Homeब्लॅक अँड व्हाईटआमिर खानकडून दादासाहेब...

आमिर खानकडून दादासाहेब फाळके चरित्रपट तूर्त स्थगित

निर्माता म्हणून आमिर खान प्रयोगशील आहे. व्यावसायिक चौकट, मनोरंजनमूल्य प्रभावी ठेवत वेगळा विषय रुपेरी पडद्यावर आणतो हे त्याच्या आमिर खान प्राॅडक्शनच्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ (२००१)च्या वेळीच दिसून आले. ‘लगान’ला ऑस्करच्या स्पर्धेत विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळाले आहे आणि त्यावेळी ऑस्करला भारतीय चित्रपटसृष्टीची प्रवेशिका असते म्हणजे काय असते अशा अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३) आपली प्रवेशिका होती, पण नामांकन प्राप्त झाले नाही. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या. सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम वातावरण ढवळून निघाले.

आमिर खानने त्यानंतर आपली निर्माता म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल सुरू ठेवली आणि अशातच ‘दादासाहेब फाळके चरित्रपट’ आपण निर्माण करीत असून राजकुमार हिरानी त्याचे दिग्दर्शन करीत आहेत, अशी घोषणा केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट पडद्यावर येत असताना हा चरित्रपट वेगळा ठरेल आणि हा चरित्रपट हिंदी भाषेत असल्याने तो जगभरातील जवळपास साठ देशांमध्ये प्रदर्शित होईल आणि दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास वाटला. चरित्रपट निर्मितीत अतिशय मोठ्या प्रमाणावर संशोधन करणे, तपशील, माहिती, संदर्भ मिळवणे, आवश्यक तेथे परवानगी घेणे, जुन्या काळाचे भान ठेवणे, त्यानुसार कलादिग्दर्शन,

वेशभूषा, रंगभूषा असणे, योग्य कलाकारांची निवड करणे, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळे कसे पडद्यावर आणावे यासाठी व्हिजन असते, अशी खूपच मोठी प्रक्रिया असते. आणि या सगळ्यात महत्त्वाची असते ती पटकथा. राजकुमार हिरानीने त्यावर काम सुरु केले, असा चरित्रपट निर्माण होत आहे अशी घोषणा झाली. त्यावरुन बातम्या झाल्या. दादासाहेब फाळके यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता वाढली आणि असं सगळं होत असतानाच आमिर खानने नुकतेच जाहीर केले, दादासाहेब फाळके चरित्रपट तूर्त बाजूला ठेवत आहे.

राजू हिरानीने पटकथेवर बरेच काम केले आहे. तीनदा पुनर्लेखन केले, पण मनासारखी पटकथा आकार घेत नाही. त्यामुळे काही काळाने यावर काम करु. राजू हिरानी आता ‘थ्री इडियट्स २’ या चित्रपटावर काम करतोय. पहिल्या भागाच्या दहा वर्षे पुढे ही गोष्ट जाईल, असे आमिर खान सांगतोय. तात्पर्य, दादासाहेब फाळके चरित्रपटासाठी आपल्याला बराच काळ वाट पाहवी लागणार आहे. दर्जेदार कलाकृतीसाठी बराच काळ वाट पाहावीच लागते. दादासाहेब फाळके यांच्या ३० एप्रिल, या जयंतीदिनाच्या अवघ्या काही दिवस आधी ही बातमी आली. अशावेळी परेश मोकाशी यांची कथा, पटकथा, संवाद, निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००८) या क्लासिक चित्रपटाची आठवण यायलाच हवी. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ (प्रदर्शन ३ मे १९१३) या आपल्या देशातील पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या अथक प्रयत्न आणि अनेक अडथळ्यांवर कशी मात केली याची या चित्रपटात अतिशय प्रभावी मांडणी होती. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत अथक परिश्रम घेतले. नंदू माधव यांनी दादासाहेब फाळके यांची व्यक्तिरेखा साकारताना भरपूर अभ्यास केल्याचे त्यांच्या अभिनयात दिसले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, हा चित्रपट भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका होती. जरी ऑस्करच्या विदेशी चित्रपटाच्या अंतिम फेरीत नामांकन मिळाले नाही तरी या क्लासिक कलाकृतीचे मोठेपण अधोरेखित होते. आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहून स्फूर्ती घ्यायला हवी. बरेच काही शिकता येईल!

Continue reading

कोईम्बतूरला रंगला ट्रेलर लाँच आणि मग …

जग जवळ आले आहे हे आता बोलायची, सांगायची, ऐकायची गरज नाही. ते घडताना दिसतेय. आता तुम्हीच बघा ना, तमिळनाडूच्या कोईम्बतूरला दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांच्या 'जी डी एन' (नायडू) या मल्याळम चरित्रपटाचा रंगतदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडतोय न पडतोय...

शाहरुख खानच नव्हे तर अनेक ‘हिंदी’वाल्यांनी दिली ‘मराठी’ला साथ!

सोशल मीडियावर सर्वाधिक लक्षवेधक चर्चा आहे ती, एसआरकेने अर्थात शाहरुख खानने दे‌ऊळ बंद-२ची. त्याच्या रेड चिली या कंपनीने डिजिटल काॅपीच्या पैशासाठी अडवणूक न करता चित्रपटप्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला याची.‌ देऊळ बंदचा सर्वेसर्वा प्रवीण तरडे यानेच ही गोष्ट सांगितली आणि...

सतना कारागृह! गोष्ट येथे संपतच नाही!!

ही बातमी तुम्हालाही माहित्येय. कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो, असे पारंपरिक समजूतदारपणाचे वाक्य बोलून तुम्ही दुसऱ्या बातमीकडे वळला असाल... मध्य प्रदेशमधील सतना कारागृहातील ज्येष्ठ जेलर अधीक्षक फिरोजा खान हिची त्याच कारागृहातील...
Skip to content