Details
मुले पळवणारी टोळी!
13-Mar-2019
| 1
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
“महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी! – जनहितार्थ जारी’’, असा एक भन्नाट मेसेज मंगळवारी दिवसभर जिकडेतिकडे पाठवला जात होता. त्याला कारणही तसंच आहे. निवडणुकांची रणधुमाळी रविवारी जाहीर झाल्यापासून नव्हे त्याच्याही आधीपासून उमेदवारीसाठी इच्छुक लोकप्रतिनिधींकडून लांब उडीचा खेळ सुरू झाला आहे. परस्परांचे हमखास विजेते उमेदवार पळवले जाणार हे तर नेहमीच निवडणुकांच्या तोंडावर दिसून येते. पण कधीकधी नाराज उमेदवारही होणार सून मी त्या घरची.. असे गीत गात केवळ तिकिटासाठी साधनसुचिता, राजकीय निष्ठा, दिल्या घेतल्या आणाभाका, गंडाबंधन वगैरे गुंडाळून ठेवत सत्ताधारी पक्षांत वा अन्य पक्षांत प्रवेश करतात. तिकीट कापले जाणार याची कल्पना आलेला लोकप्रतिनिधीही अचानक लांब उडी मारून या तीरावरच्या त्याच्या मूळ पक्षाला थक्क करतो.
आता लोकसभा निवडणुकांचा खेळ सुरू झालाय, विधानसभेच्या आखाड्याला काही महिने आहेत. पण लांब उड्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. इकडून तिकडे उंबरे ओलांडताना लोकलज्जेची मापे ठोकरली जात आहेत. समोरच्या पक्षाला खिंडार पाडण्यासाठी इच्छुक, नाराज उमेदवारांची पळवापळवी होलसेलमध्ये सुरू झाली आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या शिडातील आव्हानाची हवाच काढून घेऊन त्या पक्षाचे तारू भरकटवायचे आणि आपले जहाज मात्र सत्तेच्या किनाऱ्याला सहीसलामत आणून टेकवायचे असे हे तंत्र आजवर सर्वच राजकीय पक्ष अवलंबत आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन काँग्रेसला अस्मान दाखवले वा अडचणीत आणले, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कारण हाच खेळ काँग्रसनेही याआधी केला आहेच की. नगरमध्ये सुजय विखे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, पण आघाडीच्या गणितात ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेसला मिळणे शक्य नव्हते. शिवाय विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच भाजपात जातो या संदेशामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार अस्वस्थ झाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला तर ते भाजपाला जितके हवे आहे तितकेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवे आहेच.
काँग्रेस कमकुवत होणे, काँग्रेसचे होईल तितके प्रतिमाभंजन होणे हे राज्यातील समीकरणांत भाजपा आणि राष्ट्रवादीच्याही पथ्यावर पडणारे आहे. यामुळेच शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची विनंती फेटाळताना, सुजय विखे यांचे महाआघाडीत योगदान काय? अशी घायाळ करणारी पृच्छा केली असावी. पण नगरमध्ये कागदावर पाहता २ आमदारांमुळे राष्ट्रवादीचा प्राबल्याचा दावा असला तरी प्रत्यक्षात २००९ पासून येथे भाजपाने राष्ट्रवादीचा पराभवच केला आहे. तिथे दिलीप गांधी भाजपा खासदार आहेत. सुजय यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आहे. पक्ष सांगेल ते मान्य असे ते सांगत असले तरी ऐनवेळी ते वेगळा विचार करणारच नाहीत असे नाही. इकडे मुलगा काँग्रेसला पाण्यात पाहणाऱ्या कट्टर प्रतिस्पर्धी भाजपात जाऊनही राधाकृष्ण विखे पाटील काही नैतिकतेच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष नेतेपद सोडायला तयार नाहीत. काँग्रेसही निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पद काढून घेऊन विपरीत संदेश मतदारांना देणार नाही हे नक्की.
काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपाच्या वाटेवर आहेतच. तिकडे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे हेही पुन्हा शिवसेनेच्या शिवबंधनात अडकले आहेत. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर हेच सोनवणे जुन्नरमध्ये ऐनवेळी मनसेत प्रवेश करून निवडून आले होते. आता त्यांनी पुन्हा भगवा खांद्यावर घेतला आहे. यंदा त्यांची स्वप्ने खासदारकीची आहेत असे बोलले जात आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या शिरूरच्या खासदारकीला अढळपद समजणारे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्याबद्दल येथे नाराजीचे वातावरण आहे. त्याचा फायदा मिळेल अशी सोनवणे यांची अपेक्षा असू शकते. याचवेळी मुंबईत काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर आहेत. नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर हे विधानसभेवर निवडून आलेत. आता मुख्यमंत्रीच आमची कामे करतात असे सांगून कोळंबकर यांनी त्यांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी थेट फडणवीस यांचे फोटो लावायला सुरूवात केली आहे. दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांचे मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले बॅनर झळकले आहे.
ही सगळी बनवाबनवी आजची नाही, जुनीच आहे. ती जशी काँग्रेसने केली तशीच भाजपानेही केली आहे. प्रशांत ठाकूर, किसन कथोरे, पालघरचे राजेंद्र गावित ही उदाहरणे फार जुनी नाहीत. शिवसेनेच्या ठाण्यालाही खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सुरू राहतील. विधानसभेच्या आखाड्यात कदाचित आणखी चमत्कार, पळवापळवी समोर येईल. एकमेकांच्या दुखऱ्या नसा बरोब्बर माहिती असलेली आणि कोणत्या वेळी कुठली नस दाबायची याचे डॉक्टरांपेक्षाही बिनचूक निदान करणाऱ्या धूर्त जमातीच्या हातात भारतीय लोकशाहीची सूत्रे आपणच दिली आहेत.”

