Sunday, April 27, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजदादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता...

दादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता ‘आपलेतुपले’ सुरू!

मुंबईच्या दादर (प.) परिसरातील फेरीवाल्यांची गर्दी पाहतच मी मोठा झालो आणि आता म्हाताराही! येथील गर्दी काही हटत नाही. उलट ती दिवसागणिक वाढतच जात आहे. तशातही काही पोलीस व महापालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असतात हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. पण या कौतुकातही ‘आपले तुपले’ असल्याने केवळ नाईलाजाने आज हे लिहावे लागत आहे. सणवार मग तो हिंदूंचा असो की मुसलमानांचा की ख्रिस्ती बांधवांचा.. दादरला नेहमीच जत्रेचे स्वरूप येते हे काही नव्याने सांगायला नको. सध्या या संबंधात खटलाही उच्च न्यायालयासमोर आहे. यात सर्वच यंत्रणा मुंबई शहर फेरीवालामुक्त असावे असे एकमुखाने सांगत असल्या तरी प्रत्यक्षात जमिनी हकीकत वेगळीच आहे हे मुंबईकर जाणून आहेत.

दादरच नव्हे तर शहरातील तसेच दोन्ही उपनगरातील अनेक रेल्वेस्थानकांचे परिसर म्हणजे मोठे मार्केट परिसरच झालेले आहेत. दादर येथे जवळजवळ सर्वच बाजार असल्याने पश्चिमेला जरा प्रचंडच गर्दी असते हे मान्यच करावे लागेल. सर्वच सरकारी यंत्रणा आपापल्या मते फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत असतात हेही मान्य केले पाहिजे. परंतु त्यामानाने फेरीवाल्यांचा उपद्रव काहीसा कमी असलेला विभाग म्हणजे पोर्तुगीज चर्चचा परिसर. येथे काही खाऊगल्ल्या रात्रीच कार्यरत असतात. त्यांचा तसा कुणालाही त्रास नसतो, आता खाताना काही खवय्ये मोठ्याने बोलत असतील तेव्हडेच!

या आवाजाव्यतिरिक्त मोटारचे हॉर्न, बसेसचे कर्णकर्कक्ष ब्रेकचे आवाज, मधूनच एखाद्या रुग्णवाहिकेचा सायरन आदी अनेक आवाज पोर्तुगीज चर्च परिसरात होतच असतात. त्यात नवीन काहीच नाही. पण याच परिसरात म्हणजे उदय टेलर असलेली इमारत व जवळच असलेल्या कृष्णकुंज इमारतीतील एका माजी क्रिकेटपटूच्या दूरच्या नातेवाईकाला आवाजाचा वा फेरी धंद्याचा त्रास होतो म्हणून क्रिकेटपटूच्या नावाचा संदर्भ देत शिवाजीपार्क पोलीसठाण्यात तक्रार झाली तर त्या बिचाऱ्या टपरीवर कारवाई होणारच! बरे

त्यांनी गाडी न लावता खाण्याच्या ऑर्डरी पुऱ्या करायचे ठरवले तर कोपऱ्यावर ठेवलेल्या वस्तूंचा फोटो काढून पोलीसठाण्याला पाठवणारे महाभागही आहेतच! जसं काही त्या परिसरात दुसरं काही चालतच नाही. याच इमारतीपासून दहा-पंधरा पावलावर एक-दोन मोठे ठेलेही आहेत. त्यांचा त्रास मात्र होत नाही, हे न पटणारे तर्कशास्त्र आहे. येथूनच अजून दहा पावले दूर कुणी ठेलेवाल्याने पूर्वीचा टेलिफोन बूथ सोडून मोठा आईस्क्रीम स्टॉल टाकलेला यंत्रणेला कसा चालतो? तोही आपला मूळ आकार सोडून सर्व पदपथ आपल्यात सामावून घेणारा? प्रत्येक वेळी गरीब फेरीवाला दंडाचे 1200 रुपये कुठून आणणार?

महिला नेत्याने बिर्याणी रस्त्यात ओतली!

याच दादर परिसरात बंगाली मुस्लिम फेरीवाले वाढल्याची तक्रार एका राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक महिला नेत्यानी केली होती. वास्तविक बेकायदा बंगाली घुसखोरांना शोधण्याचे काम मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे असताना व गृह मंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना त्यांनी जाहीर भाषणात आरोप का करावा हा येथील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. या महिला नेत्याने अगदी काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या महानगर टेलिफोन कार्यालयाबाहेरील पदपथावर एका मुस्लिम फेरीवाल्याचा बिर्याणी भरलेला टोप रस्त्यावर उपडा करून सर्व बिर्याणी रस्त्याला खाऊ घातल्याचा किळसावाणा प्रकार केल्याचेही अनेकांनी या प्रतिनिधीला सांगितले. या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री ‘सर्वधर्म समभाव’चा राग आळवत असताना या रागात हा बेसूर कशाला, असा सूरही काहींनी लावला.

आम्ही गर्दी करून जनतेला सतवणाऱ्या फेरीवाल्यांची बाजू घेत नाही तर काही ठराविक समुदायावर डुख ठेवून जी कारवाई होत आहे त्याचा निषेधच करू. दादर साफच करायचे असेल तर ते सर्व दादर साफ करा. एक कोपरा साफ करण्याचे नाटक नको, अशी जनतेची भावना आहे. शिवाय आता सणावाराचे दिवस असताना गरिबांवर कारवाई करताना सांभाळून कारवाई करा, असा खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सल्ला असताना गरिबांनाच हिसका दाखवण्याचा ‘तेजस्वी’ बाणा नको..

Continue reading

पार्ल्यातल्या ‘त्या’ जैन मंदिराची जागा ‘मोकळी’ झालीच कशी?

मुंबईच्या विलेपार्ले भागातील जैन मंदिर अनधिकृत ठरवून पाडले याचा निषेधच आहे. परंतु कांबळे वाडीतील संपूर्ण खासगी जमीन हॉटेलने विकत घेतली असून त्यांना तेथे विकास करायचा आहे. विक्री झाली ही बाब जैन मंडळींना माहित नाही असे होणारच नाही. अनधिकृत बांधकामाविरुद्धची...

म्हणे काही सेकंदांत दुसरी लोकल येणार!

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई भेटी वाढल्या आहेत. बरोबरच आहे, येत्या काही महिन्यांत (सहा महिन्यांत) मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या भेटीबाबत आक्षेप घेण्याचे कारणच नाही, कारण त्यामुळे का होईना निदान काही...

‘माईंड युअर बिझिनेस’ सांगणारे पवार व ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगणारे सचिव!

संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच तेथे आलेले होते. आम्ही पाणी पिऊन ताजेतवाने होईस्तो ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आमच्यात सामील झाला....
Skip to content