Homeकल्चर +आकाशवाणी संगीत संमेलनाला...

आकाशवाणी संगीत संमेलनाला पं. भीमसेन जोशींचे नाव!

आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येईल तसेच आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमात ते बोलत होते.  ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संगीतातील अखेरचा शब्द असलेल्या पंडित भीमसेन जोशींनी अनेक तानसेन बनवलेच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांना कानसेनदेखील बनवले. संगीतामध्ये जीवनाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. मोठमोठ्या मैफिली गाजवणारे पंडित भीमसेन जोशी मनाने अत्यंत कोमल होते आणि गरिबातल्या गरिबांसाठीदेखील त्यांनी आपल्या संगीताचा खजिना उपलब्ध करून दिला. परदेशातील मैफिलीमध्ये गाणारे पंडितजी पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या छोट्या मैफिलींमध्येदेखील अत्यंत उत्कटतेने आणि आत्मीयतेने गायचे अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितली.

अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न दिल्याच्या आठवणींनादेखील जावडेकर यांनी यावेळी उजाळा दिला. हा संगीताचा सर्वोच्च सन्मान असून अशा कलाकारांच्या सन्मानामुळे देशाची मान उंचावते असे ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी बोलताना आकाशवाणीने संगीताला घरोघरी नेल्याची आठवण करून दिली आणि दूरदर्शन नसतानादेखील संगीत प्रसारणाची धुरा आकाशवाणीने समर्थपणे सांभाळली असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी संगीताच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताचे व्याकरण शुद्ध ठेवूनदेखील ते लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम केले असे प्रतिपादन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘मोनोग्राम’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्या गायनाने समारंभाची शान वाढवली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप झाला. उद्या या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...
Skip to content