Homeहेल्थ इज वेल्थ४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती?...

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास जगप्रसिद्ध ‘जामा कॉर्डिओलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून या विषयावर आजवर झालेला हा सर्वात व्यापक अभ्यास आहे. १०,०३६ महिलांच्या दशकांपर्यंतच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करताना संशोधकांना १,०००हून अधिक हृदयविकाराच्या घटना आढळल्या, ज्यात घातक आणि बिनघातक दोन्ही प्रकारच्या हार्टअटॅकचा समावेश होता.

संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे, स्पष्ट निरीक्षण

रजोनिवृत्तीनंतर शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक (हार्मोन) कमी होते. हे इस्ट्रोजेन हृदयाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, रक्तवाहिन्या लवचिक राखणे आणि जळजळ (इन्फ्लेमेशन) कमी करते. वयाच्या चाळीशीआधीच हे इस्ट्रोजेन कमी झाले, तर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (‘प्लेक’) जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते, रक्तदाब वाढतो आणि चयापचय बिघडते. धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जोखीम घटकांशी जुळवून घेतल्यानंतरही हा धोका ४१ टक्के जास्त कायम राहतो, हे या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे आणि स्पष्ट निरीक्षण आहे.

भारतीय महिलांमध्ये ४७ ते ४८ वर्षे वयात रजोनिवृत्ती

साधारणपणे अमेरिकेत वयाच्या ५१व्या वर्षी रजोनिवृत्ती होते. ४० ते ४५ वयात झाली तर ‘अर्ली मेनोपॉज’, तर ४० वर्षांपूर्वी झाली तर ‘प्रिमॅच्युअर मेनोपॉज’ असे म्हटले जाते. भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय ४७ ते ४८ वर्षे आहे, जे पाश्चिमात्य देशांपेक्षा कमी आहे.

ग्रामीण भागात अकाली रजोनिवृत्तीचे प्रमाण जास्त

अकाली रजोनिवृत्तीची कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली तरी अनुवांशिकता, धूम्रपान, स्थूलपणा आणि दीर्घकालीन मानसिक ताण (क्रॉनिक स्ट्रेस) यांचा त्यात मोठा वाटा असतो. भारतात ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, सततचा शारीरिक थकवा आणि आरोग्यसुविधांचा अभाव यामुळे हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.

हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्याचा महत्त्वाचा इशारा

अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. प्रिया फ्रीनी यांनी सांगितले की, “४० वर्षांपूर्वी रजोनिवृत्ती आली तर, ती केवळ स्त्रीरोगविषयक बाब नसून हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्याचा एक महत्त्वाचा इशारा आहे. असे झाल्यावर लगेच रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तशर्करा, वजन आणि झोपेची तपासणी व्हायला हवी.” महिलांनी डॉक्टरांकडे आपल्या रजोनिवृत्तीची माहिती स्वतःहून द्यावी आणि हृदयरोग प्रतिबंधाचे नियोजन सुरू करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हृदयाने पाठवलेले पहिले पत्र; दुर्लक्ष करू नका!

नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी- या चार गोष्टी या धोक्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकतात. हे संशोधन म्हणजे भारतीय महिलांसाठीही एक स्पष्ट संकेत आहे- वय ४०च्या आधीच मासिक पाळी बंद होण्याकडे दुर्लक्ष नको, ते हृदयाने पाठवलेले पहिले पत्र असू शकते!

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content