HomeArchiveकहाणी दोघा भावांची!

कहाणी दोघा भावांची!

Details
कहाणी दोघा भावांची!

    23-Mar-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
एक भाऊ अतिशय शांत, धोरणी व धूर्त. त्याची व्यावसायिक पावले कुणालाच फारशी कळत नसतात. दुसरा भाऊ नाटकी वाटावा, फिल्मी वाटावा असा. त्याचे सारेच भव्यदिव्य करण्याचे स्वप्न. वडिलांची कीर्ती सांगत त्या दोघांची वाटचाल सुरू झाली होती. दोन भावांनी जेव्हा व्यवसायाची स्वतंत्र सुरूवात केली तेव्हा दोघांच्या संपत्तीत भराभर वाढ होत होती. धिरूभाई अंबानी यांनी भारतीय उद्योजकतेचा एक नवा व निराळा आदर्श घालून दिलेला. त्यांचे व्यावसायकसब वाखाणण्यासारखे होते. अक्षरशः शून्यातून सुरूवात करून स्वर्गाला गवसणी घालण्याचे काम धिरूभाईंनी केले होते. धिरूभाई अंबांनी यांनी आफ्रिकेतील पेट्रोलपंपावर नोकरीपासून सुरूवात केली. मुंबईच्या कापड बाजारात खांद्यावर कापडाचे गठ्ठे टाकून ते विकायला घेऊन जात. त्यांनी कृत्रिम धागा तयार करणाऱ्या कारखान्यानंतर व्यवसायात प्रचंड झेप घेतली.

दोन्ही मुले कर्तृत्त्ववान निघाली. मुकेश केमिकल इंजिनिअर व अमेरिकेत व्यवस्थापनशास्त्र शिकून आलेले. अनिल यांचीही अशीच अमेरिकेतील शैक्षणिक कामगिरी. मुकेश यांच्या संकल्पनेतून धिरूभाईंनी एक रूपयात फोन हा मोबाईलमध्ये क्रांती करणारा प्रयोग भारतात सुरू केला. करलो दुनिया मुठ्ठीमे ही त्यांची टॅगलाईन जबरदस्त प्रसिद्ध झाली होती. रिलायन्स मोबाईलने व्यवसायतील मोठा वाटा बघताबघता घेतला होता. बघताबघता धिरूभाईंच्या रिलायन्स इंडस्ट्रीने एक लाख कोटी रूपयांच्या बाजारमूल्याचा टप्पा गाठला. रिलायन्सचा अनेक कंपन्यांचा मोठा डोलारा धिरूभाईंनी उभा केला खरा व अचानक हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. जुलै 2002 मध्ये जेव्हा हे झाले तेव्हा लक्षात असे आले की त्यांनी आपल्या संपत्तीचे वाटणी करणारे इच्छापत्र केलेले नव्हते. मोठा मुलगा मुकेश यांनी कंपनीचे अध्यक्षपद घेतले तर धाकटे अनिल व्यवस्थापकीय संचालक बनले. पण दोघांचे फार काळ जमले नाही. दोनच वर्षात त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय केला.

आई कोकिळाबेन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उद्योग जगतातील काही मोठ्या व्यक्तींच्या सल्ल्याने धिरूभाईंच्या साम्राज्याची दोन उभी शकले करण्यात आली. पेट्रोकेमिकल व अन्य काही व्यवसाय मुकेश यांच्याकडे गेले तर टेलिफोन, आर्थिक सेवा कंपन्या आदी व्यवसाय अनिल यांच्याकडे गेले. धिरूभाईंच्या दोघा मुलांनी, थोरला मुकेश व धाकटा अनिल यांनी, अंबानींचे व्यवसायकौशल्य जगाला दाखवून दिले. वाटणी झाली तेव्हा एकत्रित दोन लाख कोटींचे बाजारमूल्य असणाऱ्या दोघांच्या कंपन्यांनी स्वतंत्र व्यवसाय करताना त्याच्या दुप्पट बाजारमूल्य सिद्ध केले. वडिलांच्या संपत्तीत दोघांनीही मोठी भरच टाकलेली होती. पण नंतर त्यात फरक पडू लागला. मुकेश यांनी अधिकाधिक प्रगती केली तर अनिल यांच्या कंपन्यां ढासळू लागल्या.

या दोन्ही उद्योजक मुलांची कहाणी ही खरोखरीच नव्याने व्यवसाय करणाऱ्या तरूणांना प्रेरणादायक तर आहेच पण धडे शिकवणारीदेखील आहे. एकाच बिंदुपासून दोघांनी सुरूवात केली होती. पण 2005 ते 2019 याकाळात एकाच्या व्यवसायाची पुरती वासलात लागलेली आहे तर दुसऱ्याने ज्यात हात घातला तिथे अक्षरशः सोनं पिकवले आहे. मुकेश अंबानी यांच्या पेट्रोकेमिकल व जिओ अशा कपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य सात लाख कोटी रूपयांच्या घरात पोहोचलेले आहे. जगातील श्रीमंतांच्या फोर्बच्या यादीत त्यांचे स्थान बाविसावे आहे. भारतातील तर ते क्रमांक एकचे श्रीमंत व्यवसायिक आहेतच, पण अनेक राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकांपेक्षा अधिक त्यांचा वर्षाचा नफा असतो अशी स्थिती आहे.

अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे बाजारमूल्य साधारणतः अकरा वर्षांपूर्वी म्हणजे मार्च 2008 मध्ये दोन लाख अडतीस हजार कोटींचे होते तर तेच बाजारमूल्य फेब्रुवारी 2019 मध्ये प्रचंड घसरून अवघे 24 हजार नऊशे कोटी इतके राहिले. रिलायन्स कम्यनुनिकेशन्स, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल यांच्या मुख्य कंपन्या गटांगळ्या खात आहेत. एकेकाळी बिग एंटरटेनमेंट या त्यांच्या मल्टिप्लेक्स कंपनीचा मोठा दबदबा होता. त्यांच्याकडे देशभरात सातशे थिएटर होती. हॉलिवूडच्या स्पीलबर्गसारख्या दिग्दर्शकाबरोबर अनिल यांची कंपनी काम करत होती. पण आता ते सारे सिनेमे त्यांना विकावे लागले आहेत. त्यांच्या आर कॉम या कंपनीने एरिक्सन या स्विडीश कंपनीला ज्या रकमा द्यायच्या होत्या त्या अनिल अंबानी देऊ शकले नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तंबी दिली होती की 19 मार्च 2019 पर्यंत जर पैसे देऊ शकला नाहीत तर तुम्हाला तुरूंगात जावे लागेल. रिलायन्स एडीए ग्रुपचे चालक, मालक अनिल अंबानी त्यांचे निकटवर्ती आर कॉमचे अध्यक्ष सतीश सेठ आणि दुसऱ्या आर इन्फ्राटेलचे प्रमुख छाया विराणी या तिघांना तीन महिने तुरूंगात जावे लागेल असे सर्वोच्च न्यायलायाने बजावले होते. ती मुदत संपण्याच्या एक दिवस आधी अनिल अंबानी कंपन्यांनी खटला दाखल करणाऱ्या एरिक्सनचे 580 कोटी रूपये देण्यापैकी बाकी असणारी 460 कोटी रूपयांची रक्कम देऊन टाकली. हा भरणा केल्यानंतर अनिल व त्यांच्या सहकाऱ्यांना तुरूंगात जावे लागणार नाही कारण मूळ खटलाही एरिक्सन परत घेत आहे.

त्या साऱ्याबद्दल अनिल यांनी बंधु मुकेश व वहिनी नीता अंबानी यांचे शतशः आभार मानले आहेत. रक्ताचे नातेच माणसाला तारते यावरही आता लोकांचा पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. मुकेश व अनिल अंबानी यांच्या संबंधाविषयी माध्यमे व वृत्तपत्रांना मोठे कुतूहल असते. कारण आई कोकिळाबेन यांच्या दबावाखाली हे दोघे भाऊ कौटुंबिक सण समारंभ व कार्यक्रमात जरी एकत्र दिसले, वावरले तरी त्यांचे व्यावसायिक संबंध मात्र ताणलेलेच राहिले. अगदी सोमवारी मुकेश यांनी अनिल यांची तुरूंगापासून सुटका केली असली तरी त्यांच्या जिओ कंपनीने मात्र आर कॉमबरोबरचे व्यवसाय विकत घेण्यासंबंधीचे करार मोडून टाकले. आर कॉमचे एकूण कर्ज झाले होते 45 हजार कोटी रूपयांच्या घरात. त्यापैकी मोबाईल टॉवर, फायबर केबल नेटवर्क, स्विचिंग यंत्रणा आदी अठरा हजार कोटी रूपयांची मालमत्ता आर कॉमकडून जिओ विकत घेणार होती. तितका दिलासा अनिल यांच्या कंपन्यांना मिळाला असता. पण आर कॉमला त्या व्यवहारासाठी ज्या सरकारी परवानग्या मिळायला हव्या होत्या त्या काही मिळाल्या नाहीत. मालमत्ता विकत घेणाऱ्या कंपनीनेच जुन्या कर्जाचीही जबाबदारी घेतली पाहिजे अशी भूमिका आर कॉमला कर्जे देणाऱ्या बँकांनी घेतली होती. तेही जिओला मान्य नव्हते. या कारणांसाठी दोघा भावांच्या कंपन्यांनी गेल्या वर्षी केलेला करार मोडला.

अनिल यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या उत्तर प्रदेशातील वीज निर्मिती प्रकल्पाला मुकेश यांच्या पेट्रोकेमिकल कंपनीकडून स्वस्त दरात गॅस मिळणे अपेक्षित होते. तशा प्रकारचे करार त्या दोघांनी कौटुंबिक स्तरावर 2004 मध्ये केले होते. पण आंध्रच्या गोदावरी खोऱ्यातील हा नैसर्गिक गॅस कमी किंमतीला विकण्यावरून केंद्र सरकार व मुकेश यांची रिलायन्स इंडस्ट्री यांच्यात वाद सुरू झाला. केंद्र सरकारचे म्हणणे होते की नैसर्गिक संपत्तीचे दर ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्या वादात मुकेश यांना अनिल यांच्या कंपनीला ज्या स्वस्त दरात गॅस द्यायचा होता ते देणे शक्य होत नव्हते. मात्र त्या विरोधात अनिल यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुकेश ते कधीच विसरले नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यामुळेच जिओने आर कॉमबरोबरचा करार ऐनवेळी मोडला असेही सांगितले जात होते. त्या वातावरणातही अनिल यांच्या मदतीला बंधु मुकेश हेच धावून आले हे विशेष! या साऱ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे व तो आहे राफाल विमान खरेदीचा. याच अनिल अंबानी यांना पंतप्रधान मोदींनी तीस हजार कोटी रूपयांची मदत केल्याचे राहुल गांधी सर्वत्र सांगत फिरत असतात आणि तेच अनिल पाचशे कोटी रूपये देता येत नाहीत म्हणून तुरूंगात निघालेच होते. वाचले फक्त भावामुळे!”
 

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content