गेल्या काही दिवसांपासून सगळ्या वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून एकाच विषयाची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार की नाही? संपूर्ण दिवाळीतही हाच विषय चर्चेत होता. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार ह्यांची तशी इच्छा होती की, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट ह्यांचे विलीनीकरण व्हावे. शरद पवार रुग्णालयात असतानाच तेथे त्यांची भेट घेणाऱ्यांची रीघ लागली होती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ह्यांनी शरद पवारांची ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ह्यांनी अजितदादा असताना तशी चर्चा झाल्याचे मान्य केले. त्यामुळे अजूनच गोंधळात भर पडली. हेच सुनील तटकरे अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर विलीनीकरणाची काही चर्चा नाही, असे म्हणाले होते. इतकेच नव्हे, तर ह्याच तटकरे आणि पटेलांनी अजितदादांच्या अपघातानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन सुनेत्रा पवार ह्यांची दादांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्याचा घाट घातला आणि अगदी तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार ह्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना तेथेच विराम मिळाला असे वाटत होते.

तेव्हाही शरद पवार गटाचे अनेक नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अजितदादांची इच्छा होती, असे सांगत होते. अगदी स्वत: शरद पवारांपासून ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ह्यांच्यापर्यंत. मात्र तेव्हा अजितदादा गटाच्या नेत्यांनी सतत नकार दिला. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दरम्यानच्या काळात अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय पवार ह्यांचे वर्चस्व वाढले आहे. प्रत्येक निर्णय तेच घेतात आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्यांना पक्षात काहीच किंमत उरली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. तोच प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे ह्यांचे नेतृत्त्व अनेक जणांना मान्य नाही. त्यामुळे विलीनीकरण का आणि कसे होणार हा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ह्यांची भेट घेतली. नंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ह्यांनीही भेट घेतली. दरम्यान तटकरे ह्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. ह्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार ह्यांनी ह्याबाबत बोलताना वेळ आली की सगळ्यांना कळेलच, असे संदिग्ध विधान केले आहे, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे ह्यांनी आमच्याकडे तसा काही प्रस्ताव आलेला नाही, असे जाहीर केले आहे. सुप्रियाताईंनी तर माझा दादा गेला आणि हा विषयही संपला, असे म्हटले आहे.

खरेतर ह्या विलीनीकरणाच्या परिणामांबद्दल कुणीही बोलत नाही. जर खरेच विलीनीकरण झाले तर पक्षाची सूत्रे कुणाकडे जाणार, हा कळीचा मुद्दा आहे. कुणीही म्हणेल की शरद पवार. पण मग सुनेत्रा पवारांना हे मान्य आहे का? आणि जर अजितदादा गटाकडे ४१ आमदार आहेत तर पक्षाचा अध्यक्ष त्यांचा राहील, असे म्हटले तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे ह्यांना सुनेत्राताईंचे नेतृत्त्व मान्य होईल का? हा खरा प्रश्न आहे. बरं, खरेच जर विलीनीकरण झाले तर पवारांचा पक्ष सत्तेत सहभागी होणार का? की स्वतंत्र गट म्हणून राहणार? मग, सध्या सत्तेत सहभागी असलेला राष्ट्रवादी पक्ष सत्ता सोडणार का? तर नाही. सत्ता कुणीही सोडणार नाही. उलट शरद पवारांचा गट सत्तेत सामील झाला तर आपल्यातली मंत्रीपदे विभागली जातील ही शंका अजितदादांच्या गटातील नेत्यांना आहे. मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, विलीनीकरण आम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही. शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट ह्यांनीही सत्तेतील मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय असा निर्णय होणार नाही, असे म्हटले आहे. त्यातच शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत रोज ह्या चर्चांना खतपाणी घालतच आहेत.

खरेतर हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे राऊतांनी ह्यात नाक खुपसायची काही गरज नाही. पण फडणवीसांच्या वक्तव्याला ते सत्तेचा अहंकार म्हणतात. अजितदादा गटातील २०-२२ आमदार फुटणार म्हणून राऊत ह्यांनी भाकीत वर्तवले आहे. अजितदादा गटाचे ४१ आमदार सत्तेत आहेत. मात्रीपदे भूषवत आहेत. तर ते का पक्ष सोडून जातील? उलट उबाठाचे आमदार त्यांच्या नाकाखालून पळून एकनाथ शिंदेंकडे गेले ते त्यांना कळलेही नाही. पण काय बोलणार? ते संजय राऊत आहेत. सगळ्या पक्षांच्या अंतर्गत घडामोडींबद्दल बोलण्याचा हक्क त्यांच्याकडे आहे. संसदेत भाजपाला महिला आरक्षण विधेयकासाठी अतिरिक्त पाठिंब्याची गरज आहे. शरद पवार गटाकडे आठ खासदार आहेत. त्यासाठी सुप्रिया सुळे ह्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन भाजप पवारांना खूश करू शकतो. शरद पवार रुग्णालयात अस्ताताना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला होता आणि हम और सुप्रिया देश सम्भालेंगे, आप चिंता मत करना, असे मोदी म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यात कितपत तथ्य आहे हे माहित नाही. पण असे होऊही शकते. राहता राहिला मुद्दा आमदार रोहित पवारांचा. रोहित पवार ह्यांचा विलीनीकरणाला विरोध आहे आणि सत्तेत जायलासुद्धा. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उभरते नेतृत्त्व म्हणून रोहित पवारांकडे बघितले जाते. रोहित पवारही पक्षात अजितदादांची जागा घेऊ इच्छितात. मात्र खरेच हे कथित विलीनीकरण झाले तर उद्या सुप्रिया-रोहित पवार, पार्थ आणि जय पवार असा पवार कुटुंबातच संघर्ष होऊ शकतो. मग तो कोण व कसा निस्तरणार?
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

