Homeबॅक पेजजेव्हा फोटो जिवंत...

जेव्हा फोटो जिवंत करणाराच ‘फोटो’त जातो…

गेल्या आठवड्यात एक दुःखद बातमी सकाळी, सकाळीच आली.. रजनीश गेला. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो सर्वांनाच गुंगारा देत मस्त फोटो शोधत असायचा नेहमीच!) तो दिवस सुरु व्हायच्या आधीच अंतर्धान पावला होता. रजनीश यकृताच्या विकाराने बेजार होता. रुग्णालयात दाखल केले होते. घरीच औषधे व उपचार करा, असे सांगून डिस्चार्ज मिळाला होता. तब्येत सुधारत होती. स्थिर होती. अचानक हार्टअटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. धडपडीचा तसेच चपळाईचा क्षण थप्प झाला. आपला रजनीश कायमचा निघून गेला..

काकडे कुटुंबाशी संबंध

काकडे कुटुंबाशी गेल्या ५० वर्षांपासून माझे संबंध आहेत. रजनीशचे वडील मंदार काकडे (ते डॅडी काकडे या नावाने ओळखले जात) गेल्या जमान्यातील ख्यातनाम वृत्तपत्र छायाचित्रकार! छाया: मंदार काकडे या नावाने प्रसिद्ध होते. ते नुसतेच छायाचित्रकार नव्हते तर ते छायाचित्राबरोबर बातम्याही पुरवायचे! त्याही प्रसिद्धीपत्रकासह!! आजकाल एजन्सीजचे पेव फुटले आहे. शिवाय दरही आस्मान छू रहे है.. असे असतानाही बातमी आली नाही की ग्राहक विचारू शकत नाही की बातमी का आली नाही? विचारलेच तरी आम्ही आमचे बातमी देण्याचे काम केले होते, का आली नाही हे आम्हाला माहित नाही अशी उडवाउवीची उत्तरं मिळतात, असा सर्वत्र अनुभव आहे. पण त्याकाळात तसे कुणीही करत नसे. फोटोसह तयार बातमी कुणाला नकोय? म्हणून बहुतांशी वर्तमानपत्रे काकडे यांच्याकडून आलेली बातमी व फोटो घ्यायचेच व ती छापूनही यायची.

याच फोटोची ‘जीन’ काकडेच्या राजू व रजनीशमध्ये अवतरली तर ते अजिबात नवल नव्हते. राजू काकडे यांनीही आपल्या परीने लोकसत्ता गाजवले होते. ९३च्या मुंबई दंगलीतील राजूचे फोटो गाजले होतेच. राजकीय फोटोही गाजले होते. माजी मुख्यमंत्री एकटेच खुर्चीत बसलेले व बाजूच्या सर्व खुर्च्या रिकाम्या.. असा एक फोटो गाजला होता. काकडे कुटुंबाविषयी विस्ताराने इतक्यासाठीच सांगितले की, रजनीशची बॅकग्राऊंड आजच्या पिढीला नीट कळावी! तर वर्तमानपत्र वा वृत्त विभागाला कोणत्या प्रकारचा फोटो लागतो याची जाण रजनीशला उपजतच होती. या जाणीवेपोटीच तो जिवन्त फोटोसाठी काही तास बैठक मारून बसत वा उभा राहत असे. उभा राहिला तर सतत जागा बदलत असे. मानजोगा ‘अँगल’ मिळत नसे तोवर तो सैरभैर होत असे. २६/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याची नजर ताजमहाल हॉटेलवरून कित्येक तास खिळळी नव्हती हे त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. हे सर्व फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते हे सांगायला नकोच.

आजचा हा विषय नाही. पण वृत्तपत्रसृष्टीत छायाचित्राचे महत्त्व रघु राय या ज्येष्ठ छायाचित्रकाराने अधोरेखित केले, हे मान्य करायला हरकत नाही. त्यांची संडे या साप्ताहिकात आलेली छायाचित्रे गजलेली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये सॅबी फर्नांडिस, वसंत प्रभू, मुकेश पारपियानी, राजू काकडे, दिलीप कागडा आदींनी पत्रकारितेच्या प्रवासात चांगलीच साथ दिली हे मान्यच करावे लागेल. यापैकी काहीजण अजूनही मदत करतच असतात. रजनीशचा आणि माझा तसा जास्त संबंध आला नाही. पण ज्या-ज्या वेळी तो समोर यायचा तेव्हा बाजूला घेऊन अत्यन्त आदराने विचारपूस जरुर करायचा. आता अशी विचारपूस करणारी माणसे हळूहळू पडद्याआड होत आहेत. “A photograph is usually looked at – seldom looked in to it” असे म्हणतात. यातील दुसरा भाग रजनीशच्या छायाचित्राला लागू होतो. पण काय करणार? आणखी आनंद देण्याआधीच तो निघून गेला.

एका वेगळ्या अर्थाने…

“रोज तारों को नु्माईश में खलल पडता है..
चांद पागल है अंधेरे में निकल पडता है” (राहत)

छायाचित्रेः काकडे कुटुंबीय आणि वसंत प्रभू

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content