महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची ख्याती यासाठी होती की, ते जेव्हा एखादी राजकीय हालचाल करायचे, धक्कादायक निर्णय घ्यायचे, तेव्हा त्यांचे “लक्ष्य” काहीतरी निराळेच असायचे! दिसताना ते एक साधी नियुक्ती करताना दिसायचे, पण प्रत्यक्षात त्या नियुक्तीमुळे अन्य चार लोकांची संधी हुकलेली असायची. दुसऱ्या दोघांना त्यांची “योग्य जागा” दाखवलेली असायची! नेमका तसाच काहीसा प्रकार नुकताच घडला. मात्र त्या साऱ्या निर्णयप्रक्रियेचे सूत्रधार थोरले पवार नव्हते, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस होते. सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ही घटना अनेकांसाठी धक्कादायक, कित्येकांसाठी कदाचित दुःखदायक आणि काहीजणांच्या राजकारणाची घडी विस्कटून टाकणारी अशी होती!
तेर गावी, उस्मानाबाद जिल्हयात, 1963 साली जन्मलेल्या सुनेत्रा पवार अर्थखात्याच्या पदवीधर आहेत. पण त्या राज्याच्या अर्थमंत्री नाही झाल्या. त्यांच्याकडे उत्पादनशुल्क हे राज्याच्या महसुलात भर टाकणारे महत्त्वाचे खाते आले आहे. हेच खाते अजित पवार गेली काही वर्षे सांभाळत होते. शिवाय माणिकराव कोकाटेंची गच्छंती झाल्यापासून युवक व क्रीडा, ही खातीही दादांकडेच होती. ती खातीही आता सुनेत्रावहिनींकडे आली आहेत. हा शपथविधी दादांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी, का व कसा झाला याच्या अनेक सुरस कहाण्या सध्या राजकीय वर्तुळात रंगवल्या जात आहेत. अजित पवारांच्या भीषण अपघातानंतर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर पानभर शोकसंदेश झळकला होता. भावपूर्ण आदरांजली अशा शब्दात काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील दादांचे एक रेखीव छायाचित्र त्यात होते आणि खाली लहान अक्षरात एकच वाक्य होते: “भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र राज्य”. दादा महायुतीतील सहभागी पक्ष होते. पण एखाद्या प्रादेशिक राजकीय पक्षाचा प्रमुख नेता निवर्तल्यानंतर तिसऱ्याच राष्ट्रीय पक्षाने इतकी मोठी जहिरात राज्यात सर्वत्र करावी हा अनोखा व अलिकडच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग महाराष्ट्राने पाहिला. अनुभवला. तिथेच भाजपाची पावले लक्षात येत होती. पंतप्रधान स्वतः अंत्यसंस्कारात सहभागी होतील असे आदल्या दिवशी सांगितले गेले होते. त्यातून अजितदादांचे, त्यांच्या पक्षाचे भाजपाप्रणित राष्टरीय लोकशाही आघाडीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित होते.

प्रत्यक्षात पीएम बारामतीला आले नाहीत. पण देशाचे गृहमंत्री व राजकारणातील धुरंधर, अमित शाह आले. त्यांच्यासमवेत भाजपाचे नव्याने राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले नितीन नबीन हेही प्रथमच महाराष्ट्रात अवतरले. भाजपाशासित राज्यातील एनडीएच्या घटकपक्षांचे नेते आले. मंत्री, आमदार, खासदार असे सारेच व्हीआयपी बारामतीत येऊन गेले. शरद पवार शोकाकुल स्थितीत समोर बसले होते. सुनेत्रा पवार यांच्याभोवती घरातील अन्य महिलावर्ग, पवार कुटुंबीय दिसत होते. त्यातही सुप्रिया सुळेंच्या हालचाली उठून दिसत होत्या. अमित शाहंनी अंत्यदर्शन घेतले व कंद्र सरकारच्या वतीने सन्मानपूर्वक पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पटेल यांनी पार्थ व जय पवार यांची भेट शाहंबरोबर घडवली. निघण्यासाठी वळलेले शाह, थांबून पार्थ यांच्याशी काही बोलतानाही तेव्हा महाराष्ट्राने लाईव्ह टीव्ही चॅनेलवरून न्याहाळले! त्या सर्व छोट्यामोठ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर परवाचा शपथविधी पाहता येतो.
राज्य सरकारने दादा गेले त्याचदिवशी तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. तो संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 31 जानेवारीला सायंकाळी सुनेत्रावहिनींनी लोकभवन (राजभवनाचे नवे नाव) येथे एका साध्या, छोटेखानी समारंभात, उपमुख्यमंत्री म्हणून पवार परंपरेनुसार गांभिर्यपूर्वक पदाची तसेच गोपनियतेची शपथ घेतली. हा घटनाक्रम थोरल्या पवारांसाठी तसेच त्यंच्या रा.काँ.श.प. पक्षातील नेत्यांसाठी चांगलाच धक्कादायक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बुद्धिबळाचा पट पवारसाहेब नव्याने मांडणार होते. तो पटच अचानक उधळला गेला. पवारांवर मात करणारा एक नागपुरी पैलवान हे डावपेच खेळून गेला. जर सारी प्यादी थोरल्या पवारांच्या मनासारखी हलली असती तर दादांनंतर पदावर व खात्यावर शरदरावांचे सहकारी जयंत पाटील यांची वर्णी लागली असती! ते काहीच होऊ शकले नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही थोरल्या पवारांची इच्छा होती. तसे त्यांचे प्रयत्नही होते, हेही दादांच्या निधनानंतर चोवीस तासातच स्पष्ट झाले. पण तेही सारे डाव आता थबकले. थांबले आहेत. इतके सारे परिणाम भाजपाच्या एक कृतीने घडले. त्यांनी घाई केली. कदाचित अमित शाहंनी फडणवीसांना त्वरा करण्याचा कानमंत्रही दिला असेल.

शपथविधीपर्यंतचा सारा घटनाक्रम नीट पाहण्यासारखा आहे. त्यादरम्यान रा.काँ.श.प. नेत्यांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्या आमदारांनी सांगितले की, आणखी काही दिवस थांबायला काय हरकत होती, थोरल्या पवारांचे मित्र संजय राऊतांनी शपथविधीच्या घाईसाठी अमित शाहंवर ठेवलेल्या ठपका वगैरेमधून अनेक कहाण्या लक्षात येतात. शरद पवारांच्या हातात हुकुमाचे पत्ते येण्याआधीच प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे व भुजबळांनी पुढाकार घेतला. हे सारे नेते धनंजय मुंडेंबरोबर वर्षा बंगल्यावर 30 जानेवारीला सकाळीच पोहोचले. तिथे चर्चा झाली. ती बैठक संपल्यानंतर भुजबळांनी जाहीर केले की नवा नेता निवडण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक 31ला सकाळी घेतली जात आहे. फडणवीसांनी काही तासांनी जाहीर केले की राष्ट्रवादी काँग्रेस जो नेता निवडेल त्याच्या पाठीशी भाजपा पक्ष म्हणून उभा राहील. “अजितदादा पवार कुटुंबाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने आहोत”, असेही सांगायला फडणवीस चुकले नाहीत. या साऱ्याचा जो मतितार्थ होता तो शरद पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समुळे आणखी अधोरेखित झाला.
शरद पवारांनी पुतण्याच्या मृत्यूनंतर अशी पत्रकार परिषद मुद्दाम घ्यावी हे थोडे आश्चर्यकारक होते. त्यातून त्यांना असाच मेसेज द्यायचा होता की सुनेत्रा यांना नेता निवडण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पटेल व तटकरेंना नक्कीच आहे. पण मला त्याची कल्पना नाही. मला वा पवार कुटुंबातील इतरांना सुनेत्रा यांच्या शपथविधीचे निमंत्रण नाही. आमच्या दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे ही दादांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पत्रकारांशी असा सुसंवाद साधल्यानंतरया शरद पवारांनी पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीचा व्हिडिओ जारी केला. “पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा जयंत पाटील करत होते. माझ्यापुढे त्या चर्चा नव्हत्या”, असा जो दावा पवारांनी केला, तो मात्र याच व्हिडिओतून उघडा पडला! 17 जानेवारी रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दादा बोलत आहेत, पवारही काही सांगत आहेत, जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार आदि रा.काँ.श.प. पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते ऐकत आहेत, असा तो व्हीडिओ आहे. त्यात राष्ट्रवादीचे पटेल, तटकरे वा अन्य कुणी दादा गटाचे नेते दिसत नाहीत. शरद पवारांनीच ती बैठक स्वतःच्या घरी बोलावली असावी व त्यात एकट्या दादांनीच हजर राहवे असेही सुचवले असावे. म्हणजे विलिनीकरणाची इच्छा व प्रयत्न श.प.रा.काँ.कडून अधिक नेटाने सुरु होते हेच स्पष्ट होते.

या पक्ष विलिनीकरणाची घोषणा सुनेत्रा यांची नेतानिवड होण्याच्या आधीच व्हावी, अशीही शरद पवारांची इच्छा होती का? तसे झाले असते तर दोन्ही पक्षांतील सर्वात वरिष्ठ तसेच पवार कुटुंबाचेही अध्वर्यू या नात्याने शरद पवारांच्याच हातात पुढच्या राजकारणाची सारी सूत्रे गेली असती. कदाचित हे ओळखून व तेच टाळण्यासाठी पटेल, तटकरे, भुजबळांनी सुनेत्रा यांची विधिमंडळ राष्ट्रवादी कँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड करून टाकली. जयंत पाटील व शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना, दादा हयात असते तर फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात विलिनीकरण झाले असते, असे सांगितले. पण हे सारे अजितदादांबरोबर महायुतीत सहभागी होणार होते का? विरोधकांच्या आघाडीतून शरदराव पूर्णपणाने बाहेर पडणार का? यावर मात्र या नेत्यांनी मौन बाळगले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या चालीमुळे सुप्रिया सुळेंना केंद्रात वा जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार यांना राज्यात मंत्रीपदाची संधी मिळणे सध्या दुरापास्त होणार आहे!
(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

