Details
नंदूरबारचा बालेकिल्ला काँग्रेस ताब्यात घेणार?
12-Apr-2019
| 0
”
अतुल माने
atulm2001@gmail.com
काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ अशी ओळख असलेला तसेच गांधी घराण्याचे विशेष प्रेम असलेल्या नंदूरबार लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी लढत होणार आहे. वास्तविक हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जात होता. पण गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि नवा चेहरा हवा म्हणून झालेले मतदान यामुळे काँग्रेसच्या हातून हा हक्काचा मतदारसंघ निसटला. नऊवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या माणिकराव गावित यांना भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्याकडून लाखभर मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, काँग्रेसला या निवडणुकीत मिळालेली मते गतवेळच्या निवडणुकीपेक्षाही ६.३१ टक्के जास्तच होती, यावरून आदिवासी जनता काँग्रेसपासून दूर गेलेली नव्हती हेही स्पष्ट होते. त्यात भाजपला यावेळी गड राखण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागतील, अशी स्थिती आहे.
भाजपकडून डॉ. हिना गावित यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे तर, काँग्रेसनेसुद्धा अचानक धक्कातंत्राचा वापर करत धडगावचे आमदार के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे दावेदार असलेले माणिकराव गावित प्रचंड नाराज झाले. त्यांनी पुत्र भरत गावित याच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता पण, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. सुरूवातीला डॉ. विजयकुमार गावितांनीच काँग्रेसमध्ये यावे आणि लोकसभा लढवावी, असे डावपेच आखले जात होते, मात्र काँग्रेसने सपशेल नकार दिला. खुद्द डॉ. गावितही लोकसभा लढविण्यास फारसे इच्छुक नव्हते.
नाराज झाल्यामुळे माणिकराव गावित यांनी काँग्रेसचे मुंबई दौऱ्यावर आलेले पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण, त्यांना भेट मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यांचे पुत्र भरत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी चर्चा होती. आपण कधीच पक्ष सोडणार नाही असे दस्तुरखुद्द माणिकराव यांनी सांगितले असले तरी अजूनही काँग्रेसअंतर्गत संशयाचे वावतावरण कायम आहे.
के. सी. पाडवी यांनी आमदार म्हणून चांगली कामगिरी केली असली तरी त्या जोरावर ते मतदारांना किती खेचून आणतात हे महत्त्वाचे आहे. हिना गावित यांच्यासाठीही निवडणूक सोपी नाही कारण मतदारसंघात अजूनही समस्या कायम आहेत. यामध्ये प्रामुख्याने वर्षोनुवर्षे होत असलेले आदिवासींचे स्थलांतर, कुपोषणाचा प्रश्न तसेच येथे असलेली बेरोजगारी हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्याचा फटका हिना गावित यांना बसू शकतो तर पाडवी यांना पक्षांतर्गत असलेली गटबाजी, गावित यांची नाराजी डोकेदुखी ठरू शकते”

