HomeArchiveआहेरे वर्गातील भाजपा,...

आहेरे वर्गातील भाजपा, नाहीरे वर्गातील राहुल!

Details
“आहेरे वर्गातील भाजपा, नाहीरे वर्गातील राहुल!”

    20-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com

शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाहीत तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मंगळवारी दिल्यानंतर भाजपाची आणि मोदी यांची झोप उडाली असेल असे कुणीही वाटून घेऊ नये. कारण पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत एकही राज्य भाजपाकडे येऊ न देता उलट तीन राज्ये काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली खेचून घेतल्यावर भाजपाची आणि मोदी यांची झोप आधीच उडाली आहे. वक्तृत्त्वकुशल मोदी यांच्या देहबोलीवर पुरेशी झोप मिळत नसल्याची झाक दिसू लागली आहे. कल्याण आणि पुण्यातील कार्यक्रमांत बोलणारे मोदी कुणी बारकाईने निरखले असतील तर ही गोष्ट लगेच लक्षात आली असेल.

‘मोदींनी उद्योगपतींची कर्जे माफ केली पण, शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यासाठी मात्र गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्या सरकारने काहीही केलेले नाही. उलट आम्ही विधानसभा निवडणुकांत निवडून आलो तर १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता. मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये आम्ही कर्जमाफी लागूही केली. राजस्थानमध्येही लवकरच होईल’, असे राहुल यांचे म्हणणे आहे. राहुल यांच्याशी याआधी एकतर्फी वाटणारा मुकाबला आता भाजपाला आणि मोदी यांना तितकासा सोपा राहिलेला नाही. एका वेगळ्या अर्थाने राहुल आता ‘नाहीरे, वंचित’ वर्गाचे प्रतिनिधी व्हायला लागले आहेत. भाजपाकडे सगळे आहे, सत्ता आहे, पैसा आहे, उत्तम संघटनात्मक बांधणी आहे. मोदींसारखा प्रभावी, चाणाक्ष राजनीतीज्ञ नेता आहे. त्यांचा जनमानसावर आजही प्रभाव आहे. तंत्रकुशल आयटी टीम दिमतीला आहे. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे आहे रे वर्गात जाऊन बसला असतानाच काँग्रेस आणि राहुल मात्र, सत्ता नाही, पैशाचा ओघ आटलेला, उद्योजक, निवडणूक निधी पुरवठादार यांनी पाठ फिरवलेली, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ, नेत्यांमध्ये आजही काटाकाटीचे राजकारण, पक्षबांधणी विस्कळीत झालेली, भाजपावासी झालेले नेते-कार्यकर्ते अशा अडचणीच्या म्हणजेच नाही रे अशा प्रकारच्या वंचित वर्गाचे प्रतिनिधी झाले आहेत. अशा परिस्थितीत मोदी आणि राहुल निवडणूक प्रचारांत परस्परांना भिडले होते, तुटून पडले होते. शेतकरी, सर्वसामान्य, ग्रामीण भागातील जनतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल भाजपाची पिसे काढणाऱ्या राहुल यांची एकाकी वाटणारी लढत या राज्यांतील जनतेला कुठेतरी मानसिक स्तरावर आपलीशी वाटली असणार. हा माणूस आपली लढाई लढतोय, आपलेच गाऱ्हाणे मांडतोय, असे वाटलेल्या जनतेने मग वंचित काँग्रेसला जवळ केले असेल तर त्याला कारण ही सुक्ष्म मानसिक आंदोलनेही आहेत हे नक्की.

जनतेच्या मनाची नाडी आजवर पक्की धरून ठेवणाऱ्या मोदी यांना प्रचारातही हे जाणवले असावे. कदाचित काँग्रेसने प्रचाराचा असाच धडाका कायम ठेवला तर भाजपाच्या ताब्यातील महाराष्ट्र आणि इतर राज्यांनाही धोका होऊ शकतो हे या द्रष्ट्या नेत्याने जाणले असावे. यामुळेच निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रातील पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर टीका हा नेहमीचा एककलमी कार्यक्रम न करता घोषणांचाही धडाका लावला. काँग्रेसला चिमटे काढण्याची एकही संधी या नेत्याने सोडली नाही पण त्याचबरोबर नागरी भागातील विकासकामांबाबत भाजपाचे गेल्या साडेचार वर्षांतील प्रगतीपुस्तक फारच उत्तम आहे याचेही दाखले दिले. मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि दहिसर ते मीरा भाईंदर व पुणे मेट्रोचा तिसरा टप्पा याचे भूमिपूजन करताना त्यांनी ते बोलूनही दाखवले. सिडकोच्या घरांच्या योजनेचेही भूमिपूजन त्यांनी केले आणि सर्वांसाठी घरे या प्रकल्पासह मेट्रो मार्गांनी थेट पालघरपासून अलिबागपर्यंत सर्वत्र कनेक्टीव्हीटी देण्यासाठी २०३५ ही नवी मुदतही जाहीर करून टाकली. ग्रामीण भागात भाजपाविषयी नाराजी तीव्र रूप धारण करते आहे आणि त्याचवेळी नागरी भागातही घराघरांत महागाईने बजेट कोसळल्याने नाराजी वाढू लागली आहे. याची कल्पना भाजपाला आणि सरकारलाही आली आहे. नागरी भागात भाजपाच्या मतांचा टक्का नेहमीच चांगला राहिला आहे. हा नागरी मध्यमवर्गीय मतदारही दुरावला तर लोकसभेच्या मैदानात बाका प्रसंग येऊ शकतो हे मोदीही जाणतात. यामुळे मुंबईत त्यांनी जीएसटी अधिक सुटसुटीत होणार असून, जवळपास ९९ टक्के वस्तू १८ टक्के जीएसटीच्या परिघात असतील. त्यामुळे त्या स्वस्त होतील, असे सांगत या शहरी मतदारालाही चुचकारण्याचा प्रयत्न केला.

मोदी येथे निवडणूकपूर्व प्रचारात मग्न असताना तिकडे गुजरातमध्ये ६२५ कोटी रूपयांची वीजबील थकबाकी माफ करण्यात आली आहे. ओदिशात सत्ता मिळाल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची हमी भाजपानेच दिली आहे. मतदारांची नाराजी दूर कऱण्यासाठी अन्य काही उपाययोजनाही भाजपाशासित राज्यांत आणि केंद्र सरकारकडून जाहीर होऊ शकतात. निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपाने प्रचाराला सुरूवात केली आहे हाच याचा अर्थ आहे.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content