HomeArchiveसंघटित टोळ्यांचे कंबरडे...

संघटित टोळ्यांचे कंबरडे मोडले!

Details
संघटित टोळ्यांचे कंबरडे मोडले!

    30-May-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार
jagdish.bhovad@gmail.com
संघटित गुन्हेगारीने काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये थैमान घातले होते. दाऊद इब्राहिम, अरूण गवळी आणि अनेक गुंडटोळ्यांची तर दिवसाढवळ्या रस्त्यांवर खूनखराबा करण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळी बव्हंशी वर्तमानपत्रांमध्ये गँगवॉर भडकले अशा बातम्या दररोज येत असत. मात्र कालांतराने सरकारने खतरनाक गुंडांना यमसदनी धाडण्यासाठीचे अधिकार पोलिसांना दिले आणि त्याचा परिणाम दिसून आला. पुढे काही ठराविक पोलिसांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि खतरनाक गुन्हेगारांबरोबरच काही निरपराधांनाही चकमकीच्या नावाखाली यमसदनी धाडल्याचे आरोप होऊ लागले. अनेक प्रकरणे कोर्टातही गेली. त्यातून काही अधिकाऱ्यांविरूद्धचे आरोप सिद्ध झाले आणि त्यांनाही तुरूंगाची हवा खावी लागली. आजही त्यातील काही अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तुरूंगाची हवा खात आहेत.
करावे तसे भरावे या न्यायानेच नियती न्याय करीत असते..

तोच न्याय संबंधित गुन्हेगारांच्या बाबतीत झाला आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनीही मिळालेल्या अधिकाराचा दुरूपयोग केला. त्यामुळे त्यांनाही त्याची शिक्षा भोगावी लागली. याचा परिणाम असा झाला की, मुंबईतील गुन्हेगारीचेही कंबरडे मोडले. हे एका अर्थी चांगलेच झाले म्हणायचे. अर्थात हे चांगलेच घडले असले तरी संघटित गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत निघाली आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आजही मुंबईत सक्रिय आहेत का? तर त्याचे उत्तर होय असेच मिळते. पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे या संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या अंडरग्राऊंड राहून कार्यरत असतात. खंडणी उकळणे, खूनखराबा करणे हे या मंडळींचे कामच असते. अलीकडच्या काळात खुनखराब्याच्या घटना कमी घडत असल्या तरी खंडणीच्या घटना अद्याप कमी झालेल्या नाहीत. यामुळे आता पोलिसांनीही या संघटित गुन्हेगारांविरोधात आणखी कडक भूमिका स्वीकारली असून मुंबईतील गुन्हे शाखेच्या १२ कक्षांसह खंडणीविरोधी पथकांनी गुन्हेगारांची यादी बनवून आपली कारवाई सुरू केलेली आहे. यादीनुसार गुंडांची सध्या चौकशी सुरू झालेली आहे.

संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील गुन्हेगार खास करून १९८०च्या दशकापासून अभिलेखावर संघटित टोळीचा सदस्य म्हणून नोंद असलेल्या प्रत्येकाची मुंबई गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. एकेकाळी संघटित गुन्ह्यांत आघाडीवर असलेल्यांचे नवे ‘धंदे’ शोधून काढण्याच्या उद्देशाने प्रत्येक व्यक्तीबाबतचे सर्व तपशील नोंद होत असून ते टप्प्याटप्प्याने पडताळले जात आहेत. पोलीस आयुक्त संजय बर्वे, तत्कालीन सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या विविध कक्षांनी आपापल्या हद्दीतील संघटित टोळ्यांशी संबंधित गुंडांची यादी तयार केली. संघटित टोळ्यांना चाप लावण्यासाठी १९९९ मध्ये महाराष्ट्र शासनाने संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणला. या कायद्यानुसार अटक केलेल्या सर्वच गुंडांचा यादीत समावेश आहे. त्यापूर्वीच्या काळात टोळ्यांशी संबंधित गुंडांची नावे दाखल गुन्हय़ांच्या नोंदींवरून यादीत जोडली जात आहेत.

मुंबईमध्ये अनेक पोलीसठाण्यांच्या जवळच गुन्हे शाखाही कार्यरत असल्याचे अनेकांनी पाहिले असेल. अशा १२ गुन्हे शाखा सध्या मुंबईत कार्यरत आहेत. गुन्हे शाखेच्या या १२ शाखांसह खंडणीविरोधी पथकाकडे यादीनुसार गुंडांची चौकशी सुरू झालेली आहे. किती गुन्हे दाखल आहेत? खटले सुरू आहेत का? जामिनावर बाहेर आल्यानंतर उदरनिर्वाहासाठीचा व्यवसाय किंवा धंदा कोणता? निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोक्काव्यतिरिक्त अन्य गुन्हे दाखल आहेत का? कोणत्या राजकीय पक्षाचा आश्रय आहे का? ही माहिती या चौकशीतून नोंद केली जात आहे. यादीतील दक्षिण मुंबईतील किंवा महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी गुंडांची चौकशी खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे.

हे सर्व काम लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरू करण्यात आले होते. त्यामागे कारण असे होते की, याच काळात हे संघटित गुन्हेगार अधिक सक्रिय होतात. निवडणुकीचे वातावरण बिघडवण्यासाठी ते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. मात्र यावेळी पोलिसांनी ज्याप्रमाणे या संघटित गुन्हेगारांवर अंकुश मिळवला त्याचे खरेच कौतुक करायला हवे. यासाठी पोलीस आयुक्तांसह सर्वच पोलीसठाण्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. विशेषतः गुन्हे शाखांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गुन्हेगारांची पाळेमुळे खोदून काढण्याचे जे काम केले, त्यांच्यावर वचक ठेवला, त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तरी कोणतीही गडबड झाल्याचे पाहयला मिळाले नाही.

आता सहा महिन्यांनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकांना राज्याला सामोरे जावयाचे आहे. त्यावेळीही हीच रणनीती आखून संघटित गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांनी आतापासूनच सुरू केलेले आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान मोकळ्या वातावरणात पार पडले, विधानसभेच्याही निवडणुका अशाच मोकळ्या वातावरणात पार पडतील, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. संघटित टोळ्यांशी संबंधित सर्वच गुंडांवर पोलिसांचे लक्ष आहे हा संदेश जावा, पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहवा आणि पडद्याआड किंवा गुप्तपणे सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती आणि त्यात पोलीस शंभर टक्के यशस्वी ठरले आहेत, असेच म्हणता येईल.

लोकसभेची निवडणूक मोकळ्या वातावरणात पार पडली, तरीही संघटित टोळ्यांच्या गुन्हेगारांना मोकळे सोडले जाणार नाही. त्यांच्यावर करडी नजर राहणारच आहे. त्यामुळे अद्यापही गुंडांनी चौकशीत दिलेले तपशील पडताळले जात आहेत. निवडणुकीत अशा गुंडांना हाताशी धरून मतदारांवर दबाव आणला जातो, प्रभावित केले जाते. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांकडे त्या-त्या भागातले गुंड खंडणीची मागणी करतात. त्यासाठी दबाव आणतात. विविध शासकीय प्रकल्पांमधली कंत्राटेही गुंडांकडे असतात. अनेक गुंडांनी राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत पदेही पटकावली आहेत. त्यांच्याकडून अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगारी सुरू असते.

पोलिसांनी मधल्या काळात या सर्व गुन्हेगारांवर चांगला वचक बसवला आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत संघटित गुन्हेगारी करून बक्कळ पैसा कमावण्याचे स्वप्न पाहून अनेक गुन्हेगार छुप्या कारवाया करीत असतात. मात्र त्यांचेही धंदे कधी ना कधी तरी पोलिसांपर्यंत पोहोचतातच. अशावेळी पोलीस संबंधितांवर कारवाई करताना किंवा त्यांची पाळेमुळे उखडून फेकून देण्यासाठी जे काही करायला हवे, ते करतातच. त्यामुळे आज अनेक नामचीन गुंड तुरूंगाची हवा खाताना दिसत आहेत. त्यामध्ये अरूण गवळी, डी. के. राव यांच्यासह अनेक गुन्हेगारांचा समावेश आहे.

याचा परिणाम असा झाला आहे की, काही वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर जो खूनखराबा होत असे, तो आता होताना दिसत नाही. नुकत्याच घाटकोपर येथे घडलेल्या घटनांसारख्या घटना काही ठिकाणी घडत आहेत. घाटकोपरमध्ये खून झालेल्या इसमाच्या नावावरही काही गुन्हे दाखल आहेत, असे प्राथमिक तपासात उघड झालेले आहे. त्याचा खून कुणी केला, संघटित टोळ्यांचा तो बळी ठरला आहे का, तो गँगवॉरचाच भाग आहे का, हे हा लेख लिहीपर्यंत तरी उघड झालेले नाही. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झालेली आहे. मात्र प्राथमिकदृष्ट्या तरी हे गँगवॉर नाही, असेच म्हणता येईल. घाटकोपरची घटना का आणि कशासाठी घडली, याचा तपास पोलीस करतीलच. मात्र मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये संघटित गुन्हेगारी पुन्हा फोफावू नये, यासाठी पोलीस दक्ष राहून कारवाया करीत आहेत. गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांच्या दक्षपणामुळेच लोकसभेच्या निवडणुका निर्धोकपणे पार पडलेल्या आहेत, आता विधानसभा निवडणुकीतही पोलिसांची कसोटी लागणार आहे. मात्र आपल्या कायद्याच्या रक्षकांनी आपले काम चोख बजावले आहे, पुढेही बजावतील, यात वाद नाही.”
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content