.. तर शरद पवारांनी ताबा घेतला असता ‘राष्ट्रवादी’चा!

अखेर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या ४ दिवसांत सुनेत्रा अजित पवार ह्यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते, त्यांचे कुटूंबीय ह्यांच्या चर्चां, वहिनींवर टीका हे तर विविध प्रसारमाध्यमातून चालूच आहे. पण, एका मोठ्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर विशेष संपादकीय लिहून “सुनेत्राताई तुम्ही चुकलात“ हेही सांगायला कमी केले नाही. मुळात इतकी घाई काय होती? अजितदादांचे सूतक चालू असताना शपथविधी कशासाठी? नंतर झाला असता की शपथविधी, असेही बोलायला कमी केले नाही. अग्रलेखात हिंदू धर्माच्या परंपरेचा दाखला देण्यात आला आहे. मात्र ह्या संपूर्ण दिवसात एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळला असताना, टीकेला तोंड देत असताना, दुसरीकडे अतिशय संयमीपणे आणि धीरोदात्तपणे त्यांनी शपथ घेतली.

ह्या शपथविधी कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबाने बहिष्कार टाकला होता. त्यावरूनच आता पवार कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे हेही दिसून आले. राजकीयदृष्ट्या काहीही झाले तरी पवार कुटूंब एकत्र असते असा जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता, विशेषतः अजितदादांच्या बंडानंतर, तो ही फसला. शरद पवारांनी तर शपथविधीच्या दिवशी सकाळीच पत्रकार परिषद बोलावून सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीची मला माहिती नाही असे जाहीर केले. त्यावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. मुळात शरद पवारच्या गोटात पोटशूळ उठला ते त्यांना न सांगता, त्यांची परवानगी न घेता सुनेत्रावहिनींनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी होकार दिला. पण हे पाऊल जर घाईघाईने उचलले नसते, दहा दिवस थांबल्या असत्या तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाचा ताबा घेतल्याशिवाय राहिले नसते. ह्याची जाणीव झाल्यामुळेच, आणि ती दादा गटाच्या नेत्यांनी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे ह्यांनी करून दिल्यामुळे, वहिनींनी होकार दिल्याचे समजते.

पवार

अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळी सुप्रिया सुळे ह्यांची देहबोली ह्याचे निदर्शक आहे. ज्या पद्धतीने त्या सुनेत्रावहिनींना हाताला धरून नेत होत्या, अगदी एखाद्या कार्यात मिरवतात, त्याप्रमाणे वावरत होत्या, पुढे पुढे करत होत्या, आता अजितदादानंतर आपणच राष्ट्रवादीच्या मुख्य पदावर पोहोचणार ह्याची झलक त्यांनी ह्यावेळी दाखवून दिली. इतकेच नाही तर अस्थीविसर्जनानंतर लगेचच शरद पवार बारामतीमध्ये नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी गावकऱ्यांना भेटले आणि मी पुन्हा सक्रिय झालो आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीची सूत्रे माझ्याच हातात राहणार याचे संकेत दिले. हीच बाब दादा गटाच्या नेत्यांना रुचली नाही आणि त्यांनी रात्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली आणि दादांचे उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रावहिनींना देण्याची मागणी केली. फडणवीसांनीही समयसूचकता दाखवून त्याला तत्काळ मान्यता दिली. आमच्या मित्रपक्षाला आम्ही कायम आधार देऊ असेही ते म्हणाले. इतकेच नाही तर दादा गटाच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन सुनेत्रावहिनींना विधिमंडळ पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निवडले. तसा ठराव एकमताने मंजूर केला.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरण होणार की नाही, ह्याच्या चर्चा रंगल्या आहेत. स्वतः शरद पवार ह्यांनी सांगितले की, विलिनीकरण व्हावे ही दादांची इचछा होती आणि १२ तारखेला ते जाहीरही होणार होते. ह्याशिवाय त्यांच्या पक्षातले अन्य नेते, रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे ह्यांनीही ह्याला दुजोरा दिला. पण एकत्र येण्याला दादा गटाच्याच आमदारांचा विरोध आहे. एकत्र येऊन काय करणार? मुळात शरद पवार ह्यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपाला पाठिंबा देणार का, हा मुख्य प्रश्न आहे. आणि भाजप तो स्वीकारणार का हाही प्रश्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलिनीकरण होऊ शकत नाही आणि अजितदादा मला तसे काही बोलले नाहीत असे सांगून पवारांचा दावा फेटाळला आहे. राष्ट्रवादी पवार गट आता हतबल झाला आहे. कारण दादा गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आता विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रावाहिनी घेतील असे सांगितले आहे आणि वहिनींच्या एकूण वागण्यावरून त्या इतक्यात असा काही निर्णय घेतील असे वाटत नाही.

पवार

नुसती शपथ घेऊन भागत नाही. त्यांच्यापुढे, अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना एकत्रित ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. राज्यकारभाराचा, प्रशासनाचा जरी अनुभव नसला, तरीही मिळालेले पद आणि खाती यशस्वीपणे सांभाळून दाखवणे हेही आव्हान आहे. अजितदादांच्या बंडानंतर पवार कुटुंबियांनी त्यांना एकटे पडले होते, ते वाहिनी विसरल्या नाहीत असे वाटते. ह्यामुळेच कदाचित त्यांनी शरद पवारांची परवानगी घ्यायची तसदी घेतली नसावी. ह्यापुढील वाटचालही त्यांच्या परवानगीशिवाय करणार हे त्यांना दाखवून द्यायचे असावे. कारण त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा उल्लेख पवारांनी बाहेरचे पवार आणि सुप्रिया सुळे ह्यांचा उल्लेख घरचे पवार असा केला होता. हा अपमानही कदाचित त्या विसरल्या नसाव्यात. लग्नाला ३९ वर्षे होऊनही सासरे जर बाहेरची म्हणून सुनेचा उल्लेख करत असतील तर ते कुणाला आवडेल? असो.. पण सूतक संपल्यानंतर सुनेत्रावहिनींची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होईल आणि मग अजितदादा गटाततरी वाहिनीसाहेब म्हणतील ती पूर्व दिशा असेल!

(लेखिका वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

पावसापाण्यात मुंबईकरांना आशा फक्त देवाभाऊंकडून!

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण राज्यात अनेक भागात कुठे रेड अलर्ट, कुठे ऑरेंज तर कुठे यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. एल निनोमुळे यंदा पाऊस कमी बरसणार असे सगळे सांगत होते. मात्र...

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंची धरसोड वृत्ती आली अंगलट!

ऑपरेशन टायगर शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत परत आले, तर आल्याआल्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानी त्यांना आणखी एक धक्का दिला. उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे ह्यांचे विश्वासू सचिन अहिर ह्यानी पक्षाला...

उरलेल्या उबाठा सेनेपुढे फुटीचे आव्हान कायम!

अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी  झाले. शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी जाहीरपणे ते शिंदे ह्यांच्याबरोबर आहेत, असे कालच सांगितले. त्यामुळे ऑपरेशन टायगरची अनिश्चितता संपुष्टात आली. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना शिंदे म्हणाले की, आम्ही कुठलेही...
Skip to content