Homeकल्चर +मुंबईत येत्या २०...

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव म्हणजे संगीतप्रेमींसाठी स्वरानंदाची एक अनोखी मेजवानी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवातही देशातील विविध घराण्यांच्या संगीतपरंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंत कलाकारांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ २० नोव्हेंबरला बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक डॉ. दिवाकर कश्यप आणि डॉ. प्रमाकर कश्यप (कश्यप बंधू, चंदीगड) यांच्या सहगायनाने होणार आहे. त्यांच्या स्वरमधुर गायनाला तबल्यावर स्वप्नील मिसे, तर संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांची समर्थ साथ लाभणार आहे. २१ नोव्हेंबरला इंदूर घराण्याच्या सुप्रसिद्ध सतारवादक अनुपमा भागवत (बेंगळूरू) आपल्या सतारवादनातून सुरांची अनोखी दुनिया रसिकांसमोर उलगडणार आहेत. त्यांच्या सतारवादनाला तबल्यावर यशवंत वैष्णव यांची साथ लाभणार आहे. सतारीच्या तारांतून उमटणारे स्वर, रागदारीचे वैभव आणि लयकारीचा मनोहारी आविष्कार ही या मैफिलीची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. महोत्सवाच्या अंतिम दिवशी, २२ नोव्हेंबरला किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अर्णव चटर्जी (कोलकाता) यांच्या गायनाची मैफल रंगणार आहे. त्यांच्या गायनाला तबल्यावर तेजोव्रत जोशी, तर संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांची साथ लाभणार आहे. यामध्ये अभिजात रागदारी, स्वरांची भावसमृद्ध मांडणी आणि किराणा घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

या महोत्सवातील सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वातानुकूलित सभागृहात सुरू होतील. दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि कलाकारांच्या सादरीकरणातील अभिजातता यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची स्वतंत्र ओळख आहे. तीन दिवस, तीन दिग्गज सांगीतिक व्यक्तिमत्त्वे आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अवीट स्वरानंद! मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा महोत्सव रसिकांच्या स्मरणात दीर्घकाळ दरवळत राहील, यात शंका नाही.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त पूर्वीपासूनच नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ, बुजूर्ग आणि प्रतिष्ठित संगीतकारांच्या मैफिलींचे आयोजन केले जाते. मात्र, २०१५पासून या उपक्रमाला अधिक व्यापक आणि कलात्मक स्वरूप देत तीन नामवंत कलाकारांच्या सहभागातून विशेष संगीत महोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. दोन गायक आणि एका वादकाचा सहभाग असलेल्या या महोत्सवाने गेल्या अकरा वर्षांत संगीतविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या स्वराविष्काराचा आनंद रसिकांना दिला आहे. गेली ७३ वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची उज्ज्वल परंपरा जतन, संवर्धन आणि प्रसारित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र अविरतपणे करीत आहे. संगीतकलेच्या उपासकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नव्या पिढीपर्यंत भारतीय शास्त्रीय संगीताचे सौंदर्य आणि सामर्थ्य पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न नेहमीच स्तुत्य राहिला आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिक माहितीसाठी संपर्क: ७७००९१४४५५.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प होणार व्हेटो अध्यक्ष?

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर ट्रम्प यांचे अध्यक्षपद फक्त नामधारी राहणार आहे. येत्या तीन जानेवारीपर्यंत ट्रम्प यांची सध्याची ध्येयधोरणे अस्तित्त्वात राहतील. मात्र, त्यानंतर त्यांना अमेरिकी काँग्रेस (प्रतिनिधीगृह) तसेच सिनेटमधल्या डेमॉक्रॅटिक...

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...
Skip to content