बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत, मनिष सुरेश शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’चा अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून या पोस्टरने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली नाती आणि गोमातेबद्दलची श्रद्धा यांची भावस्पर्शी मांडणी करणाऱ्या ‘धाराऊ’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये “धाराऊ” या नावासोबतच पोस्टरवरील निरागस मुलगा आणि त्याच्यासोबत दिसणारी गाय यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते लक्ष वेधून घेत आहे. निसर्गरम्य ग्रामीण वातावरण, गावची पार्श्वभूमी आणि या दोघांच्या नात्यातील आपलेपणा यामुळे पोस्टरमधून चित्रपटाच्या भावविश्वाची सुंदर झलक पाहयला मिळते.
बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती राधेश्याम चांडक (भाईजी), डॉ. सुकेश झंवर आणि कोमल झंवर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष शिंदे यांनी केले आहे. या पोस्टरमध्ये एका छोट्या मुलाचा गायीशी असलेला भावनिक बंध केंद्रस्थानी दिसतो. त्यामुळे गोमाता, श्रद्धा, माया आणि माणूसपण या भावनांना चित्रपटात नेमक्या कोणत्या पद्धतीने मांडले आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरच्या रंगसंगतीपासून ते ग्रामीण लोकेशनपर्यंत प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या मातीतल्या कथेला अधोरेखित करते.
चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये छायाचित्रण दिग्दर्शक के. विजय, संकलन मंगेश शेटके, ध्वनीमिश्रण निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर, वेशभूषा श्रावणी जाधव, मेकअप व हेअरस्टाईल स्नेहल कारंडे, संगीत प्रज्वल यादव व अभिषेक काटे, पार्श्वसंगीत प्रज्वल यादव, गीतकार प्रशांत मधुपवार यांचा समावेश आहे. तसेच गायक अवधूत गांधी, सन्मिता धापटे शिंदे, देवांश भाटे आणि वृषभ साठे यांनी चित्रपटासाठी आपले योगदान दिले आहे. हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

