१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही काळ ठप्प!

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या लसींमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते. सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

कोविशिल्डचादेखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचा आहे. महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात प्रयत्न केले जात असून विविध जिल्ह्यात ३००पेक्षा जास्त पीएसए यंत्र खरेदीचे कार्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इथेनॉल प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रयोग उस्मानाबाद येथील धाराशीव साखर कारखान्याने केला असून या कारखान्यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दररोज ४ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाली आहे. त्याद्वारे दररोज ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पुरविता येतील, असे ते म्हणाले.

राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नुतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेले इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हाफकीनकडे मागणी नोंदविण्यात आली असून ती दिवसांची निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रीया केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content