मुंबईतल्या कोरोनाच्या वाढत्या साथीला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने घरी विलगीकरणात असलेल्या बाधितांकडून प्रस्तावित नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पालिकेची धाडपथके छापेमारी करणार आहेत. या छापेमारीत दोषी आढळणाऱ्या कोरोनाबाधितांवर कोविड सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यापासून ते फौजदारी कारवाई करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेने काल याबाबतचे सुधारीत परिपत्रक जारी केले. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभाग प्रमुख, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या स्वाक्षरीनिशी परिपत्रक क्रमांक एचओ/४१८३०/ कोविड, दिनांक ३१.०३.२०२१ निर्गमित करण्यात आले आहे. त्यामध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणं असलेल्या कोविडबाधितांच्या गृह विलगीकरण संदर्भात सुधारीत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
रोज किमान १० टक्के बाधितांची होणार चौकशी
गृह विलगीकरणातील एकूण रुग्णांपैकी किमान १० टक्के रुग्णांच्या घरी समर्पित वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेटी देऊन सर्व बाबींची पडताळणी करावी. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. रुग्णास कोरोना काळजी केंद्र (सीसीसी २)मध्ये स्थलांतरित करावे. कार्यवाहीला सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
घराबाहेरही लागणार सूचना
हेल्थ पोस्टच्या कर्मचाऱ्यांनीदेखील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घराबाहेर सूचना/नोटीस प्रदर्शित करावी. गृहनिर्माण संस्था/ वसाहतीच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती द्यावी. गृह विलगीकरणात राहून केंद्र सरकारच्या सूचनांचे परिपूर्ण पालन केले जाईल, याबाबत रुग्णाकडून लेखी घ्यावे. विलगीकरणात घ्यावयाच्या काळजी व सविस्तर सूचनांचे लेखी पत्रक रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना द्यावे. रुग्णास बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यापासून पाचव्या व सातव्या दिवशी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकृती स्थिर असल्याबाबत खातरजमा करावी. काही रुग्णांमध्ये विशेषतः वय वर्षं ६०वरील ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये आठवडाभरात लक्षणे विकसित होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांच्या घरी भेट देऊन रुग्णाची स्थिती पडताळावी. गृह विलगीकरणातील रुग्ण स्वतःच्या प्रकृतीचे योग्यरित्या निरीक्षण करुन नोंदी ठेवतो आहे, औषधोपचार नियमिपणे घेतो आहे, घराबाहेर पडत नाही, कोविड प्रतिबंध सुसंगत वर्तणूक करतो, दूरध्वनी संपर्कावरुन योग्यरित्या माहिती देतो, या सर्व बाबींची खातरजमा वॉर्ड वॉर रुमने नियमितपणे करावयाची आहे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
गृह विलगीकरणासाठी निकष
गृह विलगीकरणासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येऊ शकते. त्यासाठी (१) लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक), (२) सौम्य लक्षणं असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष), (३) प्रौढ व सहव्याधी असलेले असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत, त्यांची केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित सल्ल्याने विलगीकरण करता येऊ शकेल.
अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणं असलेले बाधित म्हणून निर्देशित केलेले असणे आवश्यक असेल. अशा रुग्णांच्या घरी स्वतःला विलग करुन घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विलगीकरणाच्या पुरेशा सुविधा असणे आवश्यक असेल. विशेषतः रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह गरजेचे आहे. घरी विलगीकरणात असलेल्या अशा रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषतः सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वतःला दूर राखणे व स्वतंत्र खोलीत राहणे सर्वांच्या हिताचे आहे. तसेच घरी विलगीकरणात असा रुग्ण राहत असल्याबाबत नातेवाईक, शेजारी/गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी व रहिवाशी, नियमित कौटुंबिक चिकित्सक आणि नजीकची हेल्थ पोस्ट यांना माहिती असणे आवश्यक असेल.
संबंधित रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजीटल थर्मोमीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) इत्यादी साधने बाळगून त्यांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. तसेच घरी विलगीकरणात असताना वॉर्ड वॉर रुम/ वैद्यकीय मंडळी/आरोग्य कर्मचाऱ्यांकडून येणारे प्रकृतीबाबत विचारणा करणारे दूरध्वनी स्वीकारुन अद्ययावत माहिती त्यांना कळवावी. महत्त्वाच्या आरोग्य निकषांच्या नोंदी ठेवाव्यात, ज्या वैद्यकीय उपचारांसाठी मदतकारक ठरतात. संपूर्ण उपचारअंती रुग्ण बरे झाल्यास त्यांचे विलगीकरण पूर्ण झाल्याबाबत प्रचलित वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक संमतीने निर्णय घेतील.
सर्व विभागांमध्ये वॉर रूम
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉर रुम स्थापित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाच्या हद्दीतील कोविडबाधित रुग्णांचे व्यवस्थापन करण्यात येते. अशा वॉर्ड वॉर रुम्ससाठीदेखील या परिपत्रकामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत. विभागाचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांनी वॉर्ड वॉर रुममध्ये पुरेसे मनुष्यबळ व त्यांचे प्रमुख नेमावेत. घरी विलगीकरणातील सर्व रुग्णांशी नियमित दूरध्वनी संपर्कासाठी व्यवस्था करावी.
दररोज कोविडबाधितांची यादी प्राप्त झाल्यानंतर वॉर्ड वॉर रुमने गरजू रुग्णांना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी व निर्धारित निकषांनुसार पात्र रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवावे. ही कार्यवाही त्याच दिवशी पूर्ण करावी. रुग्णाला घरी विलगीकरण करण्याची सूचना दिल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या मदतीने अशा रुग्णाचे घर विलगीकरणासाठी योग्य असल्याची खात्री करावी व योग्य तो निर्णय घ्यावा. गृह विलगीकरणातील रुग्णांची यादी हेल्थ पोस्टला पाठवून त्याची पडताळणी करावी. रुग्णांना वॉर्ड वॉर रुमचे संपर्क उपलब्ध करुन द्यावेत. वॉर रुमच्या वैद्यकीय पथकाने अशा रुग्णांमध्ये असलेल्या लक्षणांविषयी तसेच सहव्याधी असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती घ्यावी. प्रसूती काळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या एकत्रित विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घ्यावा. रुग्णांबाबतच्या दैनंदिन नोंदी वॉर्ड वॉर रुमने नोंदवाव्यात. तसेच संपर्क होत नसलेल्या रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) किंवा हेल्थ पोस्ट यांना कळवावी, असे यात म्हटले आहे.
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे वाढीस लागली तर त्यांना त्वरेने रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी उपचार करत असलेले वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ यांनी निर्णय घ्यावा. तसेच प्रचलित वैद्यकीय उपचार पद्धतीचे पालन करुनच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात यावा, अशा सविस्तर सूचना या परिपत्रकातून करण्यात आल्या आहेत.


उत्तम.
विलगीकरन केलेल्या व्यक्तींना लागणारी साधने व सामग्री भाडे तत्वावर प्रशासनाने पुरवायला काय हरकत आहे?