही. पक्षात पडलेली फूट मान्य केली जाते. मात्र, मूळ पक्षाचे राजकीय चिन्ह मात्र गोठवले जाते व दोन्ही गट आपापल्या आवडीचे निवडणूक चिन्ह निवडतात आणि निवडणूक लढवतात, असाच इतिहास या देशात आहे. त्यामुळे यापलिकडचे काही होईल, असे सूतराम वाटत नाही.

यानिमित्ताने शिवसेनेतील कारभार कसा चालत असावा हे पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे आणि ते काही फारसे सुखावह नाहीं, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. आपल्या पक्षातील थोडेथोडके नाहीत तर तब्बल ४० आमदार बंडखोर नेता तुमच्या नाकाखालून परराज्यात घेऊन जातो. तेथून तो आणखी दुसऱ्या राज्यात जातो हे खरोखरच लाजिरवाणे आहे. त्यातच कडेकोट बंदोबस्तासाठी ज्या राजकीय पक्षाचे नाव घेतले जाते तेथे असे होणे म्हणजे…..!  आणि आश्चर्य असे की, आता प्रत्येकजण म्हणत आहे की आम्हाला असे काहीतरी होईल याची कल्पना होती.

शिवसेनेला बंडखोरी काही नवीन नाहीं. अगदी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही बंड केले आणि ते दुसऱ्या राजकीय पक्षात गेले. परंतु तिघांबरोबर गेलेल्यांची संख्या कमी होती. शिवाय महत्त्वाचा फरक हा आहे की तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. विरोधी पक्षात होती. सत्तेत असताना विरोधी पक्षाशी संधान बांधून मुख्यमंत्रीपदाची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून घेणारे एकनाथ एकमेव ठरावे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली तेव्हा आम्ही त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे आहे, असे म्हटले होते. त्यांच्या दुर्दैवाने लगेचच कोरोनाची साथ सुरू झाली ती दोन वर्षे होती. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यातच ठाकरे यांच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दोन्ही कारणांमुळे त्यांचा कार्यकर्त्यांशी तसेच जनतेशी संपर्क तुटला. बाकी सर्व आपण जाणताच.

विधानसभेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना जणू मोकळी वाटच करुन दिली म्हणा ना! महविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर आपल्याला पद्धतशीरपणे डावलण्यात आले. आपल्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे खोटेच सांगण्यात आले, असा जोरदार आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेना, भारतीय जनता  पार्टीच्या सत्तेच्या काळात भाजपा आपल्याला उपमुख्यमंत्रीपद देत होते. तेही पक्षनेतृत्त्वाने नाकारले, असा घणाघात केला. तरीही मी शांत राहिलो. कारण सत्तेत रमणारा माणूस मी नाही. मला शिवसैनिक प्यारा आहे, असे त्यांनी सांगितले.

मातोश्री

कोरोनाचे निर्बंध काहीसे सैल झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री जनता आणि शिवसैनिकांना भेटत नाहीत, अशा तक्रारी असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाचा भार असल्याने सर्वांना भेटणे अशक्य असते हे आम्हालाही माहीत आहे. तर मग त्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. ठाकरे यांना भेटायचे असेल तर देसाई, नार्वेकर आणि परब यांच्या चाळणीतून जावे लागत असल्याची माहिती कानावर येत होती. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून संघटनेकडेही नेतृत्त्वाचे म्हणावे तसे लक्ष नसल्याची कुरबुर शिवसैनिकांत होती.

लालबाग, परळ, गिरगाव, अंधेरी, गोरेगाव तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी अनेक भागात विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख दहा-दहा वर्षे बदललेच जात नाहीत. नवीन तरुणांना संघटनेत वावच नाही, अशी खंत अनेकांनी माझ्याजवळ व्यक्त केलेली आहे. लालबाग, परळ, मांडवी आदी शाखांमध्ये गैरव्यवहार चालतात, असे दबक्या आवाजात बोलले जाते. दोन-चार जणांनी तर रुग्णवाहिकेचेही सौदे केल्याचे समजते. ही यादी बरीच लांबवता येईल. पण आवरते घेतो. गेल्या चार-पाच दिवसांत शिवसेना भवनात पक्षासाठी जशा बैठका घेण्यात आल्या त्याची सुरुवात याआधीच करायला हवी होती. एकटा पक्षप्रमुख किंवा मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही. यासाठी एक टीम असायला हवी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात जसे अष्टप्रधान मंडल होते त्याचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ आली आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. तसेच युवा सेनेच्या एक दोन नेत्यांना कानपिचक्या देण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे. युवा सेनेच्या एका चमको नेत्याने तर मंत्रालयात सचिवांच्या बैठकीत हजेरी लावली होती. अखेर सचिवांनी लक्षात आणून देताच या नेत्याला चरफडत बाहेर जावे लागले होते. हा चमको युवा नेता साधं बोलण्यातही बरीच अरेरावी करत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सत्ता गेली म्हणून याचे पाढे वाचत नाही. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जे सौजन्य आहे त्याचा थोडातरी अंश मातोश्रीत वावरणाऱ्यांच्या अंगी असावा, अशी अपेक्षा चुकीची ठरेल काय?

शिवसेना पुन्हा वाढावी असे वाटत असेल तर काही ज्येष्ठ नेत्यांनाही मातोश्रीची दारे खुली करायला हवीत. सगळ्यांची नावे घेणे इष्ट नाही. पण दिवाकर रावते, दगडू दादा, विनोद घोसाळकर, सचिन अहिर आदी अनेकांना काहीतरी जबाबदारी देऊन त्यांच्यावर विश्वास टाकायला हवा.

शिवसेना पुन्हा उभी राहू शकते.. 

” या तुमच्या दैवतांचे मी ही धरले होते पाय,

मी ही होत्या ओवळल्या आरत्या आशाळभूत भक्तीने,

चौतीस वर्षे पडले नव्हते माझे ही दुधाचे दात, 

नव्हती एकही अक्कलदाढ माझ्याही भाबड्या जबड्यात” (मंगेश पाडगावकर)

अशीच अवस्था सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते, याचे भान जरी नेत्यांनी ठेवले तरी बरेच होईल!

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content