Homeबॅक पेजसमकालीन भान आणि...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती, याचा त्यांच्या खास शैलीत वेध घेतला आहे. ‘जेन झी : बंडखोर पिढी की बदलत्या पहिल्या जगाची पिढी’, या परिसंवादात पुष्कर सामंत, समीर कर्वे, संजीवनी खेर, प्रदीप पाटील, डॉ. शीतल नाथगोसावी यांनी ‘जेन झी’च्या मन आणि हृदयातील झंकारांना अचूक पकडले आहे.

मानवी जीवनाच्या विविध अंगांना प्रभावित केलेल्या अनेक शोधांच्या नेमक्या अंतःप्रेरणा काय होत्या, याचा सखोल आढावा पंकज भोसले, संग्राम गायकवाड, अंजली चिपळकट्टी, केतन जोशी, मीनाक्षी पाटील, वीणा गवाणकर, उमा वि. कुलकर्णी, जगदीश नाईक, सुरेश वांदिले, सुहास किर्लोस्कर यांनी घेतला आहे. पंकज कुरुलकर, वसंत वाहोकार, श्रीकांत बोजेवार, मानसी होळेहोन्नूर, वसुंधरा घाणेकर, रूपा रेगे-नित्सुरे, शैलेंद्र शिर्के यांच्या विविध आशय-विषयांच्या कथा; सुषमा शाळीग्राम, विजय पांढरीपांडे, डॉ. वसंत राजपूत यांच्या कादंबऱ्यांचे अंश आणि ‘चित्रातला वसंत माणूस’ (मधुकर धर्मापुरीकर) व ‘भाऊ पाध्ये – एक अवलिया’ (रविप्रकाश कुलकर्णी) या दोन प्रतिभावंतांच्या शताब्दीनिमित्तच्या लेखांनी अंकाचे साहित्यिक मूल्य द्विगुणित झाले आहे.

‘जेन झी’च्या कवितांचा वैशिष्ट्यपूर्ण वेगळा भाग नव्या पिढीच्या जाणिवा, अपेक्षा आणि मनातील गुजगोष्टी हळूवारपणे आपल्यासमोर उलगडतो. कविताचा हा वेगळा विभाग संकेत म्हात्रे, भगवान निळे, सायमन मार्टिन, संजय चौधरी, मंगेश विश्वासराव, पल्लवी प्रभुपाटकर यांच्या कवितानी सजला आहे. विशेष लेख, प्रवासवर्णन, नव्या-जुन्या नामवंत कवींच्या कविता यांनी हा अंकाची रंजकता वाढली आहे.

या अंकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाकर नेमाडे यांची ‘सांबरीमातेचा भगत’ ही अद्भुत अशी संपूर्ण कादंबरी. विस्मरणात गेलेल्या या कादंबरीचा शोध घेऊन ती या अंकात प्रकाशित करण्यात आली आहे. अद्भुतरम्यता, रहस्य, गूढ, मंत्रसाधना, अतींद्रिय शक्ती अशा गुणवैशिष्ट्यांनी भरलेली ही कादंबरी वाचकांना क्षणोक्षणी थक्क करते, धक्के देते आणि एक अकल्पित सावटही पसरवते. ही कादंबरी प्रकाशित करून संपादकांनी एका प्रतिभाशाली, पण विशेष प्रसिद्ध न पावलेला व दखल न घेतल्या गेलेल्या लेखकाचा उचित सन्मान केला आहे.

(हेमांगी दिवाळी २०२६, पृष्ठे- ३१०, संपादक- प्रकाश कुलकर्णी, संपर्क- ९८२१०८०१२५)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत...
Skip to content