Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका बालकांना...

मुंबई महापालिका बालकांना देणार मोफत पीसीव्ही लस

मुंबई महापालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरूवात करण्‍यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने व रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे. पालिका क्षेत्रातील १ वर्षाखालील बालकांची संख्‍या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिली.

या लसीकरणाच्‍या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात येत असून क्षेत्रीय स्‍तरावर जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती पालिकेच्‍या आरोग्‍य खात्‍याव्‍दारे देण्‍यात आली.

विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. शासनाच्या निर्देशानुसार या लसीकरण मोहिमेत आता आणखी एका नवीन लसीचा अंर्तभाव करण्‍यात आला आहे. या लसीचे नाव ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (पीसीव्ही) असे असून या लसीमुळे न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारापासून संरक्षण मिळू शकणार आहे.

भारतात २०१०मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षांखालील अंदाजे १ लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात ५ ते ६ लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंददेखील झाली होती. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्‍हणजे फुफ्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते. ताप येतो व  खोकलाही येतो. तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, न्युमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.

पीसीव्ही लसीचे वेळापत्रक (Schedule)

पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे. २ प्रायमरी डोस वयाच्या ६ आठवड्यात, १४ आठवड्यात आणि १ बूस्टर डोस वयाच्या ९व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्‍या मांडीवर स्‍नायूमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या १ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसींसोबत देण्यात येईल.

Continue reading

आता टोलनाका ओलांडतानाच तपासला जाणार गाडीचा विमा

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका ओलांडताना आता फास्टॅगद्वारे केवळ टोलच कापला जाणार नाही, तर वाहनाच्या थर्ड पार्टी विम्याची वैधताही तपासली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने ही नवीन स्वयंचलित यंत्रणा सुरू केली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर...

आता ‘पीएफ’ची रक्कम घ्या नियमित हफ्त्याने

निवृत्तीनंतर पीएफचे पैसे एकाचवेळी काढायचे की हफ्त्याने घ्यायचे, हा प्रश्न आता सुटला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ने गुरुवारी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी)ला मंजुरी दिली. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळ (सीबीटी)च्या २४०व्या बैठकीत...

मतदारयादीत नाव नाही? अर्ज करा ३० नोव्हेंबरपर्यंत!

महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदारयादी पुनरिक्षण (एसआयआर)चे वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सुधारले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आता महाराष्ट्राची अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला नव्हे, तर मंगळवारी, २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार...
Skip to content