Details
`पावरफुल’ पवारांची मावळ-शिरूरमध्ये कसोटी!
01-May-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यातील 72 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. सरासरी 64 टक्क्के मतदान झाले. त्यामध्ये महाराष्ट्रात 58.23 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या तुलनेत मतदान कमी झाले आहे. राज्यात 17 जागांसाठी मतदान झाले. राज्यात उष्णतेचा पार्यालने उच्चांक गाठला असताना मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदान केले. या निवडणुकीत 2014 प्रमाणे मोदी लाट नसल्याचे मतदारसंघात फेरफटका मारल्यावरून जाणवले. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांकडे लक्ष अवघ्या देशाचे लागले आहे. कारण, मावळमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिरूरमध्ये सलग तीन वेळा हॅट्रिक करणारे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आव्हान देणारे राष्ट्रवादीचे चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीतील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सातत्याने या मतदारसंघांत पराभव पत्करावा लागल्यामुळे यावेळेस पवार कुटुंबियांनी विजय खेचून आणण्यासाठी कंबर कसली. एकंदरीत तालुकावाईज मतदानांच्या टक्केवारीचा अभ्यास करता यावेळेस मतदारांनी बदल करण्याचे ठरविले असल्याचे जाणवले. पार्थला धोका म्हणजे पवारांच्या राजकीय अस्तित्त्वाला धोका. त्यामुळे अनेकांनी या मतदारसंघाबाबत पैजा लावल्या आहेत. मात्र, पवारांच्या नावातच ’पावर’ असल्यामुळे निवडणूक निकालात पवारांची खर्याच अर्थाने कसोटी ठरणार आहे.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी नावाचे मोठे वादळ निर्माण झाल्याने काँग्रेसची त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष तर महाराष्ट्रासह अन्य राज्यातदेखील काँग्रेसची धूळधाण झाली. पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कामगिरीचा विचार करता देशातल्या जनतेमध्ये मोठी नाराजी परसली आहे. त्याचबरोबर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारून काँग्रेसच्या हातात हात दिला. त्यामुळे मोदी लाट पूर्णपणे ओसरल्याचे दिसून येत आहे. कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या दोन वर्षांत आपली परिपक्वता देशातील जनतेला दाखवून दिल्यामुळे जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. राफेलमुळे मोदी सरकारला अडचणीत आणण्यात गांधी यशस्वी झाले. त्यांनी मोदींना राफेलविषयी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले. मात्र, मोदींनी केवळ ’मन की बात’मध्ये देशाला मूर्ख बनविण्याचे काम केले.
दुसर्या बाजूला मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत सरकारमध्ये कशाप्रकारे घोटाळे केले आहेत, याची पुराव्यानिशी माहिती काँग्रेसचे नेते आणि नामवंत वकील कपिल सिब्बल यांनी दिली. दुर्देवाने याची माहिती मात्र, दूरचित्रवाहिन्या अथवा वर्तमानपत्रांमध्ये आली नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती ज्यावेळी पुराव्यासहीत समोर आली, त्यावेळी जनतेला मोदी सरकारचे खरे रूप माहिती पडले. जर ही माहिती खोटी आहे, तर मोदी सरकारने सिब्बल यांच्या विरोधात बदनामीचा खटला अथवा त्याचा खुलासाही केला नाही. याचा अर्थ यामागे नेमके काय दडले आहे हे जनतेलादेखील कळून चुकले आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना कळून चुकले आहे की यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसू शकतो. म्हणून त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत करून शिवसेना-भाजपमध्ये असलेले द्वंद्व यावर पांघरूण घालून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मनोमीलन केले. पश्चिम बंगालमध्ये जाऊन अधिक लक्ष केंद्रीत केले. कारण, उत्तर प्रदेशमधील भरपाई या दोन राज्यामधून करता येईल.
ज्या शरद पवारांचे मोदी कौतुक करत होते. त्या पवारांबद्दल मोदींनी महाराष्ट्रात येऊन व्यक्तीगत टीका करून एका अर्थाने आपला तोटाच करून घेतला आहे. कारण, पवारांनी राजकीयदृष्ट्या एखाद्याला चितपट करायचे ठरविले तर त्याला ते राजकीय नकाशावरून गायब करून टाकतात. मात्र, व्यक्तीगतरित्या ते कोणावरही टीका करत नाहीत. हे त्यांचे वैशिष्ट आहे. महाराष्ट्रात यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात भाजप-सेना युतीचे खरे नाही. याची जाणीव होऊ लागल्यामुळे त्यांनी पवारांना टार्गेट करून आपण खालच्या जातीचे असल्यामुळे आपणास काँग्रेसकडून लक्ष्य केले जात आहे, असा नवा सूर काढून मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात दहा सभा घेऊन मोदींनी देशाला कशाप्रकारे मूर्ख बनविले आहे याची पुराव्यासह माहिती देऊन मोदी-शाह पुन्हा आले तर देश संकटात जाईल हे जनतेला पटवून सांगितले. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. सांगण्याचे तात्पर्य या निवडणुकीत या दोन मतदारसंघांतदेखील याचा परिणाम होऊ शकतो.
मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार आहेत. पनवेल मतदारसंघात एकूण पाच लाख 39 हजार 187 मतदार आहेत. यामधील 2 लाख 98 हजार 349 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून 55.33 टक्के मतदान झाले आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन लाख 79 हजार 790 मतदार आहेत. यामधील 1 लाख 89 हजार 577 मतदारांनी आपला हक्क बजाविला असून सर्वाधिक 67.76 टक्के मतदान झाले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात दोन लाख 90 हजार 273 मतदार आहेत. यामधील 1 लाख 95 हजार 101 मतदारांनी मतदान केले असून एकूण 67.21 टक्के मतदान झाले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख 37 हजार 657 मतदार आहेत. यामधील 2 लाख 11 हजार 383 मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे. एकूण मतदान 62.60 टक्के झाले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाच लाख 2 हजार 740 मतदार असून 2 लाख 83 हजार 04 मतदारांनी मतदान केले आहे. एकूण 56.29 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात तीन लाख 47 हजार 758 मतदार आहेत. यामधील 1 लाख 89 हजार 404 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. येथे 59.49 टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये 55 टक्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून गेल्या वेळेस बारणे यांना अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळेस राष्ट्रवादीने पूर्णपणे ताकद लावून बारणे यांचे गेल्या वेळचे मताधिक्य घटविण्याचा प्रयत्न केला असून पार्थ यांना चांगले मतदान होईल, असे वातावरण जाणवले.
पनवेलमध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाल्याने आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता पार्थ यांना चांगला फायदा मिळेल. उरण, पनवेल, कर्जत या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असल्यामुळे याठिकाणी पार्थला मताधिक्य मिळेल. कर्जतमध्ये आमदार राष्ट्रवादीचा आहे. मात्र, नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे याठिकाणी मतदानांची टक्केवारी पाहता दोन्ही समान चालतील. तर जो मावळ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो या बालेकिल्याला यावेळेस राष्ट्रवादीने सुरूंग लावला असून शहरी भाग वगळता ग्रामीण भागात राष्ट्रवादीला चांगला फायदा होईल. चिंचवड हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला समजला जातो. आमदार लक्ष्मण जगताप यांनी चारशे बुथ तयार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कामाला लावले होते. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेला मताधिक्य मिळेल. मात्र, 2014 च्या तुलनेत इतके मताधिक्य मिळणार नाही. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2014 च्या तुलनेत यावेळेस 2 टक्के मतदान वाढले. ते म्हणजे झोपडपट्टीतील मतदार सायंकाळी उशिरा बाहेर पडल्यामुळे रात्री साडेनऊपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळेल, असे चित्र पाहयला मिळाले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात 21 लाख 73 हजार 484 मतदार आहेत. त्यापैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. आंबेगावमध्ये 1 लाख 97 हजार 52 मते, टक्केवारी 70.29, जुन्नरमध्ये 1 लाख 93 हजार 965 मते, टक्केवारी 64.90, खेड-आळंदीमध्ये 2 लाख 2 हजार 740 मते, टक्केवारी 62.76, शिरूरमध्ये 2 लाख 27 हजार 541 मते, टक्केवारी 61.52, भोसरीमध्ये 2 लाख 37 हजार 767 मते, टक्केवारी 57.48 तर हडपसरमध्ये 2 लाख 33 हजार 316 मते, टक्केवारी 47.84. या मतदारसंघात सुमारे 59.46 टक्क्के मतदान झाले आहे. शिरूरमध्ये डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील वातावरणच बदलून गेले. आंबेगावमध्ये 70 टक्यापेक्षा जास्त मतदान झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील याच मतदारसंघातील रहिवासी असल्यामुळे वळसे-पाटलांनी कोल्हे यांच्यासाठी जोरदार आपली ताकद लावली. आढळराव-पाटलांनीदेखील तितक्याच ताकदीने लक्ष घातल्यामुळे याठिकाणी दोन्ही उमेदवार सम-समान चालतील. जुन्नरमध्ये 64 टक्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून याठिकाणी मात्र कोल्हे यांना अधिक पसंती असल्याचे जाणवले. खेड-आळंदीमध्ये 62 टक्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यामुळे याठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबरीने चालतील. शिरूरमध्ये शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल असे वातावरण जाणवले. भोसरीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी बरोबरीने जाईल. हडपसरमध्ये कोल्हे यांना चांगला पाठिंबा असल्याचे जाणवले. याठिकाणी यावेळेस शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. एकंदरीत या मतदारसंघात कोल्हे ज्यावेळी प्रचार करत होते. त्यावेळी त्यांच्या प्रचारफेरींना महिलांनी मोठा पाठिंबा दिल्याचे जाणवले. त्यामुळे कोल्हे यांना महिलांची अधिक मते मिळतील, असे एकंदरीत निवडणुकीतल्या वातावरणाने जाणवले.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी जातीने या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. एवढेच नव्हे तर बारामतीचे मतदान झाल्यानंतर बारामतीची अख्खी फौज मावळमध्ये उतरून पार्थच्या कामाला लागली होती. सुमारे पाच हजार प्रमुख कार्यकर्ते या भागात काम करत होते. एकंदरीत मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी 2 लाख मताधिक्याने विजयी होऊ, असा दावा केला आहे तर दुसर्याि बाजूला मावळमध्ये पार्थला सार्थ ठरवू असा चंग अजितदादांनी बांधला आहे. विशेष म्हणजे दादांनी स्वतःच्या निवडणुकीलादेखील एवढे लक्ष घातले नाही तेवढे आपले पुत्र पार्थसाठी लक्ष घातले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील आपल्या सहकार्यांेसमवेत मावळ ढवळून काढला. त्यामुळे खर्यार अर्थाने पार्थ उमेदवार असला तरी शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्त्वाची ही निवडणूक असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील निकाल यावेळी वेगळे लागतील, असे जाणवले.”

