मराठी नाट्यसृष्टीत सध्या एक वादळ उठलंय. कलाकारांनी मानधनवाढीची मागणी केल्याने त्यांना नाटकातून काढून टाकल्याची घटना चांगलीच गाजते आहे. सगळ्या सोशल मीडियावर ह्याबाबतचे अनेक रील्स, पोस्ट्स, मुलाखती चालू आहेत. निमित्त आहे आमने सामने, ह्या नाटकातून रोहन गुजर आणि केतकी विलास, ह्या कलाकारांना अचानक नारळ देण्यात आला. तोही कलाकार आणि आता निर्माते असलेले मंगेश कदम आणि लीना भागवत ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ नाट्यकर्मींकडून. आमने सामने, हे नाटक गेली सात वर्षे रंगभूमीवर सुरु आहे. काही दिवस चालून ते बंद झाले होते. मग पुन्हा सुरु झाले. मग कोरोनामुळे नाटके बंद होती. मात्र पुन्हा नव्याने सुरु झाल्यानंतर हे नाटक धो-धो चालू लागले. सतत हाऊसफुल प्रयोग होत आहेत. त्यामुळे रोहन गुजर आणि केतकी विलास ह्या दोन कलाकारांनी त्यांचे मानधन वाढवून मागितले. त्यामुळे चिडून निर्मात्यांनी त्यांना नाटकातूनच काढून टाकले आणि दुसऱ्या कलाकारांना घेऊन नाटक चालू ठेवले. विशेष म्हणजे ह्या दोन्ही कलाकारांना उद्यापासून तुम्ही ह्या नाटकात नाही, असे प्रयोग संपल्यावर अचानक सांगण्यात आले. त्यामुळे त्या कलाकारांना धक्का बसला.
निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम ह्यांनी त्यांची बाजू मांडणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. त्याला उत्तर देत रोहन आणि केतकी ह्यांनीही त्यांची बाजू सांगणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. त्यामुळे आता ह्यावर अनेक कलाकार, निर्मात्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर ह्यांनी ह्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कलाकारांनी मानधन वाढवून मागणे ह्यात काही चूक नाही. ही वाढ जर द्यायची नव्हती तर निर्मात्यांनी कलाकारांना विश्वासात घेऊन बोलायला पाहिजे होते. त्यांना पूर्वकल्पना द्यायची होती. अचानक काढून टाकणे योग्य नाही. कितीही झाले तरी ते गेली सात वर्षे तुमच्याबरोबर नाटकात होते ना… तुमचे सहकलाकार होते ना… मग असे अचानक त्यांना काढून टाकणे चुकीचे आहे, असे मत मांजरेकर ह्यानी मांडले, तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते ह्यांनीही ह्या सर्व प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. चर्चेने प्रश्न सोडवता आला असता, असं त्यांना वाटते.

कलाकारांनी तिसऱ्यांदा मानधनात वाढ मागितली, म्हणून त्यांना नाटकातून काढून टाकलं, असे निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत ह्यांचे म्हणणे आहे. तर ह्यावर रोहन गुजर आणि केतकीचे म्हणणे आहे की, गेल्या आठ वर्षांत तिसऱ्यांदा मानधनात वाढ मागितली तर त्यात काय चुकले? सरकारी नोकरीतही दरवर्षी पगारवाढ होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोव्हिडनंतर पुन्हा जेव्हा नाटके सुरु झाली तेव्हा नाट्यगृहात फक्त ५० टक्केच प्रेक्षक बसवता येत होते. त्यावेळी निर्मात्यांनी कालाकारांच्या मानधनातही ५० टक्के कपात केली आणि ती रोहन आणि केतकी ह्यांनी मान्य केली. मग आता नाटक जर धो-धो चालले आहे, तर मानधनात वाढ मागितली तर काय बिघडले? बरं वाढवणे शक्य नव्हते तर कलाकारांना तसे सांगायला पाहिजे होते. सरकारी किंवा खाजगी नोकरीतही एक महिन्याची नोटीस दिली जाते.
ह्यानिमित्ताने मराठी रंगभूमीवर कलाकार आणि निर्माते ह्यांच्यात लेखी करार असणे आवश्यक वाटते. कारण सध्यातरी अशी लेखी करारपत्राची पद्धत नाही. त्यामुळेच असे वाद होतात. कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचेही निश्चित मानधन, मानधनवाढीचा कालावधी, प्रयोगांची संख्या आणि दौऱ्यांचा कालावधी, हे सगळे लेखी कराराच्या रुपात असल्यास बरे होईल. कलाकारांना नाटक सोडायचे असल्यास, किंवा निर्मात्यांना त्यांना काढायचे असल्यास, पूर्वसूचना देणे आवश्यक असावे. ह्यामुळे कलाकार आणि निर्माते ह्यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक राहतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही. अर्थात मराठी रंगभूमीच्या इतिहासात कलाकारबदल ही काही नवी गोष्ट नाही. ह्यापूर्वीही अनेकदा नाटकांतील कलाकार बदलूनही त्या नाटकाचे भरपूर प्रयोग झाले आहेत. काही वेळा कलाकारांच्या वैयक्तिक अडचणीमुळे, काही वेळा तो कलाकार इतरत्र काम करत असेल तर त्याच्या तारखा प्रयोगासाठी उपलब्ध नसतात. काही वेळा निर्मात्यांच्या सोयीसाठी कलाकार बदलले आहेत आणि पुढे त्या नाटकाचे शेकड्यांनी प्रयोगही झाले आहेत.
मानधनाचा वादही मराठी रंगभूमीला नवीन नाही. ह्याआधीही भद्रकाली, नाट्यसंपदा अशा संस्थांमध्ये मानधनावरून वाद झाले होते. मात्र आमने सामने नाटकातल्या कलाकारांना असे अपमानित करून काढून टाकणे योग्य नव्हते. बरं, ह्या कलाकारांचा निर्मात्यांना काही त्रासही नव्हता. उशिरा येणे, तारखा न देणे, दौऱ्यात निर्मात्याला त्रास देणे, अशा कुठल्याही तक्रारी ह्या कलाकारांबाबत नव्हत्या. तरीही त्यांना असे अपमानित करून, पूर्वसूचना न देता नाटकातून काढून टाकणे, हा निषेधार्ह प्रकार आहे. असे व्हायला नको होते, असेच सगळ्या नाट्यकर्मींचे म्हणणे आहे. पाहुया हा वाद किती चिघळतो ते!
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि नाट्यकलाविषयक घडामोडींच्या अभ्यासक आहेत.)

