दोन, अडिच हजार रुपयांचे तिकीट काढून पाहण्यासारखे असं आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर २’ या चित्रपटात आहे तरी काय, यावर सोशल मीडियावर चर्चा होतेय आणि त्यातूनच या चित्रपटाबाबतचे कुतूहल वाढून आपणही ‘धुरंदर २’ पाहायला हवा असे वाटत असतानाच सगळ्यात पहिला प्रश्न येतोय तो, यापेक्षाही कमी तिकीट दरात हा तब्बल चार तासांचा चित्रपट कुठे बरं पाहायला मिळेल? हवं तर मध्यंतरात काहीही खाणार नाही. ते पैसे वाचवू. आता कोणी गंभीरपणे म्हणेल, तुम्ही फारच मध्यमवर्गीय विचार करता हो… आणि तुम्ही असा आपल्या खिशाला, हा सर्व प्रकारचा मसाला खच्चून भरलेला चित्रपट कसा बरं परवडणार असा विचार करेपर्यंत अनेकांनी आपलं ऑनलाईन तिकीट बूक केलेदेखील. मग आपल्या लक्षात येते की, अगदी सकाळी पावणेनऊच्या खेळाचे तिकीट किमान चारशे रुपये आहे. आणि मग ते दुपारच्या शोपासून वाढत वाढत जातं. चित्रपटात फरक नाही. तो पाहण्याच्या वेळेनुसार फरक आहे. एखाद्या माॅलमधील स्क्रीनमध्ये हजार रुपये तिकीट आहे. हजार रुपये तिकीट दरही फारच हो…
गंमत म्हणजे, हजार असो, बाराशे असो, दोन हजार रुपये असो हे तिकीट दर सहज परवडणारा फार मोठा नवश्रीमंत व उच्चभ्रू प्रेक्षकवर्ग आपल्या देशातील शहरी भागात आहे. धुरंदर २, हा चित्रपट एकाचवेळी हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करून प्रदर्शित झाला आहे. धुरंदरच्या अक्राळविक्राळ क्रेझचा फायदा उठवण्यासाठी त्याचा हा दुसरा भाग असा अन्य प्रादेशिक भाषेसह प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या विषयावर उलटसुलट भाष्य होत आहे. पण या चित्रपटाच्या कलादिग्दर्शन, लोकेशन, उच्च दर्जाचे छायाचित्रण आणि व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर आणि संकलन या जमेच्या बाजू आहेत आणि या पाहायच्या तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या आणि जबरदस्त साऊंड सिस्टीम असलेल्या मल्टीप्लेक्स स्क्रीनवरच हा चित्रपट पाहायला हवा. आणि मग तोच एक्सपिरियन्स घ्यायचा तर महागडं तिकीट काढा.

बरं, या वा अशा चित्रपटाचे बजेट अवाढव्य असते म्हणून तर तिकीटदर चढे असतात असेही म्हणता येणार नाही. ते बजेट किती वाढवावं याचा विचार करता येतो. तरी बरं, धुरंदर आणि धुरंदर २च्या पूर्वप्रसिद्धीचा अधिकाधिक फोकस त्याचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर यावरच ठेवला आणि चित्रपट प्रदर्शित होत असताना सोशल मीडियात काही उलटसुलट ब्रेकिंग न्यूज पेरल्या. भारंभार मुलाखतीचे वाटप केले नाही. त्यातून प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवता येईल अशी अपेक्षा ठेवली नाही ही गोष्ट अधोरेखित करता येण्यासारखी आहे. राकेश बेदी आणि एखाद्या कलाकाराने एखादंदुसरी मुलाखत दिली इतकेच. तरी चित्रपट आपली हवा निर्माण करण्यात चांगलाच यशस्वी ठरला. दोन्ही धुरंदरचे यश उच्च दर्जाचे मेकिंग आणि फोकस मार्केटिंग प्रमोशन यात आहे. त्यापासून काही शिकता येईल.
आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, पसरवला तो मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय चित्रपटरसिकांनी. स्वप्नाळू, आशावादी, कष्टकरी वर्गाला दिलासा देणारं माध्यम म्हणजे चित्रपट. आणि याच वर्गाने आपल्या देशातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स, ग्रामीण भागातील तंबू थिएटर्स, ओपन थिएटर यातून टाळ्या-शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घेऊन चित्रपट एन्जॉय केले. आणि तेदेखील मुठीत चिल्लर पकडून तिकीट खिडकीत हात घालून तिकीट मिळवत आपली हौसमौज पूर्ण केली. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण जी. पी. सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५)च्या वेळी मुंबईतल्या मिनर्व्हा चित्रपटगृहात अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे असलेले तिकीटदर त्या काळात महाग वाटले होते. पण चित्रपट आवडू लागला आणि ते तिकीटदर रुळले. सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ (१९९१)च्या वेळी मुंबईतल्याच मेट्रो चित्रपटगृहात बाल्कनीचे तिकीटदर पंचवीस रुपये असल्याची एका मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावरची बातमी झाली. कारण ते महाग होते. त्या काळात महिना दोन, सव्वादोन हजार रुपये पगारही भारी वाटे. त्यात पंचवीस रुपये तिकीट महागच.

आज हे सगळेच तिकीटदर किरकोळ अथवा चिल्लर वाटावेत असे वाढ वाढ वाढलेत आणि ते होताना मल्टीप्लेक्स कल्चर चित्रपटांपेक्षा मोठं ठरु लागलेय. तिकडचं ग्लॅमरस वातावरण, फूड पाॅईट वा फूड माॅल, महागडे समोसा, पाॅपकाॅर्न आणि शीतपेये, चकाचक वास्तू या सगळ्यात चित्रपट एन्जॉय करण्याची आज किंमत द्यावी लागतेय. कधीकाळी मुंबईतल्याच गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह अथवा इंपिरियल, स्वस्तिक चित्रपटगृहात जुन्या चित्रपटासाठी मॅटीनी शोला स्टाॅलला एक रुपया पाच पैसे आणि नियमित खेळाला नवीन चित्रपटासाठी हेच तिकीटदर एक रुपया पासष्ट पैसे असे असत. हे आज आठवूदेखील नये इतकी आज तिकीटदर संस्कृती पुढे गेली आहे…
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

