Homeन्यूज अँड व्ह्यूजराष्ट्रवादीत आग लावण्यात...

राष्ट्रवादीत आग लावण्यात थोरले पवार यशस्वी!

अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. नव्याने पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांची दोन्ही मुले, पार्थ आणि जय पवार ह्यांच्यात आणि अजितदादा गटातील नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे ह्यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. इतका की, सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे  ह्यांच्या नावाचा राष्ट्रीय कार्यकारिणीत उल्लेख केला नाही. त्यांची नावे केवळ पटेल हे राज्यसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते तर तटकरे लोकसभेतील गटनेते असा उल्लेख केला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात केवळ कार्यकारिणी सदस्यच येऊ शकतात, इतरांना कार्यालयात यायलाही परवानगी नाही, असाही आदेश काढला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. निवडणूक आयोगाला सुनेत्राताईंनी पाठवलेले हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ती केवळ क्लेरीकल मिस्टेक आहे, असे सांगून वेळ मारून नेली आहे. पण दोन्ही मुलांपुढे त्यांचे काही चालत नाही असे दिसते आहे. अजितदादा ह्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर केवळ त्यांच्याच कुटुंबाचे वर्चस्व असावे, ह्या भावनेतून हा संघर्ष उद्भवला आहे, असे वाटते. सुनेत्रा पवारांनी ह्याआधीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून पटेल-तटकरे ह्यांच्या सहीच्या पत्राची दाखल घेऊ नये, असे संगितले होते, तर पटेल-तटकरे ह्यांनीही त्यांच्या मतदारसंघातल्या जाहीर कार्यक्रमात अजितदादांचा फोटो न लावल्याने हा संघर्षा अधिक तीव्र झाला. आता पुन्हा पटेल आणि टकारे हे दोन्हीही नेते त्यांच्या पदावर कायम असल्याचे राष्ट्रवादी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. सुनेत्रा पवार ह्यांच्या सूचनेवरून, पक्षाचे प्रवक्ते उन्मेष पाटील ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केले. प्रफुल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे पक्षांतर्गत कलह तात्पुरता मिटण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार लवकरच, पक्षाची बैठक घेणार असल्याचे कळते.

राष्ट्रवादी

खरेतर तटकरे आणि पटेल ह्यांनी अजितदादांच्या निधनानंतर तीन दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना भेटून सुनेत्रा पवार ह्यांची दादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घडवून आणला होता. ह्याबाबत त्यांच्यावर टीकाही झाली. पण पक्ष शरद पवारांच्या हाती जाऊ नये म्हणून हे तातडीचे पाऊल उचलले गेले. आणि त्याला सुनेत्रा पवारपण राजी होत्या. पण त्याचवेळेस दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात होत्या आणि हीच दादांची अखेरची इच्छा होती, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक नेते सांगत होते. त्या विलिनीकरणाच्या चर्चेला खीळ बसली. त्यातच पुण्यातील मुंढवा येथील अमेडिया कंपनीच्या बेकायदेशीर जमीन व्यवहारातून पार्थ पवार, त्यांचे नाव कागदोपत्री कुठेही नसल्याने, क्लीन चिट मिळाली. त्यानंतर त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आले. आता ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत. त्यामुळे पक्षात त्यांचे महत्त्व वाढले. म्हणूनच नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना सरचिटणीस म्हणून स्थान मिळाले तर जय पवारांना राष्ट्रीय चिटणीस आणि कोशाध्यक्ष. त्यामुळे पक्षावर पवार कुटुंबाचाच ताबा मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत, असे म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांनी एकूण 22 जणांची नावे पाठवली आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भूजबळ आणि दिलीप वळसे पाटील ह्यांची नावे आहेत. सुनेत्रा पवार आता पक्षाची नव्याने घडी बसवू पाहत आहेत का? असे असेल तर नव्या पिढीचे जुन्या ज्येष्ठ नेत्यांशी सूर जुळतील का? पक्षात भूजबळ, दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकारी, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ असे अनेक वर्षे दादांबरोबर काम केलेले नेते आहेत, त्यांचे काय? पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे ह्यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊन, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. इतर नेत्यांचे काय होणार?

राष्ट्रवादी

ह्या सर्व वादाचे मूळ आहे रोहित पवारांची पटेल आणि तटकरे ह्या दोन्ही नेत्यांवर होणारी बोचरी टीका. आधी स्वत:च्या पक्षाची स्थिती काय आहे हे न बघता रोहित पवार अजित पवारांच्या पक्षाला लक्ष्य करून सतत टीका करत आहेत. त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टींवरही भाष्य करत आहेत. सुनेत्रा पवार आणि पटेल-तटकरे ह्यांच्यात दरी पडण्यात ते यशस्वी  झाले आहेत, असे म्हणावे लागेल. अर्थात रोहित पवारांचा बोलविता धनी स्वत: शरद पवार आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय रोहित पवार अशी वक्तव्यं करणार नाहीत. रोहित पवारांची मजल इथपर्यंत गेली की, सुनेत्रा पवार ह्यांनी भाजपची साथ सोडावी, महायुतीतून, सत्तेतून बाहेर पडावे, रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, अशीही वक्तव्यं त्यांनी मीडियासमोर केली. एकूणच रोहित पवार बारामतीमध्ये अजितदादांची जागा घेऊ बघत आहेत. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली होती. मात्र त्यांना दादांच्या पक्षाने फारशी साथ दिली नाही. आता एका कथित ऑडिओ क्लिपचा हवाला देऊन रोहित पवार म्हणत आहेत की, सुनेत्राकाकींनी ती क्लिप ऐकली आणि नंतर असा निर्णय घेतला.  इतकेच नाही तर अजितदादांचे पटेल-तटकरे ह्यांच्याबद्दल फारसे चांगले मत नव्हते, असाही दावा रोहित पवारांनी केला आहे. आणि आता अपेक्षेप्रमाणे पटेल आणि तटकरे ह्यांनी शरद पवारांची भेट घेऊन पार्थला जरा समजावा, आम्हीही पक्षासाठी कष्ट उपासले आहेत, असे सांगितल्याचे कळते. पण पार्थ पवार सध्या कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे ह्याचा किती फायदा होईल, माहित नाही. पण ह्यामुळे अजितदादांच्या पक्षात पुन्हा फूट पडेल का, की शरद पवारांना हवे तसे दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होऊन दोन्ही पक्ष त्यांच्याच ताब्यात राहतील, हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. अशावेळी पटेल-तटकरे ह्यांना अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्यावाचून पर्याय राहणार नाही. ह्या सगळ्या अंतर्गत कलहावर सुनेत्रा पवार कशी मात करतात, हे पाहवे लागेल.

(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महिलांची सुरक्षितता ही प्रत्येकाचीच जबाबदारी!

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुका, विधान परिषद निवडणुका, महाराष्ट्रदिनाचा उत्सव, आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकामागोमाग एक अनेक प्रकरणे, गेल्या काही दिवसात उघडकीस येत आहेत. त्यामुळे वाटते की, ह्या महाराष्ट्रात चालले आहे तरी काय? मुली, महिला, अगदी वृद्धासुद्धा इथे सुरक्षित...

किती काळ टिकणार प्रताप सरनाईकांचा ‘मराठी’ बाणा?

अखेर महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील रिक्शा-टॅक्सी चालकांना मराठी बोलण्याची सक्ती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आणि हे अपेक्षितच होते. १ मेपासून राज्यातील सर्व रिक्शा आणि टॅक्सीचालकाना मराठी बोलता येणे आवश्यक होते, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्याचा आदेश राज्याचे परिवहनमंत्री...

महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांची राष्ट्रीय पातळीवर दखल

मुंबईसह महाराष्ट्रात लव्ह जिहादची एव्हढी प्रकरणे बाहेर येत आहेत. भोंदू अशोक खरात आणि त्याच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या, शोषणाच्या, फसवणुकीच्या कथा गेला महिनाभर बाहेर येत आहेत, त्याच्या व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. नाशिकमधील टीसीएस, ह्या नामवंत कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण गाजते...
Skip to content