Homeमाय व्हॉईसस्वतःची ओळख निर्माण...

स्वतःची ओळख निर्माण तरी करणार कधी सुनेत्रावहिनी?

अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर नेतृत्त्वाची कमान सोपवली आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर सर्व महाराष्ट्रालाच शोक अनावर झाला होता. लाखो कार्यकर्ते, मतदार, पक्षसंघटना यांचा पोशिंदा निघून गेल्याची भावना निर्माण झाली. अजितदादांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर निवड झाली आणि त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा मुंबईतील लोकभवनात शपथविधीही झाला. सुनेत्रा पवारांनी घाईघाईने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून त्यांच्यावर टीका झाली. दादांच्या मृत्यूनंतर तेरा दिवस तरी थांबण्याची तयारी नव्हती का? अगदी महिनाभर थांबले असते तरी त्यांना कोणी उपमुख्यमंत्री होण्यासाठी कोणी अडवले असते का? असे प्रश्न विचारले गेले. पण सुनेत्रावहिनींनी कोणत्याही प्रश्नाला उ्त्तर दिले नाही. कोणताही प्रतिवाद केला नाही.  पतीच्या मृत्यूनंतर दु:खात असतानाही त्यांनी निर्णय घेतला व धीरोदात्तपणे त्याला सामोरे गेल्या. अजितदादांनंतर पक्षामध्ये सर्वकाही एकमताने निर्णय घेतले जात आहेत, असे दाखवले जात असले तरी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ व धनंजय मुंडे हेच सर्व काही ठरवत आहेत असे चित्र दिसत आहे. अशावेळी स्वत:ची ओळख व स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा करण्याचे मोठे आव्हान सुनेत्रावहिनींवर आहे.

जुलै २०२२मध्ये अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर त्यांचा पक्ष भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाला. अजितदादा हेच पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्याएव्हढा जनाधार असलेला नेता पक्षात दुसरा नव्हता आणि ते सांगतील तो अंतिम शब्द असे. सत्तेत राहूनही ते भाजपाच्या आहारी गेले नाहीत. नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन भाजपाविरोधात निवडणुका लढविण्याची हिम्मत दाखवली. सत्तेत राहून भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे धाडस दाखवले. अफाट व थेट जनतेशी संपर्क असलेला, अचूक वेळ पाळणारा, प्रशासनावर जबर पकड असलेला, शब्दाला व कामाला पक्का असलेला नेता, ही त्यांची ओ‌‌‌‌ळख होती. म्हणूनच त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सारा महाराष्ट्र हळहळला. सुनेत्रावहिनींना सासर आणि माहेर अशा दोन्ही ठिकाणांहून राजकीय अनुभवाचे धडे मिळाले आहेत. त्या अबोल आहेत, पण मनाने कणखर आहेत. आजवरच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी कुणाला दुखावले असे घडलेले नाही. सदैव सक्रीय, रोखठोक, धाडसी, कार्यक्षम, तडफदार, लाखोंचे प्रेरणास्थान राहिलेल्या पतीबरोबर सदतीस वर्षे संसार केलेल्या सुनेत्रावहिनींची राजकारण व प्रशासन दोन्ही आघाड्यांवर आता कसोटी लागणार आहे. पक्ष, प्रशासन व परिवार, अशा पातळीवर सुनेत्रावहिनींना सतर्क राहून काम करावे लागणार आहे.

सुनेत्रा

अजितदादांनी काकांच्या विरोधात बंड केल्यानंतरही त्यांनी काकांना अंतर दिले नव्हते. बहिण सुप्रिया यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले तरी भाऊबीज कधी चुकली नव्हती. अजित पवार लोकनेता होते. अजितदादांच्या पक्षाचे बहुतेक नेते भाजपाच्या प्रेमापोटी नव्हे तर स्वत:ला चौकशीतून वाचविण्यासाठी किंवा विकासाला निधी मिळविण्यासाठी सत्तेसोबत आहेत. मित्रपक्षाला मोठा करणे हे भाजपाचे काम नाही. त्यांचे शतप्रतिशत २०२९ हे ध्येय आहे. त्याची सुरूवात विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायतीपासून झाली आहे. अशावेळी आपला पक्ष कमकुवत होणार नाही, याची काळजी सुनेत्रावहिनींना घ्यायची आहे. अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळी सुप्रिया, या परिवाराच्या सदस्य म्हणून जबाबदारीने व कर्तव्यभावनेने वावरताना दिसल्या. दादांच्या पक्षावर आता शरद पवार, सुप्रिया, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे कब्जा करतील, अशी कुजबूज मोहीम जोरात सुरू झाली. त्यातूनच घाईघाईने सुनेत्रावहिनींकडे पक्षाची धुरा देण्याचे पक्षातील शक्तिशाली नेत्यांनी ठरवले.

सुनेत्रावहिनींचे कोणी प्रवक्ते नाहीत. लोकसभा निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात नणंद-वहिनी लढत असताना वहिनी शांत राहि्ल्या. परिवारातील सर्वात ज्येष्ठ अशा शरद पवारांना न भेटता किंवा न सांगता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बारामतीहून थेट मुंबईला त्या कशा निघून आल्या, याची आजही चर्चा होत आहे. वहिनींनी साहेबांच्या फार संपर्कात राहू नये, असे पक्षातील अनेकांना वाटत असेल. पण फार काळ तसे शक्य आहे का? विलिनीकरणाच्या चर्चेला गेल्या पंधरा दिवसात बरेच फाटे फुटले. विलिनीकरणाचा मुद्दा आमच्यापुढे नाही, हे पटेल व तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही वेगळे झालो कशाला? विलनीकरण झाले तर शरद पवारांचा पक्ष भाजपासोबत येणार आहे काय? तसे झाले तर सत्तेत वाटेकरी वाढतील ही भीती आहेच. जर अजितदादांना विलिनीकरण करायचे होते तर सुनेत्रावहिनींना निश्चितच ठाऊक असणार. पण या मुद्द्यावर त्यांनी ब्र सुद्धा काढलेला नाही. मु‌ळात भाजपाला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण मान्य आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपाने फोडले. फुटीरांना सत्तेत सन्मानाने वाटेकरी बनवले. ठाकरे व शरद पवारांचे पक्ष कमकुवत केले. मग पुन्हा त्यांनी एकत्र व्हावे म्हणून भाजपा कसा तयार होईल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- जर अजितदादांना पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा असता तर माझ्याशी चर्चा केल्याशिवाय ते तसा निर्णय कसा घेतील? राष्ट्रवादी काँग्रेसने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी. सुनेत्रावहिनींना हा सल्लावजा इशाराच आहे, असे म्हणावे लागेल.

सुनेत्रा

जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुकीत अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती कशाला केली होती? आम्ही घड्याळ-तुतारीला बरोबर घेतले आहे, झाले गेले गंगेला मिळाले, आम्ही आता बरोबर आहोत असे अजितदादांनी जाहिरपणे म्हटले होते, ते काय भाजपाची परवानगी घेऊन का? शरद पवारांचा पक्ष आपल्याबरोबर नको, अशी कडवट भूमिका असलेले बरेचजण सुनेत्रावहिनींच्या आसपास आहेत. अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात आहे असा संशय आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलाय. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून डीजीसीएवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन ना़यडू यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत हटवावे अशी मागणी केली आहे. व्हीसीआर विमान कंपनीवर बंदी घालावी असेही म्हटले आहे. अजितदादांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. आजही लोकांच्या मनात संशय कायम आहे. दादांच्या मृत्यूचे गूढ उकलले जावे यासाठीही सुनेत्रावहिनींना सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यांनी व त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांना निवदेन देऊन सीबीआय चौकशीची मागणी तर केली आहे. पण, इतक्यावरच थांबून त्यांना चालणार नाही.

सुनेत्रावहिनींनी घाईघाईने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सुनेत्राताई तुम्ही चुकलात… अशी धारदार टीका त्यांच्यावर झाली. सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी तर सुनेत्रा पवारांना, गिधाडांपासून सावध राहा, असा खळबळजनक इशारा दिला. पवार कुटुंबाला एकत्र राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. व्हिपचे उल्लंघन केले तर राष्ट्रवादीच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार असा इशारा भाजपाच्या एका कॅबिनेट मंत्र्याने दिला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सरकारमधील मित्रपक्ष भाजपामध्ये विलीन झाला आहे का? अजितदादांनी रोखून धरलेल्या फाईलींवर त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशीच दुपारी ४ वाजता मंत्रालयात अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि ७५ नामवंत शिक्षणसंस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांचे वाटपही झाले. अजितदादा नाहीत म्हणून पक्ष पोरका झाला आहे. त्याचा गैरफायदा उठवणारे चोहोबाजूला संधी शोधत आहेत. म्हणूनच सुनेत्रावहिनींना पक्षाला नेतृत्त्व देताना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जनरल नरवणेंच्या पुस्तकातले वादग्रस्त मुद्दे अंधारात का?

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेल्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी, या आत्मचरित्राने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड वादळ निर्माण केले. सरकार आणि प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार हे पुस्तक प्रकाशितच झालेले नाही. अप्रकाशित असलेले पण सैन्य दलातील एका उच्चपदस्थाने निवृत्तीनंतर लिहिलेले पुस्तक देशभर सुत्नामी...

कोकणकन्या महापौर रितू तावडे खरंच बांगलादेशींना हुसकावणार?

गेली पंचवीस वर्षे मुंबईचे महापौरपद अविभाजित शिवसेनेकडे होते. ही मालिका भाजपाने खंडित केली आणि तब्बल ४४ वर्षांनी मुंबईच्या महापौरपदाचा मुकूट भाजपाने मिळवला. कोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर गावी जन्मलेल्या रितू तावडे मुंबईच्या बिनविरोध महापौर झाल्या आणि शिवसेना (शिंदे)...

काँग्रेसला मुंबईत २७ उमेदवारही सापडू नयेत, हे अपयश कोणाचे?

ठाकरेंची शिवसेना आणि मोदी-शाहंची भाजपा यांच्याशी मुंबईत लढत देताना काँग्रेसची दमछाक होत आहे. ठाकरे बंधुंनी  एकत्र येऊन विरोधी बाकांवर पुरेशी जागा तरी मिळवली. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजनशी युती करूनही त्याचा अपेक्षित लाभ दोन्ही पक्षांना झाला नाही. एवढेच नव्हे...
Skip to content