Homeटॉप स्टोरीयंदा नो 'ऑक्टोबर...

यंदा नो ‘ऑक्टोबर हिट’!

यावर्षी “ऑक्टोबर हीट”च्या तडाख्यापासून महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान विभागाचा (आयएमडी) अंदाज आहे. नैऋत्य मान्सून परतल्यानंतर सहसा ऑक्टोबरमध्ये राज्याला कडक उष्णता सहन करावी लागते. यावर्षी त्या असह्य उकाड्याच्या, घामाघूम अस्वस्थतेतून नागरिकांची सुटका होणार आहे. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये देशातील अनेक भागात पाऊस सुरूच राहण्याचीही शक्यता आहे. IMD ने ऑक्टोबर 2025साठीच्या त्यांच्या ताज्या पर्जन्यमान आणि तापमान अंदाजात म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांसह महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. त्यासोबत कमाल तापमानही सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहील.

देशातील बहुतेक भाग शीत झोनमध्ये

“मल्टी-मॉडेल एन्सेम्बल तंत्राचा वापर करून तयार केलेल्या मान्सूनोत्तर हंगामाच्या – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर – अंदाजाकडे पाहिल्यास, महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भाग निळ्या किंवा हिरव्या शीत झोनमध्ये असल्याचे दिसून येते. या काळात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता जास्त असल्याचे यावरून दिसून येते”, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, की “फक्त वायव्य भारतात – राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये – सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता दिसून येते.”

ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115%पेक्षा जास्त पाऊस

आयएमडीच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये संपूर्ण देशात दीर्घकालीन सरासरीच्या 115%पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. “ऑक्टोबरमध्ये भारतातील बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. याचा अर्थ असा की, ऑक्टोबरमध्ये देशातील अनेक भागात पाऊस सुरूच राहणार आहे. त्यातून शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेला आधार मिळणार असला तरी त्यामुळे पूर येण्यासारखे धोकेदेखील निर्माण होतील,” असे महापात्रा म्हणाले.

दक्षिणेत कर्नाटक, आंध्रातही पाऊस

या हंगामात ईशान्य मोसमी पावसाचा मोठा भाग दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पडतो, त्यामुळे संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पीय भारतातही पाऊस सामान्यपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, तामिळनाडू, पुद्दुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक या सर्व ठिकाणी सामान्यपेक्षा 112%पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

ऑक्टोबर

सतत पाऊस पडत राहिल्यामुळे तापमान घट

महाराष्ट्रासाठी, जिथे ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे दिवसाचे तापमान वाढते आणि रात्री उष्णतेची लाट येते, तिथे कमाल तापमानाचा अंदाज दिलासा देणारा आहे. “सतत पाऊस पडत राहिल्यामुळे देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे, जिथे ऑक्टोबरमध्ये मान्सून माघारीनंतर उष्णतेत अस्वस्थ करणारी वाढ होते.

पूर्व भारत, सौराष्ट्र-कच्छमध्ये उष्णतेचा दणका

ऑक्टोबरमध्ये फक्त पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत, लगतचा पूर्व भारत आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, देशातील बहुतेक भागात, विशेषतः पूर्व, ईशान्य आणि पूर्व-मध्य प्रदेशात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

Continue reading

‘हाय व्होल्टेज’ ड्रामा! सर्वाधिक बोली लावूनही वेदांताला वाटाण्याच्या अक्षता!!

भारतीय कॉर्पोरेट जगतात सध्या एका मोठ्या 'टग ऑफ वॉर'ची चर्चा आहे. कर्जबाजारी असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स या कंपनीला खरेदी करण्याच्या शर्यतीत वेदांता समूहाने सर्वाधिक बोली (एच-१ बिडर) लावली होती. मात्र, बँकांनी (बँकर्स कमिटी) वेदांताला बाजूला सारत गौतम अदाणींच्या 'अदाणी एंटरप्रायजेस'च्या...

‘द कंप्लीट मॅन’चे ‘ॲन इनकंप्लीट लाईफ’!

भारतीय उद्योगजगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ‘रेमंड’ या जागतिक ब्रँडचे शिल्पकार आणि आकाशाला गवसणी घालणारे साहसी वैमानिक डॉ. विजयपत सिंघानिया यांचे काल, २८ मार्च २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. "द कंप्लीट मॅन" ही टॅगलाईन...

वर्दीतल्या ‘झारीतल्या शुक्राचार्यां’कडून पीडितांच्या अब्रूचे धिंडवडे?

गल्लीपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात सेक्स स्कँडलमध्ये आता एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वळण आले आहे. ज्या पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन सरकार देत आहे, त्याच महिलांचे अत्यंत वैयक्तिक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत...
Skip to content