उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली काही उत्तरे सर्वसामान्यांना कळायलाच हवीत. मी त्यांचा अधिकृत प्रवक्ता नाही. तरीही दोन शब्द बोलतोच. बरेच मागे जावे लागेल.. पूर्वी म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना मराठी माध्यमांनी शिवसेनेची बाजू घ्यायचे सोडा, त्यांच्या बातम्यांनाही स्थान देण्यास मराठी वर्तमानपत्रे त्यावेळी तयार नव्हती. नवशक्ती (तत्कालीन) व काही साप्ताहिके मात्र सेनेच्या बातम्या व उपक्रमांचे वार्तांकन करत असत. अगदी अलीकडे म्हणजे 91पर्यंत शिवसेनेच्या बातम्या राज्य पातळीवर म्हणव्या तशा येत नव्हत्या. मुंबई महापालिकेत प्रथम विरोधी पक्ष व नंतर सत्तारूढ पक्ष झाल्यावर अगदी मर्यादित अर्थाने शिवसेना पत्रकारांसाठी काहीशी सैल झाली. तरीही मराठीतील काही प्रमुख वर्तमानपत्रे शिवसेनाविरोधकच होती. आजकाल जी मंडळी घसा फोडून शिवसेनेची बाजू घेत आहेत ती मंडळी शिवसेनेला पाण्यात पाहत होती.
शिवसेना-भाजपा युतीचे पहिले सरकार आले, त्यावेळी सरकार आले म्हणून बातम्या देणारे, सरकारच्या बातम्या देणारे जसे अनेक होते तसेच काड्या घालणारेही शेकडो होते. थोड्या थोड्या, क्षुल्लक कारणासाठी सरकारला घाम फोडणारेही काहीजण होते. साहेब कठोर असले तरी तो एक संवेदनाशील कलावंत होता. आधीही रमेश प्रभू यांची निवडणूक व नंतरची कोर्ट खेळी त्यांना आवडलेली नव्हती. या सर्वांचा परिपाक असा झाला की, सेना पत्रकारांशी फटकून वागू लागली. पत्रकारांना जितकं लांब ठेवता येईल तितकं ते करू लागले. कुठला सर्वोच्च नेता उठसुठ कार्यकर्त्यांना भेटतो हो! कुणीच नाही. कुणाकडेही जाऊन पाहा. सहाय्य्क तुम्हाला इतके प्रश्न विचारतो की तुम्ही नेत्याला भेटायचा विचारच सोडून द्याल. कोरोना काळातील घरात बसण्याचा उल्लेख होतो तर भाजपचा कुठला नेता फेरफटका मारत होता? सर्वच जण एका मर्यादेत राहून काम करत होते. पण निंदा उद्धवजींचीच होते. शेवटी पत्रकबाजी वा पत्रकारांना हाताशी धरून शिवसेना राजकारण करत नाही. काही ज्येष्ठ मंडळींना पक्षाचे सल्लागार केले नाही, म्हणून साहेबांनी वाढवलेले अनेक जण आज दुसऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. शेवटी संघनायक बदलला की संघही काही प्रमाणात बदलला जातोच.

शिवसेनेच्या स्थापनेपासून मजबूत असलेला हा पक्ष छगन भुजबळ, नारायण राणे व अलीकडे एकनाथराव शिंदे यांनी फोडला आहे. म्हणजे भुजबळ, राणे व शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षांपासून काही नेते वेगळे झाले. महत्त्वाचे म्हणजे भुजबळ व राणे बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना पक्षांपासून वेगळे झाले. एकनाथराव मात्र बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर बंड करून वेगळे झाले. इतकेच नव्हे तर भाजपच्या साहाय्याने मुख्यमंत्रीही झाले. सुरुवातीपासून शिवसेना-भाजप युती असली तरी अगदी पहिल्यापासून भाजपचे अनेक नेते सेनेला कमीच लेखत असत (अजूनही हा सिलसिला चालूच आहे). इतकेच नव्हे तर केंद्रात व राज्यात जेव्हा भाजपचे पंतप्रधान व मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने पद्धतशीरपणे सेनेला दाबण्याचा प्रयत्न केला. साहेबांचा फोन गेला तर मात्र भाजपवाले कामे करत असत. फार काय शिवसेनेला अनेक केंद्रीय व राज्य सरकारच्या समित्यांवर घ्यावं लागेल म्हणून अनेक समित्या नेमल्याच नाहीत. ही यादी वाढवता येईल.
मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाने 60पेक्षा जास्त जागा मिळवल्याने सत्तारुढ पक्ष काहीसा शांत झाला. कारण दोन्ही सेनेच्या नगरसेवकांची संख्या व मित्रपक्ष सदस्यांची संख्या भाजपपेक्षा जास्त होऊ शकते. म्हणून तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मुंबई महापालिकेत ठाण मांडून बसलेले असतात. आतापर्यंत मुंबईचा पक्षाध्यक्ष वसंतस्मृतीमध्ये बसून महापालिका नियंत्रित करत असत. आता मात्र पक्षाला पालिकेत यावे लागते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांना महत्त्वाच्या विषयांवर बोलताच येत नाही. सबकुछ पक्षाध्यक्ष, मुंबई) झाले आहे. जाता जाता, मराठी वर्तमानपत्रे व माध्यमानी जितके दक्षिणेतील प्रादेशिक राजकीय पक्षांचे कौतुक केले, त्यांच्यासंबंधी आवर्जून लिहिले, त्या तुलनेत गेल्या 60 वर्षांत 60 ओळीही शिवसेनेच्या कौतुकात लिहिलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत कोणी कधीतरी विचार करणार आहे ही नाही?
(छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर)
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


परखड निरिक्षण करून केलेले विश्लेषण.