Homeमाय व्हॉईसठाकरे, पवारांनंतर आता...

ठाकरे, पवारांनंतर आता ममता! पुढचा नंबर कोणाचा?

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनेचे ४० आमदार भाजपाच्या छत्रीखाली एनडीएत सामील झाले. आमचीच शिवसेना खरी, असा दावा शिंदेंनी केला व तो निवडणूक आयोगाने मान्यही केला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला मिळाले. ठाकरेंचा पक्ष उबाठा सेना म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षावर एकनाथ शिंदे यांनी कब्जा मिळवला. शिवसेना फोडल्याचे बक्षिस म्हणून शिंदे यांना भाजपाने सुरूवातीला अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद व २०२४च्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. मोदी-शाहांचे भक्कम पाठबळ शिंदेना लाभल्यामुळेच भाजपाचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले. शिंदे व त्यांचे सहकारी भाजपामध्ये गेले नाहीत व भाजपानेही त्यांना त्यांच्या पक्षात घेतले नाही. ठाकरेंची शिवसेना संपली नाही. पण संकुचित झाली आणि शिंदेंची शिवसेना भाजपाच्या कळपात सत्तेत भागीदार झाली. ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर आज भाजपाचे निष्ठावान मित्र म्हणून भूमिका पार पाडत आहेत. मुंबई ते सूरत, गुवाहटी, गोवा असा जो बंडखोरांनी प्रवास केला, त्यामागे नियोजन, संरक्षण, ताकद आणि पटकथा भाजपाची होती. स्वत: देवेंद्र फडणवीस अंधाऱ्या रात्री बंडखोर नेत्यांच्या गाठीभेट घेत होते.

ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युती पंचवीस ‌वर्षांहून अधिक काळ एकत्र नांदली.  १९९५मध्ये युतीचे पहिले सरकार शिवसेनेचे मनोहर जोशींच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाले. पण पुढे सत्तेच्या राजकारणात भाजपाला शिवसेनेचा अडसर वाटू लागला. मोदींचा केंद्रात उदय झाल्यापासून भाजपा एकदम मोठा भाऊ झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पक्षातील सहकारी मंत्र्यांकडून बंडाचा झेंडा फडकवला जाईल व पक्षाचे दोन तुकडे केले जातील याची स्वत: उद्धव यांनाही कल्पना नसावी. ठाकरेंना एकाकी पाडले जाईल, असे कोणाला वाटले नव्हते. पण भाजपाच्या कुशल, मुत्सद्दी रणनितीने शिवसेनेच्या पक्षप्रमुखालाच खच्ची करण्याचे काम केले. चार वर्षांनंतरही ठाकरे व त्यांची शिवसेना त्यातून सावररेली नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा दुसरा प्रयोग २०२३मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर झाला. अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या ४२ आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला. शरद पवारांच्या नेतृत्त्वालाच त्यांनी आव्हान दिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. शिवसेना फॉर्म्युल्याप्रमाणाचे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला मान्यता दिली व घड्याळ हे निवडणूक चिन्हही दिले. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्यावर आवाज उठवून शरद पवार, तारीक अन्वर व पी. ए. संगमा यांनी १९९९मध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आज सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील जे सत्तेच्या पदांवर दिसत आहेत त्या सर्वांना शरद पवारांनीच मोठे केले आहे. पण भाजपाच्या खेळीत शरद पवारांचा पक्ष खच्ची करण्यात आला. आज अजिदादादांचा पक्ष सत्तेत असला तरी भाजपाचा निष्ठावान मित्र म्हणून त्याला काम करावे लागते आहे.

ठाकरे

भाजपाने ऑपरेशन लोटसचा तिसरा प्रयोग नुकताच पश्चिम बंगालमधे केला. वाट्टेल ते करून सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, याचा चंग भाजपाने बांधला होता. निवडणूक काळात साडेतीन लाख केंद्गीय सुरक्षा सैनिक राज्यात तैनात होते. निवडणुकीच्या तोंडावर मुख्य सचिव, पोलीस आयुक्त अशा पाचशेपेक्षा जास्त बड्या नोकरशहांच्या बदल्या केल्या. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, दोन डझन केंद्रीय मंत्री, दिड डझन भाजपाचे मुख्यमंत्री, विविध राज्यांतील हजारो कार्यकर्ते तैनात होते. भाजपाचे २०७ आमदार विजयी झाले. भाजपाने सर्व ताकद पणाला लावूनही तृणमल काँग्रेसचे ८० आमदार निवडून आले. ही संख्या विरोधी पक्ष म्हणून कमी नाही. ममता अजून संपलेल्या नाहीत, हे भाजपाच्या लक्षात आले. ममता यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुवेंधू अधिकारी यांनाच भाजपाने मुख्यमंत्री केले. निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या घरी पोलिसांच्या चकरा वाढू लागल्या. तपासयंत्रणांचे फोन येऊ लागले. ममता यांनी बोलविलेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीला ८० पैकी ६० आमदार गैरहहजर राहीले. पक्षविरोधी कारवायांबद्दल दोघा आमदारांना पक्षातून निलंबित केले गेले. निलंबित केलेल्या आमदारांनीच आपल्याबरोबर तृणमूल काँग्रेसचे ५९ आमदार आहेत, असा दावा करून विधानसभा अध्यक्षांकडून पक्षाला मान्यता मिळवली व विरोधी पक्षनेता म्हणूनही मंजुरी मिळवली. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कारभाराला कंटाळून व त्यांना दोष देऊन या बंडखोरांनी वेगळी चूल मांडली. ममता यांनी पक्षाचे सल्लागार राहवे, अशी त्यांना ऑफर दिली गेली. ममता यांनी काँग्रेसमधे असताना डाव्या पक्षाच्या विरोधात वर्षानुवर्षे रस्त्यावर लढे दिले. अंगावर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. १९९८मध्ये तृणमूल काँग्रसची स्थापना केली. बंगाली अस्मिता सदैव तेवत ठेवली. त्यांच्या लोकप्रियतेपुढे डावे पक्ष व काँग्रेसही संपली. आता त्यांनी उभा केलेल्या पक्षावर त्यांच्याच पक्षातील बंडखोर आमदारांनी कब्जा मिळवला आहे व विधानसभा अध्यक्षांनी त्यांना हिरवा कंदिलही दाखवला आहे. पंश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या बंडखोरांना भाजपाने आपल्या पक्षात घेतले नाही. भाजपाचे तृणमूलीकरण करायचे नाही, असे त्यांना बजावले. त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळाले. त्यांना विरोधी पक्षात बसावे लागेल. सरकार आमचे व विरोधी पक्षही आमचाच असे भाजपाचे सूत्र आहे. ममता यांच्याकडे वीस आमदार राहिले आहेत. उद्धव ठाकरेंचे झाले तशी पाळी भाजपाने ममता बॅनर्जींंवर आणली आहे. पण, ममता कोलकातात काली घाटमधील घरात नव्हे तर पुन्हा रस्त्यावर उतरलेल्या दिसतील. भाजपा विरूद्ध तृणमूल आणि पोलीस विरूद्ध ममता असा संघर्ष बघायला मिळेल.

ठाकरे

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

सरसंघचालकांचा हा संवाद आधीच झाला असता तर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत, 'इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' या कार्यक्रमात जेन झी व जेन अल्फा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीतील युवकांना संबोधित केले. नीता आंबानी इंटरनॅशनल कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक...

भाजपाला इशाराघंटा!

बिहारमधे गेली तीस वर्षे भाजपाचा गड असलेल्या आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांना चार टर्म निवडून देणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा दणदणीत झालेला विजय ही शक्तिशाली भाजपाला इशाराघंटा आहे. केंद्रात व...

जेन झीच्या सहानुभूतीसाठी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

राजधानी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असताना आणि कडक सुरक्षाव्यवस्था असताना संसद चलो.. म्हणून निघालेल्या विद्यार्थी आंदोलकांच्या जमावावर पॅलेट गन्स कोणाच्या आदेशाने चालवल्या? बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर एके-४७मधून पोलिसांनी केलेला गोळीबार कोणाच्या आदेशाने झाला, या प्रश्नावरून विरोधी पक्षांनी काहूर उठवले आहे....
Skip to content