महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ संबोधून काँग्रेसने नव्या वादाला तोंड फोडले आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर सुनेत्राताईंकडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व आले. हे नेतृत्त्व स्वीकारताना त्यांनी कोणतीही बडबड न करता आवश्यक असेल तेथे बोलून आपला कारभार चालवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत नाही किंवा कोणी त्यांची फारशी स्तुतीही करत नाही. प्रशासकीय कारभाराबाबत अजितदादांसोबत सुनेत्राताईंची तुलना करणे अगदीच अयोग्य आहे. अजितदादांचा स्पीड सुनेत्राताईच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याला जमू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षाही करणे चुकीचे आहे. मात्र, अजितदादांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना काही काळ उपमुख्यमंत्रीपदाची कमान सांभाळावी लागेल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नाही किंवा विरोधकांना आव्हानही दिले नाही.

सुनेत्राताई सौम्य प्रकृतीच्या वाटत असल्या तरी त्यांना धाराशिवच्या पाटील घराण्याचा वारसा आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. पद्मसिंह पाटील यांनी एकेकाळी आपली कारकीर्द गाजवली आहे. अजितदादांच्या जाण्याला वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना शांतपणे कारभार हाकावा लागेल हे त्यांनाही माहित आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना अंतर्गत त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचेच सहकारी करत आहेत. परंतु यासंदर्भात कोणत्याही राजकीय प्रतिक्रिया न देता त्या निर्णय घेत आहेत. काही निर्णय त्यांना मनाविरुद्धही घ्यावे लागत आहेत. परंतु एवढा मोठा पक्ष सांभाळताना ही कसरत करावी लागेल याची त्यांना कल्पना आहे. दोन्ही मुलगे पार्थ आणि जय मोठे असले तरी त्यांना अजितदादांएवढी राजकीय परिपक्वता नाही. अजितदादा शरद पवार यांच्या सावलीत वाढल्यामुळे आणि 24 तास राजकारणी असल्याने त्यांना राजकीय परिपक्वता होती. त्याचबरोबर अजितदादांची प्रशासनावरील पकड मजबूत होती. अधिकारी दादांसमोर जाताना पूर्ण तयारीने जात असत. दादांकडून कोणती गुगली कधी येईल याची कल्पना नसे. दादांची प्रशासनावर पकड तर होतीच परंतु चांगले अधिकारी निवडण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. या सर्व गोष्टी सुनेत्राताई लगेचच पूर्ण करतील अशी अपेक्षा कोणीही धरू नये.
काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी ‘गुंगी गुडीया’ हा मुद्दा उचलला असला तरी सुनेत्राताई त्याला आपल्या कामाने उत्तर देतील. अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीला न देता मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहे. त्यावरूनही टीका होत आहे. मुळात खात्यावरून लगेचच मुख्यमंत्र्यांशी किंवा भाजपशी दोन हात करणे योग्य नाही, हे सुनेत्राताईंना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही. मुळात बीडवरून खरी राजकारणाला सुरुवात झाली. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवरून अजितदादा हयात असताना खूपच टीका झाली होती. यावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामाही घेण्यात आला होता. बीडचे पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे ठेवले होते. पालकमंत्रीपद फक्त स्वतःकडे न ठेवता अजितदादांनी तेथे जाऊन वारंवार बैठकाही घेतल्या होत्या. बीडची कायदा-सुव्यवस्था वठणीवर आणली होती. त्याचबरोबर बीडमध्ये राष्ट्रवादीची प्रतिमा कशी सुधारेल याकडे लक्ष दिले होते. अर्थात मुंडेंना सोबत घेऊन या सर्व गोष्टी दादांनी केल्या होत्या.

दादांच्या अकाली निधनानंतर बीडचे पालकमंत्रीपद सुनेत्राताईंनी स्वतःकडे ठेवले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी बीडचा दौरा केला आणि बीडमध्ये बैठकाही घेतल्या. या बैठकांनंतर पत्रकारांना सामोरे जाताना धनंजय मुंडे ताईंसोबत होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला अर्धवटच उत्तरे त्यांनी दिली. बीडच्या कायदासुव्यवस्थेचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुंडे यांनी ताईंना बोलू न देता पत्रकार परिषद गुंडाळली. त्यावरून काँग्रेसने सुनेत्राताईंना ‘गुंगी गुडिया’ ठरवले. मुळात एका पत्रकार परिषदेतून किंवा चार-पाच महिन्यांच्या कारभारानंतर लगेचच एखाद्या राजकीय नेत्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येत नाही. परंतु काँग्रेसने ही टीका करण्यामागे काय गणित आहे हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळच सांगू शकतात.
काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ ही टीका उपमुख्यमंत्री सुनेत्राताई सकारात्मक घेऊन आपल्या कामाला सुरुवात करतील. इंदिरा गांधी यांनाही विरोधकांनी ‘गुंगी गुडिया’ ठरवले होते. त्याच इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्त्वाने विरोधकांना ‘दुर्गा’ म्हणून स्तुती करण्यास भाग पाडले. सुनेत्राताईंनीही आपल्या कामगिरीने आपण ‘गुंगी गुडिया’ नसून दुर्गा आहोत हे सिद्ध करावे.
(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)
- 9892514124

