पुण्यात काल भरदिवसा शिवाजीनगर न्यायालयासमोर न्यायालयातून बाहेर पडलेल्या एका आरोपीवर जीवघेणा हल्ला झाला. पाच हल्लेखोरांनी आरोपी मंदार किवळे याच्यावर दोन भरलेली पिस्तुले रिकामी केली. इतकेच नव्हे तर आरोपी पळतोय हे पाहून, त्याचा पाठलाग करून त्यावर कोयता तसेच इतर धारदार शस्त्रांनी वार केले. यात किवळे जबर जखमी झाला. आजही ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंदार पिवळे किवळे हा कात्रजचा निवासी. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कात्रजमध्ये शुभम चव्हाण यांची मालमत्तेच्या वादातून हत्त्या झाली होती. या प्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. चारच दिवसांपूर्वी त्याची उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. जामीनातल्या अटी-शर्तीनुसार मंदार काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर झाला होता. तिथली कार्यवाही संपल्यानंतर तो बाहेर पडला आणि हल्लेखोरांनी डाव साधला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयासारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
गेल्या काही महिन्यांत पुण्यात गोळीबाराच्या काही लक्षणीय घटना घडल्या आहेत. २१ नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत एमआयडीसी (शिवशंभोनगर) परिसरात बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या आलिशान कारवर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ८ तासांत कारवाई करत बंड्या उर्फ अक्षय काळे आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हल्ल्याआधी आरोपींनी कोळेकर यांच्याकडे दोन लाखांची खंडणी मागितली होती. नोव्हेंबरमध्येच पुणे-नगर महामार्गावरील शिरसवडी (ता. हवेली) येथे एका व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळी झाडून तब्बल २२ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका टोळीतल्या तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली आहे. या वर्षाच्या मध्यात (जून महिन्यात), हडपसर-फुरसुंगी परिसरातील एका उद्योजकाकडे खंडणीची मागणी करून त्यांच्या कंपनीवर आणि कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. या घटनेतही जीवितहानी झाली नव्हती, मात्र लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमक्या आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली होती.

काल भरदिवसा दुपारी पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या समोरची गोळाबाराची घटना ताजी असतानाच तिन्हीसांजेला साडेसात वाजता मुंबईत माहीम परिसरातल्या शोभा हॉटेलच्या गजबजलेल्या भागात एका मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करून पळ काढला. यावेळी दुकानाचा मालक दुकानातच बसला होता. तो ज्या पद्धतीने बसल्याचे चित्र समोर आले आहे ते पाहता हल्लेखोरांना त्याला मारायचे असते तर ते सहज शक्य होते. परंतु हल्लेखोरांना दुकानमालकाला फक्त घाबरवायचे होते. त्यामुळेच दुकानातल्या काचेच्या तावदानरूपी भिंतीवर दोन गोळ्या झाडून आरोपी पसार झाले. यात काचेचे हे तावदान चक्काचूर झाले. यामध्ये जीवितहानी झाली नाही, अशी रसभरीत वर्णने आणि त्याचे कवित्व नंतर टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांवर दिसू लागले. गेल्या काही महिन्यांत मुंबईतही संघटित गुन्हेगारी बोकाळली आहे. ऑक्टोबरमध्ये जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला होता. यात टायगर थोडक्यात बचावला. त्याचा चालक जखमी झाला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचे समोर आले असून, या प्रकरणात पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे. याच महिन्यात अभिनेता तुषार कपूरला बिश्नोई टोळीच्या नावाने ऑडिओ मेसेज/कॉलद्वारे ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी आली. अभिनेता सैफ अली खान यालाही झीशान अख्तरच्या नावाने व्हॉइस मेसेजद्वारे धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याच महिन्यात बिग बी अमिताभ बच्चन याचा जुहूमधला बंगला ‘जलसा’ बॉम्बने उडवण्यासह जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. चित्रपॉ निर्माते रोहित शेट्टी, अभिनेता सलमान खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून बहुतांश ठिकाणी धमकी देणाऱ्यांनी बिष्णोई गँगच्या नावाचा वापर केला आहे. लॉरेन्स बिष्णेई स्वतः गुजरातमधल्या साबरमती जेलमध्ये आहे. तो तेथे बसला असला तरी त्याच्या कारवाया अखंडपणे चालूच आहेत.
संघटित गुन्हेगारीचे कामकाज नेहमीच एखाद्या कॉर्पोरेटप्रमाणे चालत राहिले आहे. आता जसा कॉर्पोरेटमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा मुक्तपणे वापर होतो तसा वापर गुन्हेगारी कॉर्पोरेटमध्येही होत आहे. एआय हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानही त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. दळणवळणाची साधने वाढली आहेत. रेल्वे, मेट्रो, रस्ते, हायवे, एक्स्प्रेस वे, यांच्याबरोबरच सॅटेलाईट फोनपासून आवाजाच्या क्लोनिंगपासून एआय व्हिडिओचा मुक्त वापर चालू झाला आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारी विश्व अधिक सॉफिस्टिकेटेड झाले आहे. संघटित गुन्हेगारीचे कॉर्पोरेट अत्यंत आखिव, अचूक आणि परिणामकारक होताना दिसत आहे. मला आठवतंय ते १९९०चे दशक. या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारी बोकाळली होती. त्यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान तर सोडा, मोबाईलही बाजारात उपलब्ध नव्हते. मोबाईलच्या आधी आलेली पेजरची पद्धतही बाजारात पोहोचली नव्हती. एमटीएनएलचे फोनही (लँडलाईन) बसवण्यासाठी सहा-सात वर्षांची प्रतीक्षायादी असायची. त्यातही विशेष बाब म्हणून कनेक्शन मिळवायचे झाल्यास काही हजार मोजावे लागत असत. त्यावेळी हजार रुपयांची किंमत आजच्या लाखांइतकी होती. रस्त्यारस्त्यावर पब्लिक टेलिफोनचे बूथ असायचे. इराणी हॉटेलच्या बाहेर असलेल्या डब्यासारखे टेलिफोनचे डबे असायचे. बूथवर रुपया देऊन किंवा डब्यात रुपयाचे नाणे टाकून फोन करावा लागे. या अशा काळातही गुन्हेगारी जगताचे कॉर्पोरेट व्यवस्थितपणे सुरू होते.

जसे व्यावसायिक कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळे विभाग असतात तसेच विभाग गुन्हेगारी कॉर्पोरेटमध्येही असतात. कॉर्पोरेटमध्ये जसे कंपनीचा मालक अध्यक्ष असतो तसेच गुन्हेगारी विश्वातही असते. तेव्हाचे संघटित गुन्हेरी टोळींचे प्रमुख दाऊद, छोटा राजन, शरद शेट्टी, अरुण गवळी, रमा नाईक, अमर नाईक, बाब्या खोपडे (गोल्डन गँग) हे असेच त्यांच्या गुन्हेगारी कॉर्पोरेट्सचे अध्यक्ष होते. त्यांच्या नियंत्रणाखाली टोळीचे काम प्रत्यक्ष चालविणारा गुंड असायचा, जसे कॉर्पोरेटमध्ये सीईओ असतो. एखाद्या गडगंज संपत्ती असलेल्या व्यापाराचे अपहरण करायचे, त्याच्याकडूनं खंडणी उकळायची आणि नंतर सोडून द्यायचे. आपली जरब बसवण्यासाठी दुकानावर, गाडीवर गोळीबार करायचा, प्रसंगी एखाद्दुसऱ्या व्यावसायिकाचा मुडदा पाडायचा, असे सारे काम तडीस नेण्याची जबाबदारी या सीईओची असते. त्या काळातही संदेशवहनाची मर्यादित साधने उपलब्ध असताना आपल्या टोळीचा दबदबा वाढत राहवा म्हणून माझ्यासारख्या गुन्हेगारी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या संपर्कात असलेले सूत्र लगेच बातमी पोहोचवायचे. बातमीत टोळीचे नाव अवश्य टाका, अशी विनंती करायलाही ते विसरायचे नाहीत. कारण फक्त इतकेच की, त्यांना त्यांच्या टोळीची जरब बसवायची असायची. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी यायची आणि इतर व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरायची. मग या टोळ्यांचे काम आणखी सोपे व्हायचे.
सावजावर पाळत ठेवणे, त्याचे अपहरण करणे, अपहरण केल्यानंतर त्याला ठेवण्याची व्यवस्था करणे, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, वेळप्रसंगी मारहाण करणे, हे सर्व काम वेगवेगळे लोक करायचे. तशी जबाबदारी वाटून दिली जायची. पाळत ठेवणारी व्यक्ती दुसरी कामं करायचा नाही. जेवण आणून देणारी व्यक्ती इतर कामं करणार नाही. मारहाण करणारी व्यक्ती जेवण देणार नाही. सावज ज्या जागी ठेवायचे ती जागा कोणाची आहे, त्याचा मालक कोण, हे फक्त सीईओलाच माहीत. पाळत ठेवणाऱ्या टीमला वॉचर असे म्हणतात. हत्त्या करायची असेल तर आरोपींना म्हणजेच शूटर्सना शस्त्र पुरवणारी टीम वेगळी. शस्त्र देणाऱ्यांना पैसा पुरवणारा वेगळा. प्रत्यक्ष हत्यार चालवणारी मुले वेगळी. हल्ल्यानंतर त्यांना पळवून नेण्याची जबाबदारी असलेली मुले वेगळी. या सर्वांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम सीईओ करायचा. या टीममध्ये कोणीही एकमेकांना ओळखायचे नाही. त्यांनी एकमेकांना पाहिलेले नसायचे. एकमेकांशी बोललेले नसायचे. पण, काम कसे चोख व्हायचे. आजच्या संघटित गुन्हेगारी यंत्रणेचेही बेसिक तेच आहे. याच मूलभूत पायाला आता अत्याधुनिकतेची जोड देण्यात आली आहे.
एखादा खून किंवा हत्त्या गाजली आणि सरकार तसेच पोलीस अधिकारी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती झाली की, मग हा सीईओ काही जणांना आरोपी म्हणून हजर करतो. हे एक वेगळे जग आहे. वेगळी दुनिया आहे. येथे आरोपी बोगस, त्यांना जामीन देणारे बोगस, पंच बोगस, अटकेचा देखावा बोगस, सारे काही बोगस… प्रत्यक्षात हे आरोपी हजर होत नाहीत. त्यांना पोलिसांनी कुठेतरी छापा घालून पकडल्याचा सर्व शो केला जातो. यासाठी पोलीस आपल्यासोबत दोन माणसेही नेतात. या माणसांना पंच म्हणून दाखवले जाते. जे सर्व अटकनाट्याचे न्यायालयातले साक्षीदार असतात. म्हणजेच पंच पोलिसांचेच असतात. ते प्रत्यक्षदर्शी असत नाहीत. सर्व बनाव रचून आरोपी पकडल्याचे जाहीर केले जाते. या काळात या आरोपींच्या घरच्यांची काळजी संबंधित टोळी घेते. त्यांना काय हवं, नको हे पाहणे, ठरल्याप्रमाणे पैसे पोहोचते करणे, या सर्व गोष्टी होतात. याच प्रक्रियेत टोळीत एखादा सदस्य जरा जास्त डोके वर काढू लागला तर त्याची टीप देऊन पोलिसांकरवी त्याला उचलले जाते किंवा एन्काऊंटर केले जाते. किंवा कोणत्या तरी केसमध्ये आरोपी म्हणून सडवले जाते. हे सर्व काम सीईओच करतात. हे जे हजर केले जाणारे आरोपी असतात त्यांचे कामच ते असते की कोणता ना कोणता गुन्हा आपल्या अंगावर घ्यायचा आणि जेलमध्ये जायचे. जेलमध्ये त्यांची पूर्ण सेटिंग असते. त्यांना सगळं खाऊपिऊ मिळतं. मसाज, अंमली पदार्थ, बाई-बाटली, मोबाईल, सारेकाही दिमतीला असते. पंच बोगस, आरोपी बोगस असल्यामुळे न्यायालयात पोलिसांची बाजू टिकत नाही आणि काही काळाने हे आरोपी जामिनावर सुटतात. मग, पुन्हा एखादा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ते मोकळे… म्हणून पोलिसांच्या भाषेत त्यांना ‘जेल बर्ड’ म्हणतात. संघटित गुन्हेगारीतल्या बहुतांश प्रकरणात असे जेलबर्डच पकडले जातात. त्यामुळे खरे आरोपी प्रत्यक्षात गजाआड होतच नाहीत आणि संघटित गुन्हेगारी बोकाळातच राहते. याला चाप लावायचा असेल तर खरे आरोपी गजाआड झाले पाहिजेत. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तरच अशा गुन्हेगारीला आळा बसेल. नाहीतर उद्या महाराष्ट्राचे गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आणखी कोणाकडे जाईल, पण त्याने मुडदे पडायचे थांबणार नाही!
(लेखक किरण हेगडे ज्येष्ठ पत्रकार आणि किरण हेगडे लाईव्हचे संपादक तसेच गुन्हेगारीविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

