Homeमाय व्हॉईसआता इंस्टावरही आम्ही...

आता इंस्टावरही आम्ही ‘सेन्सेशन..’ पाहायचे?

बरोबर एका वर्षापूर्वी गुन्हेगारी जगत समाजमाध्यमांचा कसा गैरवापर करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात, याबाबत चिंता व्यक्त केली हॊती. तरीही गृह विभाग, पोलीस आयुक्तालये तसेच सायबर गुन्हा प्रतिबंधक विभागाने काही ठोस कामगिरी केल्याचे आठवत नाही. मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवाभाऊंनी गुन्हे तपासात ए आयचा वापर करून विनाविलंब गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या जातील, अशी घोषणाही केली. १५ दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तर गोळीबार झाल्यानंतर आरोपीनी इंस्टावर पोस्ट करून आगे आगे देखो होता है क्या.. असा इशाराही दिला. याप्रकरणी पोलिसांनी हालचाल करून काहींना ताब्यात घेतले, हे खरे असले तरी मुख्य आरोपींनी पोलिसांना गुंगाराच दिला आहे. पकडण्यात आलेल्यांपैकी काहीजण हजर झाल्याचीही कुजबूज आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगात जाऊन लॉरेन्स बिष्णोईचे जाबजबाब घेण्याचेही सांगितले गेले आहे, जसं काही त्याला विचारल्यावर तो धडाधडा सर्व सांगणारच आहे… सायबर विभाग अजूनही प्राथमिक अवस्थेत असल्याने दररोज इंस्टावार गुन्हेगारांची वा संबंधितांची रिल्स येतच आहेत. ही भाई मंडळी कशी बसतात, कशी नाचतात, कशी त्यांच्या समर्थकांची रॅली निघते, कोण कसा फेटे बांधतो, कोण कसा आयटमबरोबर ठुमके घेतो, कुणाची प्रेयसी आज ‘आँखोसे’ प्यार करेंगे असे सांगत असते, हे जनतेला दिसत आहे. मात्र पोलीसदल आंधळे झाले आहे किंवा असंही म्हणता येईल की ‘अंध अंधारी बैसले, डोळसा गांधारीचा वसा!”

गेल्या दोनतीन दिवसांपासून रात्री काही वाचन व गाणी ऐकल्यानंतर इंस्टाग्राम सर्फ करत होतो. एक दोन रिल्सनंतर एकदम कान टवकारले. आगापिछा नसलेल्या एका क्लिपमधून मुंबईतील टोळीयुद्धाची माहिती देण्याच्या (?) उद्देशाने काही कुख्यात गुंडांची जंत्रीवजा नामावली दाखवत होते. मागे बॅकग्राऊंड संगीत होते. एका गाण्याची धूनही वाजत होती- ‘सबका भाई दाऊद भाई..’ (कवी अनु मलिक). मी एकदम ८०/९०च्या दशकात गेलो. करीमलाला, युसूफ पटेल, वरदाभाई, छोटा राजन, अरुण गवळी, मन्या सुर्वे, माया डोळस आदींच्या सुरस कथा सांगण्याचा प्रयत्न होता. मधूनच एक दोन पत्रकार वस्तूनिष्ठ माहिती देत होते. या सर्व पत्रकारांनी गुन्हेगारी वृत्तांचे वार्तांकन केलेले होते. या पत्रकारांमधले अनेक उत्तरेतील होते. राज्यातील एकच पत्रकार यात दिसला तोही हिंदीभाषिक. यातही काही वावगे नाही. परंतु वास्तुनिष्ठ माहिती दिल्यानंतरच्या अनेक क्लिप्समध्ये अप्रत्यक्षरित्या टोळीयुद्धाचे उदात्तीकरणाचा हेतू लपून राहत नव्हता. त्यात भरीसभर म्हणून पुण्याच्या गजा मारणेचेही कौतुक केले जात होते. (आठवले म्हणून.. गजा मारणेच्या त्या गाजलेल्या मिरवणुकीला वर्ष झाले की हो!) बॅकग्राऊंडला ‘एकच दादा मारणे दादा’ होते, हे काय सांगायला हवे!

हे सर्व इंटरनेटचे चाळे पाहिल्यावर “Crime too many is not crime, but simply a way of life. if laws are inconvenient ignore them, they do not apply to you” या वचनाची आठवण झाली. टोळीयुद्ध बाबा हत्त्येपर्यंत आले. टोळीयुद्धाच्या उदात्तीकरणाच्या नादात कथाकार इतका रंगून गेला की तो कधी बाबा सिद्दीकीच्या हत्त्येपर्यंत आला हे त्यालाच कदाचित कळले नसेल. आणि बाबाचा हा एपिसोड सुरु असतानाच कुर्लाभाई नदीम खान हे पात्र मध्येच उपटले. त्याने तर सलमान खान, लॉरेन्स बिष्णोई, शाहरुख खान यांचे कथानक मध्येच घुसडले. त्यात मीही आत जाऊन आलेलो आहे हे पदवीदानही सांगितले. आणि शेवटी हा माथेफिरू सांगतो की ‘कलसे मै इंस्टापर नही आऊंगा..’ म्हणजे कमाल आहे की नाही? आणि हे सर्व रात्री साडेदहा वाजल्यानंतर खुलेआम सुरु असताना पोलिसांचा सायबर विभाग चक्क झोपा काढतोय? आणि गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री सांगत आहेत की ‘सायबर विभागासाठी आम्ही AI ची मदत घेणार…’ मुख्यमंत्री साहेब AI सुरु करण्यासाठी तरी सायबर विभाग जागा असला पाहिजे की नाही? साहेब, तो चक्क झोपला आहे असं तुम्हाला वाटत नाही? माफ करा. मला अशावेळी भाजपच्या आयटी सेलची आठवण झाली. पक्षविरोधी काही अपलोड केले की, क्षणार्धात त्याचा रीच कमी करणारी यंत्रणा कार्यरत होते. असे असताना इंस्टावर हे गेले आठवडाभर येऊच कसे शकते?

इंस्टावर गुन्हेगारी जगताची माहिती दिली असती तर आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते. या क्लिप्समध्ये काही ठिकाणी आव्हाने / प्रतिआव्हानांची भाषा आहे, ती खटकणारीच आहे. बरे हे जे काही कथन ऐकवण्यात आले ते कुठल्या पुस्तकाचा भाग आहे किंवा कसे हेही स्पष्ट नाही. अलाहाबादिया यांच्या काही क्लिप्स व प्रोग्रामवरून काही वाद सुरु आहे. तशीच एक क्लिप अजूनही अधूनमधून दिसते ती ‘योनीला सेन्सेशन नाही का?’.. हिच्यावर अजून बंदी कशी नाही? मराठीत त्याच वाटेने जाणारी ‘फाटक्या खिशातून काय हाताला लागले? ते छोटे असेल?… अशी क्लिप आहेच. (आम्ही मराठी मागे नाही!!) इन्स्टावरील या अनेक क्लिप्सवर बरेच लिहिता येण्यासारखे आहे. पण तो काळाकुट्ट इतिहास अनेक पुस्तकातून शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. या क्लिप्स आताच प्रसारित करण्यामागे ‘काडी’ लावण्याचा प्रकार आहे का, याची पोलिसांनी कसून चौकशी करणे गरजेचे आहे. सायबर विभागाला केंद्रीय यंत्रणाशी संपर्क साधून त्याच्या मुळाशी जाणे जरुरीचे आहे. पोलीसठाणे वा उपायुक्तांच्या कार्यालयात जशी कामाची आखणी असते तशी करून सायबर गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई व्हायला हवी. “Nothing is more devasting to a community than out of control crimes” हे कुणीही विसरता कामा नये…

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेगारीविषयक अभ्यासक आहेत.)

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content