ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला ‘पिंजऱ्यात’ का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता क्र. 2 वरील सुभाष नगर. नेमकं स्थळ- गणपती मंडप व ह्युंदाई देखभाल केंद्राच्या आसपास. आरोपी- राजू वाल्मिकी, राहणार- सुभाष नगर + गांधी नगर. राजू हा अट्टल गुन्हेगार असून तो याआधी बऱ्याच गंभीर गुन्ह्यात आत जाऊन आलेला आहे.
गेल्या 20 वर्षांत सत्यानाश
टोलेजन्ग आणि पॉश लोकवस्ती असलेल्या इमारतींसमोरच पोखरण रस्ता क्र. 2 येथे ही बहुचार्चित सुभाष नगर व गांधी नगर ही वस्ती आहे. वस्तीत नेहमीप्रमाणेच परप्रांतीयांचा खच्चून भरणा आहे. दक्षिण भारतीय नाडार, युपी-बिहारचे भय्ये मुस्लिम, कर्नाटकातील कानडीबाबू आदींचा मेळावा म्हणजे सुभाष व गांधी नगर. पाईपलाईन रस्ता म्हणून हा भाग ओळखला जातो. ठाणे व मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाईपलाईन्स या नालासदृश्य जागेतून जातात. परंतु या परिसरला सुक्या नाल्याचेच जणू स्वरूप प्राप्त झालेले दिसले. कचऱ्याचे मोठे ढिगारे, राबीटचा कचरा… गटाराचे पाणी, अर्धवट कामं केलेली बांधकामे आणि दूरवर जाणारा बोळवजा रस्ता! दोन बोळ आहेत. रस्त्याची रुंदी केवळ तीन पावले! शरीर वाकडे करूनच येथे प्रवेश घ्यावा लागतो. टपरीवजा राहण्याची सोय करणारे जणू क्यूबिकच! सर्वत्र घाण हे अविभाज्य लक्षण.
75 टक्के गुन्हेगारवस्ती
ही सर्व परप्रांतीय मंडळी गेल्या 10/15 वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मूळ राज्याचे तरी ओळखपत्र वा आधारकार्ड असेल की नाही याची शंका वाटली आणि संतापाची बाब म्हणजे कुठलेही कार्ड नाही, त्याची शहानिशा नाही, तरीही यांच्यासाठी मोठी SRA योजना आहे. म्हणूनच वर म्हटले यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप.. गणपत, नायडू, हऱ्या आदी गेल्या काही वर्षांतील येथील नामचिन गुंडाची नावे! एक सालियनही होता म्हणे! राज्यातील दंगली व जातीय दंगलीत याआधी पोलिसांचा मृत्यू झाल्याच्या घटना आहेत हे मान्य. मुंबईच्या एका जातीय दंगलीत नंदकुमार गोखले या उपनिरीक्षकला दंगलखोरांनी गटाराच्या मेनहोलमध्ये टाकले होते, या अंगावर शहारे आणणारी गोष्टीची आठवणही झाली. ठाणे जिल्ह्यातीलच भिंवडीतील जातीय दंगलीतही पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. परंतु नॉर्मल वेळेत उपनिरीक्षकाला मारल्याची घटना ही अलीकडील इतिहासातील पहिलीच असावी.

हा राजकीय हस्तक्षेप नाही का?
राजकीय हस्तक्षेप, असे का म्हणतो याचे कारण आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही गुंडाची यादी देऊन या सर्वांना तडीपार केले जावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. अर्थातच आयुक्तांच्या या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवली गेली, हा इतिहास ताजा आहे. त्यानंतर पोलिसांनी या गुंडांच्या हालचालींवर कडक लक्ष ठेवून त्यांना काबूत ठेवले होते. राजकीय हस्तक्षेप वाढला की पोलीस स्वतःचेही मीटर डाऊन करून आपले गैरप्रकारही सुरु करतात, अशाही तक्रारी आहेत. काही पोलीस गैरप्रकार करत असतीलही, पण सर्व पोलीस दल असे नाही, असेही सांगावेसे वाटते.
नेमके काय झाले?
24च्या रात्री नेमके काय झाले? सुभाष नगर येथील वाल्मिकी समाजमंदिराजवळून दारूच्या नशेत असलेल्या राजूचे बकोट धरून भोईर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी त्याला पिंजऱ्यात टाकला! पिंजऱ्यात टाकताच तो गुरगुरला. मला का धरलंय, मी काय केलेय, हे तुणतुणं बराच वेळ ऐकल्यानंतर भोईर यांनी त्याला गणपती मंडपाजवळ पिंजऱ्यातून खाली उतरविले. हीच चूक महागात पडली. खाली उरताच राजूने पुन्हा टेप लावली- मी काय केलंय… आवाज वाढत होता. राजू पळायच्या तयारीतच होता. प्रथम त्याने जोराचा हिसका देऊन स्वतःला मोकळे केले व जवळच रस्त्यात असलेली सिमेंटची वीट भोईर यांच्या अंगावर भिरकावली! घाव वर्मी बसल्याने भोईर तेथेच खाली आडवे झाले. जमाव जमला होता. राजूने पळण्याचा प्रयत्न केला. पण यशस्वी झाला नाही. त्या धावपळीतही भोईर यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण दाखल होण्याआधीच त्यांचे निधन झाले होते.
अट्टल गुन्हेगार बाहेर?
राजू हा अट्टल गुन्हेगार ाहे, असे सांगितले जात आहे. मग असा हा अट्टल गुन्हेगार, गुंड बाहेर कसा? आणि समजा कोर्टाच्या आदेशाने तो बाहेर असेल तरीही त्याला काही नियमांची चौकट असतेच ना? पोलीसस्टेशनमध्ये हजेरी, सणाच्या आधी स्टेशनमध्ये बोलवणे, त्याच्यामागे विशेष शाखेचे अधिकारी लावून त्याच्या हालचालीचे निरीक्षण करणे वगैरे.. हे सर्व केले असेल तर त्याचे अहवाल असतीलच. पण, तसे केले नसेल तर संबंधितांना आयुक्तांनी सरळ घराचा रस्ता दाखवावा. ठाण्यातील गुंडगिरी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना पुरेसे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. ठाणे शहरातील काही नामचिन गुंड सत्तेत जो पक्ष असतो त्याच्या जवळचे आहेत, असे दिसून येते. सर्वत्र हेच दिसते. राजकीय नेत्यांनी एकतर आपल्या या बगलबच्चांना नियंत्रणात ठेवावे किंवा सरळ पोलिसांना सांगावे. दरवेळी त्यांना सांभाळत गेलात तर एक दिवस तुम्हालाच सांभाळावे लागेल. असे होऊ नये असं वाटतं असेल तर आताच सावध व्हा.”Being good police officer is one of the difficult, dangerous, idealistic job in the World”, असं का म्हणतात ते ठाणे शहरातील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मी सांगायला हवे असे नाही! “Evil is powerless if the good people are unafraid” हेही जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवायला हवेच!
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आणि गुन्हेविषयक क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

