HomeArchiveसरकारला नको आहे,...

सरकारला नको आहे, बळीचं राज्य!

Details
“सरकारला नको आहे, बळीचं राज्य!”

    03-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी,  मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

vinodsalvi1@gmail.com

‘ईडा पीडा टळू दे, बळीचं राज्य येवू दे’ ही प्रार्थना देशातील अन्नदात्या शेतकर्‍यांसाठी वर्षांनुवर्षे सुरू आहे. तो चिखल-मातीत वर्षभर राबतो, खपतो म्हणून आपण सुखाचे चार घास खातो. पण, देशाच्या कोणत्या भागातील शेतकरी आज सुखी, समाधानी व संपन्न आहे, हे छातीठोकपणे, हात उंचावून कुणीही सांगावं. 2014 ला सत्तेत येण्याआधी मी शेतकर्‍यांच्या पेजेवर जगलो आहे. त्यामुळे आपले सरकार आल्यावर शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न निकाली लावू, हा थापा अँड कंपनीचा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर भलताच व्हायरल होतं आहे. अगदी दिल्लीच्या तख्यापर्यंत आपलं गार्‍हाणं मांडण्यासाठी पोहोचलेल्या देशभरातील 210 शेतकर्‍यांच्या संघटना व शेतकर्‍यांकडे मोदीसाहेब आणि त्यांच्या भाजपा सरकारने ढुंकणूनही पाहिले नाही. कदाचित परदेशी सहल कार्यक्रमांत गुंतल्याने पंतप्रधांनांच्या कानावर देशातील गरीब, कष्टकरी, श्रमिकांचा आवाज पोहोचला नसावा.

अगदी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत तो पोहोचणारही नाही. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट भाव एवढचं या शेतकर्‍यांचं हक्काचं मागणं होतं. डोईवर कपड्याचं गाठोड, थंडी-वारा, उन्हा-तान्हाची तमा न बाळगता देशाचा हा पोषणकर्ता दिल्लीवर धडकला. पण, केंद्रातील मोदी सरकार असो व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारचं शेतकरीप्रेम आपल्या देशातील 125 कोटी जनतेने याचि देही याचि डोळा चार वर्षांपासून पाहिले आहे. अगदी फडणवीस सरकारच्या विद्यमाने व मोदींच्या आदेशाने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना जाहीर झालेली कर्जमाफी, पॅकेज वगैरे किती जाहीर झाले व किती मिळाले हे आनंदी आनंदी झालेला शेतकरी दररोज खेडोपाड्यांतून सांगतच आहेत. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे इतकी संपन्नता आली की इथ एकही शेतकरी गेल्या साडेचार वर्षांत आत्महत्येच्या वाटेवर जात नाही. फक्त 17 एप्रिल 2018 रोजी काही वर्तमानपत्रांत कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील 696 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्याच्या एक वर्ष आधी 672 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.

उत्तर महाराष्ट्रात 101, विदर्भ 329, पश्चिम महाराष्ट्र 22, मराठवाडा 244 अशी या शेतकरी आत्महत्येची आकडेवारी होती. कर्ज काढणारे हे शेतकरी देश सोडून पळून जाण्याची भीती असल्याने जिल्हा व सहकारी बँका त्यांच्यामागे सक्तवसुलीसाठी तगादा लावतात. देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे हजारो कोटी विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे 420 घेवून पसार झाले तरी चालतील पण, प्रत्येक शेतकर्‍यांकडून सक्तीची कर्जवसुली झालीच पाहिजे. निसर्गाने अवकृपा दाखवून त्याचे पीक पाणी आले नाही तरी त्याची सुटका नाही, हे शेतकर्‍यांचं मानगुट आवळणारे सावकारी पाश पूर्वीप्रमाणे आजही आहेत. जगाचा अन्नदाता असलेलेल्या शेतकर्‍यांने कायम मागत राहावे, सरकार त्यांना आश्वासनांवर आश्वासने देत राहील. हे इथल्या बळीराजाच्या बाबतीत वर्षानुवर्षे चालत आलं आहे. आपला व्यवसाय शेती दाखवणारे व्हाईट कॉलर नेत्यांच्या शेतात मात्र सोन्याचे नांगर फिरत आहे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकी अशी कोणतीही संकटे त्यांना सतावत नाहीत. या शेतीतून त्यांनी करोडोची माया जमवल्याचे अनेकांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र सांगते. पण, वर्षानुवर्षे राब-राबणारा शेतकरी आजही जुन्याच संघर्षाचे गाणे गातो आहे. यंदा राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना व माणसांना हातभार लागेल. नाईलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ते भिकारी नाहीत.

त्यांना भिकार्‍यासारखी वागणूक देऊ नका, हे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आवाहन आपल्या देेशातील, राज्यातील शेतकर्‍यांची व्यथा, अवस्था मांडायला पुरेशी आहे. पोट फुटेस्तोवर खाऊ न गौराची धन करणारा एक कुबेरांचा, उच्च मध्यमवर्गीचा आणि माजलेल्यांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. त्याला गरिबांच्या डोळ्यांतील आसवे आणि कष्ट कधी दिसणार नाहीत. तो दगडाच्या देवाला दुग्धाभिषेक आणि त्याच्यापुढे पंचपक्वानाचे ताट वाढून ठेवेल. पण, हाडामासांच्या जिवंत माणसांत कधीच देव शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. धन ऊ तू चाललेले श्रीमंत मंदिर, देवळातील धनपेट्या वस्त्रे, अलंकार आणि पैशांनी भरून टाकतील. पण, गरीब, कष्टकर्‍याच्या हातावर दोन पैकं ठेवताना त्यांचा हात कायमच आखडता राहील. उद्योग वाढवणारे आपले उद्योगी सरकारही दगडाच्या काळजाचेे. त्यामुळे बळीराजा कितीही बेंबीच्या देठापासून कोकला तरी त्याचा आवाज सरकारच्या ऐकूनही न ऐकल्यासारखे करेल. हिरवं शिवारं फुलवून अनेकांची पोट भरणारा हा बळीराजा कधी लाल झेेंडा घेऊ न आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला तर त्याला नक्षली ठरवले जाते. हिरवा, निळा, पिवळा, भगवा अशा नाना रंगांत त्याला अडकवून ठेवलं जाईल. इथं बळीचं राज्य कधी येवूच नये, हा करारच जणू मूठभर संधीसाधूंनी केल्याची शंका का नाही यावी!”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content