Homeब्लॅक अँड व्हाईटदहिहंडी उत्सवाचा डान्स...

दहिहंडी उत्सवाचा डान्स बार, तर गणेशोत्सव झाला इव्हेंट!

महाराष्ट्रातील जनतेचे दैवत म्हणून ओ‌ळखल्या जाणाऱ्या गणपतीबाप्पाच्या या वर्षीच्या बारा दिवसांच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. गणपती उत्सव घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातून मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात गणेशाला वंदन करूनच होते. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, कार्यक्रमासाठी, नव्या उपक्रमांसाठी बाप्पांचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता असे गणेशाचे वर्णन केले जाते. मग बारा दिवसांच्या सार्वजनिक उत्सवात मोठमोठे मंडप घालून, रस्ते अडवून, वाहतुकीची कोंडी करून आणि बाप्पांच्या मंडपात मोठ्या आवाजातील सिनेमातील गाणी लावून काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा व्हावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तरीही सरकारमधील भाजपा व मित्रपक्षांमध्ये मतभिन्नता आहे. भाजपामध्येही काही जणांना डीजेच्या दणदणीत आवाजात गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे असे वाटते. गणेशोत्सवात कोणतेच निर्बंध नसावेत असे भाजपाचे काही नेते उघड बोलत आहेत. तर याच पक्षाच्या काही आमदार- खासदारांनी ध्वनिप्रदुषणाला विरोध दर्शवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही गणेशोत्सवात डीजेवर बंदी कशाला? असा प्रश्न विचारणारे मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाचा डीजेला विरोध तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाचा आवाजच शांत झाला आहे. सत्ताधारी महायुतीतच डीजे, डॉल्बी किंवा डान्सविषयी एकमत नाही, मग गणेशोत्सव मंडळांच्या ध्वनिप्रदुषणावर नियंत्रण ठेवणार कोण? सरकारचीच भूमिका ठाम नसेल तर पोलीसप्रशासन ठोस कारवाई तरी कशी करतील?

गणेश

गणेशोत्सवातील डीजे, लाऊडस्पिकर्सच्या दणदणाटावर आणि लेजर्स लाईट्सच्या भडिमारावर नियंत्रण ठेवा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. फटाक्यांच्या माळांमधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाबद्दलही आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. ध्वनि आणि हवा प्रदुषणातून दरवर्षी शेकडो-हजारो लोकांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो. अनेकांच्या दृष्टीवरही परिणाम होतो, याचाही इशारा दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे दहा-पंधरा कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी सोसायटीतील  एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरी येतात. त्यावेळी घरातील मुलगी अभ्यास करीत असते. तिची आई घरी असते. वहिनी, गेल्या वर्षी तीनशे रूपये वर्गणी दिली होती, यावर्षी पाचशेची पावती फाडू का? असा प्रश्न एक कार्यकर्ता आईला विचारतो. ती त्यांना थांबा म्हणते. आतल्या खोलीत जाऊन एक फाईल घेऊन येते. तो कार्यकर्ता पुन्हा म्हणतो, पाचशेची पावती फाडतो, पैसे नंतर भाऊ घरी आले की द्या… त्यावर आई म्हणते, तुम्ही पावती फाडा, पण त्याअगोदर मी तुम्हाला काही पावत्या दाखवते, असे म्हणून ती फाईल त्यांच्या हातात देते. आई म्हणते- गेल्या वर्षी मिरवणुकीच्या वेळी माझी मुलगी रस्त्यावर उभी होती. डीजे नि लाऊडस्पिकरचे कर्णकर्कश्य आवाज ऐकून नंतर तिचे कान बधिर झाले. एका कानाने तिला ऐकूच येत नाही. दुसऱ्या कानाला मशीन लावावे लागते. अजूनही उपचार चालूच आहेत. या सर्व उपचाराची बिले या फायलीत आहेत. सर्व कार्यकर्ते गंभीर झाल्यावर आई म्हणते, माझ्या मुलीसाठी सांगत नाही हो, उद्या तुमच्यापैकी काही जणांवर अशी वेळ येऊ शकते…

रत्नागिरीहून पुण्यात करिअर करण्यासाठी आलेल्या विद्यानंद बापट या ३७ वर्षांच्या तरूणाने ध्वनिप्रदुषणाच्या समस्येला वाचा फोडली. पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत एक नागरीक म्हणून त्याने गणेशोत्सवातील डीजेला विरोध केला. डीजेशिवाय गणेशोत्सव साजरा करता येत नसेल तर करू नका, काही बिघडणार नाही अशा शब्दांत त्याने ठाम भूमिका मांडली. मंडळाच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांना त्याला अक्षरश: तेथून बाहेर काढले. त्याला कुणी गल्लीत कुत्रे विचारत नाही, अशा शब्दात संभावना केली. टिळक पथावर एकाने हल्ला करून त्याला मारहाण केली. पण विद्यानंद बापट याचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोहोचला आहे व सजग नागरिकांचे त्याला उत्स्फूर्त समर्थन मिळत आहे. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, हीच त्याची मोठी जमेची बाजू आहे. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत आहे. पण कानठळ्या बसविणारे आवाज बंद होणे गरजेचे आहे. मोठ्या आवाजाच्या स्पर्धेत भाग घेणे अनेकांना आवडते, डीजेच्या संगीतावर तरूणाई बेभान होऊन नाचते. म्हणजे, ते योग्य व चांगले आहे असे नव्हे. पुणे शहराचे आमदार-खासदार भाजपाचे आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. मुंबई-नागपूर महापालिकेत भाजपा आहे. ठाण्यात शिंदेची शिवसेना आहे. मग ध्वनिप्रदुषणावर महायुतीचे लोकप्रतिनिधी चिडीचूप का आहेत? मंडळाचे पदाधिकारी व  हजारोंच्या संख्येने नाचणारी तरूणाई यांना दुखवायचे कसे असे त्यांना वाटत असावे. हजारो लाखोंच्या बेभान आनंदाला रोखण्याची कुणाची इ्च्छाशक्ती नाही, हाच यातून संदेश आहे.

गणेश

मुंबई-ठाण्यातील डान्स बारमुळे तरूण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, याचे गांभीर्य ओळखून आर. आर. आबा पाटील यांनी गृहमंत्री असताना डान्स बारवर बंदी घातली. आता मुंबईत नुकत्याच झालेल्या दहिहंडी उत्सवात आयोजकांनी मंचावर डान्सबारचा आनंद मिळवून दिला. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने टीव्हीच्या पडद्यावर पाहिले. कोणत्या मंडळाने कुठे कुठे दहिहंडी फोडली, किती थर उंच उभे केले, यापेक्षा कोणत्या मंडळाच्या उत्सवात बॉलिवुडमधील कोण कोण हिरो-हिरॉइनस आणि सेलिब्रेटी आले होते, कोणी फक्कड डान्स केले, कोणी सर्वात उत्तेजक व दिलखेचक नृत्य केले याचीच चर्चा जास्त झाली. लाखो रूपयांची बिदागी घेणाऱ्या डान्सर स्टेजवरून समोरच्या तरूणाईला पप्प्या देत होत्या. मी कोणाला भाऊ मानत नाही, असे सांगत होत्या. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची व श्रीकृष्णाची प्रतिमा होती आणि मंत्र्यांच्या व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत सेलिब्रेटींचे बिभत्स, किळसवाणे, आक्षेपार्ह डान्स चालू होते. पैशाची उधळण करून दहिहंडीचा डान्सबार झाला. आता गणेशोत्सवाचे तरी पावित्र्य राखा, असे सांगण्याची वेळ आली आहे. दहिहंडी, गणेशोत्सव.. नंतर नवरात्र, या उत्सवांचे स्वरूप इव्हेंट, मार्केटींग झाले आहे. दहिहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या मंडळास पाच ते पन्नास लाख बक्षिस देणारीही मंडळे आहेत. चंदेरी दुनियेतील हिरो हिरॉइन्स किंवा डान्सर सेलिब्रेटीज कोणी दोन पाच लाखांपासून ते पंधरावीस लाखांपर्यंत बिदागी घेतल्याशिवाय फिरकत नाहीत. एवढी उधळपट्टी करून चर्चा होते ती फक्त डान्स बारची. लावणीच्या नावाखाली हिडिस, बिभत्स नि उत्तेजक नृत्यांचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. दहिहंडी उत्सवात मुंबई-ठाण्यात मिळून अडिचशेपेक्षा जास्त गोविंदा जखमी झाले, पाच जणांचे मृत्यू झाले. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य काय, याची कोणाला चिंता नाही. दहिहंडी झाली, आता गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात सारे गुंतले आहेत. नंतर नवरात्री गरब्याची अशीच धुमधडाक्यात तयारी सुरू होईल. आता त्यात काय होणार याची चाहूल आताच लागू लागली आहे.

(लेखक डॉ. सुकृत खाडेकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जनतेसाठी आश्वासक चेहराः तुकाराम मुंढे!

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे राज्यातील जनतेची मने अल्पावधीतच जिंकली आहेत. नियम व कायदे यांची काटेकोर व कठोरपणे अंमलबजावणी करणारा नोकरशहा अशी त्यांची ख्याती आहे. दुर्जनांचा कर्दनकाळ आणि...

तरूणाईला भुरळ राहुल गांधींची!

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशात जातील तिथे तरूणांची गर्दी खेचत आहेत. देशाच्या राजकीय पटलावर काँग्रेस पक्ष हा भाजपाचा शत्रू नंबर एक आहे. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करायचा व निवडून आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात आणायचे, अशी दुहेरी...

तावडेंच्या नेमणुकीने महाराष्ट्र भाजपात ‘समझनेवालोंको’…

नितीन नबीन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल दोनशेनऊ दिवसांनी पक्षसंघटनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नव्या टीममधे पियुष गोयल, स्मृती इराणी यांचा समावेश झाला आहे. पक्षाच्या आयटी सेलच्या प्रमुखपदावरून अमित मालवीय यांची उचलबांगडी झाली असून...
Skip to content