Homeमाय व्हॉईसआतातरी ठाण्याचे आयुक्त...

आतातरी ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांचे कौतुक करा ना!

मी सातत्याने ठाणे रेल्वेस्थानकाच्या बजबजपुरीबद्द्ल लिहिलेले आहे, हे वाचकांना आठवत असेलच. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी गोतावळा न घेता रेल्वेस्थानक परिसराची पाहणी करावी, असे आवाहनही मी केलेले होते. गेली अनेक वर्षं या स्थानकाला फेरीवाल्यांच्या समस्येने ग्रासलेले होते. रेल्वेस्थानकात जायचे म्हणजे हजारो फेरीवाल्यांच्या अडथळ्यास तोंड देत स्थानक गाठायचे म्हणजे चाकरमान्यांची ही अडथळ्याची शर्यतच होती जणू! परंतु आयुक्त बांगर यांनी पुढाकार घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना बरोबर घेऊन काही कठोर उपाय योजलेत. त्याचे ठाणेकरांनी स्वागतच करायला हवे.

मला स्थानकपरिसर मोकळा झाल्याचे आधीच कळले होते. परंतु माझ्या मनात शंका होती की तीन-चार दिवस हा चमत्कार दिसेल आणि नंतर पुन्हा पाढे पंचावन्न!! पण मला सांगायला आनंद होतोय की, गेल्या १५/२० दिवसांपासून कधी नव्हे ते ठाणे रेल्वेस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतलेला दिसतोय. मी एका रविवारीही स्थानक परिसरात फेरफटका मारून आलेलो आहे. अगदी दीड-दोन तास मनमुराद फिरलो आहे. कारण इतके मोकळे स्थानक पाहायची मला सवयच नव्हती. नोकरशहाने एकदा का ठरवले की आजच्या जमान्यातही चमत्कार घडतात. तसेच “we shall save city problems by leaving the city itself” हे विधान निदान एका बाबतीत तरी मागे घ्यावे लागत असल्याची प्रांजळ कबुली मी देत आहे.

ठाणे शहरातील राजकीय नेते आणि इतर सामाजिक धुरीण तसेच विविध कामगार संघटनांनी हे शहर जणू वेठीला धरल्यासारखे वाटत असतानाच आयुक्तांनी हा सुखद धक्का दिल्याचे मान्य करायलाच हवे. मात्र हे सुख चिरकाल टिकावे अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आता  जबाबदारी ठाणेकर नागरिकांची तसेच इतर राजकीय नेत्यांचीही आहे. एक सूचना मात्र येथे अवश्य करेन. जसा फेरीवाल्यांचा त्रास कमी झालेला दिसतोय असाच दुसरा मोठा त्रास म्हणजे भिकारी आणि बेवारस लोकांचा… एक भिक्षेकरी महिला सतत रिक्षा थांब्यावर आपल्या पांगुळगाड्यासह रांगेतील प्रवशांचा अंत पाहात होती. तिचे दोन फोटो सार्वजनिक केल्यापासून आता ती महिला गेले काही दिवस दिसत नाहीय. पण आता एक भिक्षेकरी बाबा अवतीर्ण झाला आहे.

हा एकच नव्हे तर किमान ७५/८० भिकाऱ्यांचा वेढाच स्थानक परिसराला पडलेला असतो. या रिक्षाच्या थांब्यालाच लहान मुलाची एक झोळीही बांधलेली दिसेल. संतापजनक बाब म्हणजे या रिक्षाथांब्याच्या मागील बाजूस पोलिसांची एक गाडी २४ तासांसाठी उभी असते. दररोज तेच काम करून पोलीसदादा कंटाळत असतील हे मान्य. परंतु हे सर्व पोलीसदादा सदैव माना खाली घालून मोबाईल पाहण्यातच गर्क असतात. या गाडीच्या आसपासच किमान दहा भिकारी घुटमळत असतात. या पोलीस गाडीतील अधिकारी मात्र मला चार वर्षांत कधीच दिसलेला नाही.

आता थोडे भिकाऱ्यांबाबत. या भिकाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावत आहे. या भिकाऱ्यांना स्थानक परिसरात आणून सोडणारी व रात्री घेऊन जाणारी एक टोळी नक्की असणारच. अनेक बेवारस तर स्थानक परिसरातच ठाण मांडून बसलेले दिसतात. असाध्य रोगांनी ग्रासलेले भिकारीही अनेक दिसतात. पोलिसांनी या सर्वांना उचलून भिक्षेकरी सुधारगृहात डांबावे असे वाटते. परंतू तेथेही हे सर्व भिकारी ऐदूपणा सोडण्यास तयार नसतात, असे काही पोलिसांनी सांगितले. तसेच काही भिकारी या भिक्षेकरीगृहातून पळून जाणे पसंत करतात. “the mark of great city is not how its treat it’s special places everybody does the right but how its treat ordinary ones” हे जरी खरे असले तरी रेल्वेस्थानकात दररोज आपल्या रोजीरोटीसाठी जाणारी माणसे सर्वसामान्यच आहेत ना? मग अशा या सर्वसामान्यांसाठी आयुक्तांनी उचललेल्या पावलाचे ठाणेकर स्वागत कधी करणार?  की अजून मुहूर्त पाहताय? गूड जॉब आयुक्तसाहेब!!

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content