HomeArchiveगेस्ट हाऊसची थरारक...

गेस्ट हाऊसची थरारक कथा!

Details
गेस्ट हाऊसची थरारक कथा!

    17-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
उत्तर प्रदेशात अखिलेश सिंह आणि मायावती एकत्र आले आहेत. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने भारतीय जनता पार्टीविरोधात दंड थोपटण्याचे नाटक केले आहे. या गटबंधनातून त्यांनी काँग्रेसला पद्धतशीरपणे बाजूला ठेवले आहे. काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असतानाही या दोन प्रादेशिक पक्षांनी त्याला बाजूला सारले आहे. सारांश, भाजपाला अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासाठीच अखिलेश-मायावती ही युती झाली आहे. तथापि, गेली २४ वर्षे सपा आणि बसपा या दोन पक्षांमधून विस्तव जात नव्हता. असे काय घडले होते त्यांच्यात? त्यामागील गेस्ट हाऊसची थरारक कथा नमूद करण्यासारखी आहे.

दि. १ जून, १९९५ रोजी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव हे राज्यातील पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करीत होते. एवढ्यात एक सनदी अधिकारी अचानक तेथे आला. त्याने मुलायम सिंह यादव यांच्या हातात एक चिठ्ठी दिली. ती वाचून मुलायम सिंह दचकले. ते ताबडतोब आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले, ‘निवडणुकीच्या तयारीला लागा.’ असे काय होते त्या चिठ्ठीत? त्या चिठ्ठीत गुप्तचर विभागाचा छोटासा गोपनीय अहवाल होता. बहुजन समाज पार्टी सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे त्या चिठ्ठीत म्हटले होते. सरकार पडणार ही बातमी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत वाऱ्यासारखी पसरली. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीवरील रागदेखील वणव्यासारखा पसरला. परिणामी, दुसऱ्या दिवशी, म्हणजे दि. २ जून, १९९५ रोजी, घडू नये ते घडले. लखनऊ येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये कांशिराम आणि मायावती हे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसले होते. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे काही आमदार आणि जिल्हास्तरीय कार्यकर्ते तेथे जाऊन थडकले. त्यानंतर जे घडले ते इतिहासात ‘गेस्ट हाऊसची थरारक कथा’ म्हणून नोंदले गेले आहे.

समाजवादी पक्षाच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसला घेराव घातला. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मायावती यांनी स्वत:ला एका दालनात कोंडून घेतले. त्याचवेळी सपाच्या कार्यकर्त्यांनी बसपाच्या काही आमदारांना ताब्यात घेतले. हे आमदार बंडखोरी करून सपात दाखल झाले असल्याचे त्यांनी जाहीर केले. डझनभर सपा आमदारांच्या नेतृत्त्वाखाली सपाच्या सुमारे तीनशे सशस्त्र गुंडांनी गेस्ट हाऊसवर अक्षरश: हैदोस घातला. त्यांनी टेलिफोन कनेक्शन तोडले. बसपाच्या आमदारांना लाठ्या-काठ्यांनी झोडले. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांवर वर्तमानपत्रांतून जोरदार टीका झाली. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. राज्यपाल मोतीलाल व्होरा यांना सांगून दि. ३ जून रोजी त्यांनी मुलायम सिंह यादव यांचे सरकार बरखास्त केले. त्याचदिवशी सायंकाळी उशिरा मायावती यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपा आणि जनता दल यांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार स्थापन केले.

गेस्ट हाऊसची थरारक कथा आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे कायमचे शत्रू बनले. सुमारे दोन तपे त्यांनी हे शत्रुत्व संपूर्ण खुन्नसनिशी जपले. पण राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू अथवा मित्र नसते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना सपा आणि बसपा यांनी मात्र विरोधकांच्या महागठबंधनाला खो घालण्याचे काम केले आहे. दोन तपांचे शत्रुत्व संपवून सपा आणि बसपा एकत्र आले आहेत. साहजिकच, उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकटे लढण्याशिवाय पर्याय नाही. एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे सारे काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून निवडून गेले होते. आज मात्र त्या राज्यात काँग्रेसचे स्थान नगण्य आहे. पण जनता शहाणी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता ही सपा आणि बसपा या युतीला स्वीकारते की ठोकारते, या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे. गेस्ट हाऊसची ती थरारक कथा जनता आजही विसरलेली नाही. काँग्रेस या कटू इतिहासाचा कितपत लाभ उठवते ते पाहायचे!”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content