Homeमाय व्हॉईसअंबानींकडून घेतलेली सुरक्षा...

अंबानींकडून घेतलेली सुरक्षा उद्धव ठाकरेंना भोवणार?

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका त्यांना बसेलच, परंतु मूळ शिवसेना ही आपलीच आहे हा त्यांचा दावा यामुळे फोल ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून खाजगी सुरक्षा घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. एका बाजूला अदानी यांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला अंबानींकडून खाजगी सुरक्षा स्वतःच्या सेवेत दाखल करून घ्यायची, हा दुटप्पीपणा भविष्यात त्यांना महाग पडणार आहे. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून वाय दर्जाची पोलिसांची सुरक्षा आहे. उद्धव ठाकरे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना सुरक्षा हवीच. पण उद्योगपतींकडून सुरक्षा कशासाठी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांच्या कवचकुंडलात वावरत असत. शिवसैनिक हीच माझी कवचकुंडले आहेत असा ते नेहमी म्हणायचे. परंतु शिवसेनाप्रमुखांचे वारसदार म्हणून मिरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अंबानी यांची सुरक्षा घेऊन काय साधले? खरोखर एवढा धोका उद्धव ठाकरे यांना आहे का? आणि धोका असलाच तर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक त्यांची सुरक्षा करण्यास सक्षम नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. मुंबई मराठी माणसाची असताना मराठी माणसांवर इतर भाषिक अन्याय करीत ही गोष्ट ठाकरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याविरोधात जोरदार आंदोलन केले. शिवसेनाप्रमुखांच्या या मुद्द्याला अपेक्षेपेक्षा मोठा पाठिंबा मिळाला. त्यावेळी शिवसेनेचे टीकाकार असे म्हणत की, मुंबईतील कम्युनिस्टांचे वर्चस्व संपवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या छुप्या पाठिंब्याने शिवसेना स्थापनेला बळ मिळाले. त्यावेळी शिवसेनेला वसंत सेना असेही हिणवत असत. परंतु या सर्वांची पर्वा न करता ठाकरे यांनी शिवसेनेची घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कोणतीही सुरक्षा नव्हती. शिवसैनिक हेच त्यांचे अंगरक्षक होते.

ठाकरे

शिवसेनाप्रमुख एखादी भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेवर ठाम राहत. कोणताही बदल त्या भूमिकेत होत नसे. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला होता. या मुद्द्यावरच मराठवाड्यात शिवसेनेचा पसारा वाढला. शिवसेना संघटनेचा पसारा वाढत असतानाच ठाकरे यांना सरकारची कोणतीही सुरक्षा नव्हती. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध केल्यानंतर शिवसेनाप्रमुख ठाकरे या मुद्द्यावर रान उठवण्यासाठी राज्यभर दौऱ्यावर निघाले होते. या दौऱ्याचा फटका आपल्याला बसेल ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना आली. त्यांनी शक्कल लढवून शिवसेनाप्रमुखांची सुरक्षा वाढवली आणि पोलिसांनीसुद्धा त्यांना सांगितले की, आपल्या मागावर अतिरेकी असून आपल्या जीवाला धोका आहे. त्यानंतर हा दौरा अर्धवट सोडून शिवसेनाप्रमुख मुंबईत परतले. पुढे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर अतिरेक्यांचा धोका वाढला. त्यामुळे सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. त्याचबरोबर शिवसैनिक मातोश्रीबाहेर पहारा देत होते तो भाग वेगळा.

शिवसेनाप्रमुख आणि अनेक उद्योगपतींचे स्नेहाचे संबंध होते. धीरूभाई अंबानी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तर ऋणानुबंध होते. परंतु संघटनेच्या राजकारणात त्यांनी हे येऊ दिले नाही. तत्कालीन मंत्री गणेश नाईक यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात ठेवावे यासाठी दस्तूरखुद्द धीरूभाई अंबानी यांचा फोन त्यांना गेला होता. परंतु माझा आदेश हा आदेश असतो, असे उत्तर त्यांनी धीरूभाईंना दिले, अशी आठवण आजही जुजाणते सांगतात. मात्र आताचे बाळासाहेबांचे वारसदार उद्धव ठाकरे मुकेश अंबानी यांच्या समूहाकडील सुरक्षा घेऊन मिरवत आहेत. आज पोलिसांबरोबरच हे खाजगी सुरक्षारक्षक त्यांच्या दिमतीला असतील खरे, पण ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या समर्थक शिवसैनिकांवर व्यक्त केलेला अविश्वास त्यांना त्रासदायक ठरेल, हे मात्र निश्चित!

Continue reading

मोदींसोबत जाण्यास शरद पवार उतावीळ?

सत्तेत जावे असा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदार यांनी धरल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंचाईत झाली आहे. खरे म्हणजे राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची वाट सध्या बिकट आहे. त्यामुळे ते कधी पंतप्रधान...

‘गुंगी गुडिया’ ते ‘दुर्गा’- सुनेत्राताई गिरवणार का इंदिराजींचा कित्ता?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' संबोधून काँग्रेसने नव्या वादाला तोंड फोडले आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर सुनेत्राताईंकडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व आले. हे नेतृत्त्व स्वीकारताना त्यांनी कोणतीही बडबड...

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार...
Skip to content