Homeब्लॅक अँड व्हाईटपूर्णेकरांच्या हत्त्येनंतर आता...

पूर्णेकरांच्या हत्त्येनंतर आता चिडीचूप, दिवाळीत मात्र फुटणार फटाके!

ठाणे शहराच्या मनोरमा नगर परिसरातील गणेश नगराजवळील कार्यालयात निर्दयपणे हत्त्या करण्यात आलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या हत्त्येसंदर्भात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना आश्चर्चकारकरित्या ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांनी सर्वांना चकितच करून सोडले. मीनाक्षी शिंदे, ठाण्याच्या माजी महापौर असून एकनाथ शिंदे गटाच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. पूर्णेकर यांच्या हत्त्येनंतर त्यांचा मुलगा तसेच कुटुंबियांनी या हत्त्येत राजेंद्र यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. हत्त्येनंतर ठाणे पोलीस व विशेषतः गुन्हे शाखेने कसून तपास करून अगदी उत्तर प्रदेशात जाऊन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या. तरीही सूत्रधार मोकळाच असल्याने चर्चेला नवनवे स्वरूप प्राप्त होत होते. त्यातच विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या ‘भयमुक्त मोर्चा’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहून मुख्यमंत्री कार्यालयातून वाढलेला दबाव तसेच ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची काहीशी निर्वाणीची भाषा, जनतेचा असंतोष या सर्वांचा एकत्रित परिणाम व्हायचा तोच झाला व आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांनी सारासार परिस्थितीचा विचार करून एकदम घूमजाव केले व राजेंद्र शिंदेंना पोलिसांच्या झोळीत टाकले!

पूर्णेकर

इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांचे सहकारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बाळूच्या घरीच गेले. वाचकहो.. बाळूची दुर्दैवी हत्त्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या हत्त्येशी किसन नगरशी संबंधित नामचिन लोक निगडित आहेत, असे सातत्याने सांगत होतो. पोलीस तपासातही हे उघड झाले. खरंतर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने यापासून बोध घेणे गरजेचे असून डेप्युटी सीएम ऑफिसमधून बोलतोय… असे फोन विनविलंब बंद केले जावेत. खरा तपास आताच सुरू झालाय. हत्यारे पकडले गेले आहेत. सूत्रधारही समोर आहेत. खरंतर गुपित उघड व्हायला हरकत नाही. पण असे होत नाही, होणारही नाही. कारण सध्या उत्सवाचे वातावरण आहे. आणखी दोनतीन महिने तरी चालणारच. हे वातावरण बिघडावे अशी कोणाचीच इच्छा नाही. म्हणूनच हाती आलेले पुरावे, आरोपीचे जाबजबाब, फिर्यादी पक्षाचे म्हणणे याची सांगड घालताना पोलिसांची मात्र दमछाक होणार आहे.

अंमली पदार्थ व गावठी दारूचे सेवन तरुण व लहान मुलांमध्ये वाढत असून या सणवारात त्यांना टार्गेट करून आपला व्यवसाय वाढवण्याचा उद्देश्य अंमली माफियाचा असून ठाणे शहरातच त्यांचा हा व्यवसाय काही हजार कोटींचे उद्दीष्ट समोर ठेवू शकतो. त्यातच अशा बरकतीच्या धंद्यास माजिवडा ते अगदी कासारवडवलीपर्यंत व्हाया आझाद नगर.. इतक्या मोठ्या भागास बाळूमुळे ‘ब्रेक’ लागला होता. या ब्रेकनेच त्याच्या आयुष्याला ब्रेक दिला. बिच्चारा! सध्या किसन नगर, वागळे इस्टेट, कोपरीतील बारा बंगला व टाकीखाली गुमान शांतता आहे. काही दिवस चिडीचूप… दिवाळीत मात्र फटाके फुटणार!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला 'सुकून' मिळेल असं काहीतरी हवं होतं हे 'सुकून' पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने 'सुखन ए पान'चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ...

पूर्णेकरांवर झाडलेल्या गोळ्या पप्याच्या ‘घोड्या’तूनच!

प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या 'घोड्या'तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे. "थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू...

ठाण्यात पोलिसांसमोरच तुडवले जाते तर नेते पाहतही नाहीत सूर्योदय!

एखादी ओटीटीवरील सिरीज पाहतोय असं तर वाटतं नाही? मलाही प्रथम असच वाटत होतं. पण ठाणे शहरात घटनाच अशा घडत आहेत की ओटीटी निर्मात्यांनीही तोंडात बोटे घालावीत! कालच्या गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे पोलिसांचे जणू ग्रहच बदललेत असं वाटतं. शुक्रवार-शनिवार गणपती विसर्जनात...
Skip to content