Homeब्लॅक अँड व्हाईटनावाप्रमाणेच 'समर्थ'चे देखणे,...

नावाप्रमाणेच ‘समर्थ’चे देखणे, शिस्तबद्ध शिबीर संपन्न

यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईतल्या दादर, शिवाजीपार्क येथील प्रख्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराचे सलग ५१वे ‘१० दिवसांचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर’ उत्साही वातावरणात नुकतेच संपन्न झाले. “समर्थ” या नावाला साजेसे असेच शिस्तबद्ध आणि देखणे आयोजन या शिबिराचे करण्यात आले होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. सलग ५१ वर्षे या शिबिराचे आयोजन करणारी बहुदा श्री समर्थ व्यायाम मंदिर ही संस्था भारतातील एकमेव असावी. अगदी कोविडच्या काळातदेखील हे शिबीर ऑफलाईन सुरुच होते. दरवर्षी शिबिरार्थीची संख्या वाढतच जाणारी असते. दरवर्षी हे शिबीर एप्रिलमध्ये होत असे. परंतु यंदा शाळा उशिरा संपल्यामुळे आणि मेमध्ये कडक उन्हाळा असल्यामुळे त्याचा परिणाम या शिबिरावर झाला. गेल्या वर्षीपर्यंत शिबिरात सहभागी होणाऱ्यांची संख्या २ हजारपेक्षा जास्त असायची. यंदा ती अर्ध्यावर आली. ५ ते ६५ वर्षांपर्यंत कोणीही या शिबिरात सहभागी होऊ शकते. दोन सत्रात झालेले हे शिबीर एकूण ७ वयोगटात घेण्यात आले. ५ ते ६, ६ ते ७, ७ ते ९, ९ ते ११, ११ ते १३, १३ ते १५ आणि त्यावरील वयोगटात हे शिबीर सकाळी ७ ते ८.३० आणि संध्याकाळी ५.३० ते ७ या वेळेत संपत्र झाले. गेल्या वर्षीपर्यंत प्रशिक्षणाची वेळ २ तास असायची. परंतु यंदा कडक उन्हाळा असल्यामुळे ही वेळ अर्ध्या तासाने कमी करण्यात आली.

१००पेक्षा जास्त प्रशिक्षकांची नियुक्ती या शिबिरासाठी करण्यात आली होती. त्या-त्या वयोगटातील प्रशिक्षक त्या-त्या शिबिरार्थींना प्रशिक्षण देतानाचे दृश्य बघण्यासारखे होते. या प्रशिक्षकांचा शिबिरापूर्वी निवासी प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला होता. त्या निवासी वर्गासाठी समर्थच्या सर्व आजी-माजी खेळाडूंना आवाहन करण्यात आले होते. त्या वर्गात ज्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले त्यांना वासंतिक प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक म्हणून सामावून घेण्यात आले. यंदा शिबिरप्रमुख म्हणून सुनील सवने यांच्याकडे जबाबदारी होती. ध्वजारोहणासाठी लागणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी माजी राष्ट्रीय हॉकीपटू प्रियांका शेट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. शिबिराचे शानदार सूत्रसंचालन डॉ. नीता ताटके यांनी केले. विशेष म्हणजे १९७५ साली जे पहिले शिबिर सुरू झाले होते त्यामध्ये शिबिरार्थी म्हणून नीता ताटके यांचा सहभाग होता. त्यांच्या मदतीला राष्ट्रीय अॅथलेट ख्याती धुरी होल्या. शिबिरार्थींना रोज पौष्टिक आहार खाऊ म्हणून देण्यात येत होता. त्यामध्ये फळे, उसळी, राजगिरा लाडू, चिक्की, पोहे अशा विविध पदार्थांचा समावेश असायचा. त्याचे वाटप करण्यासाठी पालकांची खूप मोठी मदत झाली. तसेच संगणकाचे कामकाज संस्थेतील ज्येष्ठ खेळाडूंनी बघितले. प्रवेशाची यंत्रणा कार्योपाध्यक्ष स्वप्निल राणे यांनी पाहिली. सर्व प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांना टी शर्ट भेट देण्यात आले. बीड येथील तीन मुलं, एक मुलगी, कसारा येथील १४ मुलं तसेच मुंबईच्या फॅमिली होममधील २१ मुलंदेखील शिबिरात सहभागी झाली होती.

एरवी दर महिन्याला समर्थमध्ये खो-खो, मल्लखांब, ज्युदो, कराटे, अॅथलेटिक्स, जिमनॅस्टिक्स, सूर्यनमस्कार, योगा, लाठी-काठी, एरियल सिल्क आदी विविध खेळांची शिबिरे होतच असतात. परंतु वासंतिक प्रशिक्षण शिबिराकडे स्थानिक विभागातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले असते. १९७५ साली झालेल्या पहिल्या शिबिरात २८ मुलामुलींचा सहभाग होता. शिबिराचे यंदा एकूण शुल्क रु. ५००/- होते. परंतु नियमित दरमहा व्यायामशाळेची फी अवघी ३०/- रुपये घेतली जाते. जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी खेळाकडे वळावे आणि नाव कमवावे हाच कमी फी घेण्यामागचा संस्थेचा उद्देश आहे. प्रत्येक दिवशी ४ पाहुणे शिबिराला सकाळ-संध्याकाळच्या सत्रात लागत होते. गेल्या ५० वर्षांच्या या शिबिराच्या इतिहासात विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या शिबिराला भेट देऊन संस्थेच्या या शानदार शिबिराचे भरभरुन कौतुक केले. याच शिबिरात ज्यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात त्यांना पुढे व्यायामशाळेत जूनमध्ये नियमित प्रवेश दिला जातो. परंतु यंदा संस्थेचे शताब्दी वर्ष असल्यामुळे शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांनाच जूनमध्ये व्यायामशाळेत नियमित प्रवेश दिला जाणार आहे. संस्थेचा अंध, मल्लखांब, धावपटू, सायकलिंगपटू असलेल्या अजय लालवानीने ४०० किलो कलिंगडांचा खाऊ शिबिराला दिला.

शिबिरात शिबिरार्थींना बेसिक खेळांची तोंडओळख करून दिली जाते. विशेष करून साधनविरहीत व्यायामप्रकार आपण कसे करु शकाल यावरदेखील भर दिला जातो, जेणेकरून शिबिरार्थी घरीदेखील विविध व्यायामप्रकार करुन स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतो. शिबिरात शिस्तीला महत्त्व दिले जाते. पालकांची कुठलीही ढवळाढवळ शिबिरात खपवून घेतली जात नाही. शिबिराच्या काळात सकाळ अथवा सायंकाळच्या सत्रात आपण शिवाजीपार्क परिसरात फिरलात तर बरेच पालक शिबिरार्थींना समर्थमध्ये घेऊन येतानाचे दृश्य आणि तो फुललेला परिसर बघण्यालायक असतो. याच शिबिरातून संस्थेला अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळाले. १ हजारपेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू या संस्थेतून पुढे आले. समर्थच्या २८ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, तिघांना दादोजी कोंडदेव पुरस्कार, तिघांना जीवनगौरव पुरस्कार, एकाला अर्जुन पुरस्कार आणि दोघांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या शिबिरात गार्गी यादव (४ वर्ष, ८ महिने), विभी पाटील, कोशा पद्मशाली (दोघे ४ वर्षे, ११ महिने), इधांत पटवर्धन (४ वर्ष, ९ महिने) आणि आरांश देशमुख (४ वर्ष, ६ महिने) हे सर्वात लहान शिबिरार्थी होते तर भूपाल शिंदे (वय ६८), दिगंबर डोके (वय ६१), हेमलता गुंडेवाडी (वय ६४), उमा वडवलकर (वय ५४) हे सर्वात वयस्कर शिबिरार्थी होते.

अनेक शिबिरांची जबाबदारी मशस्वीपणे पार पाडणाऱ्या आणि नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरविलेल्या मल्लखांब महर्षी उदय देशपांडे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या शरीराची निगा राखली पाहिजे. बाजारातून आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्याचा कसा वापर करायचा याचे माहितीपत्रक सोबत असते. परंतु आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळी आपल्यासोबत असे कुठलेच माहितीपत्रक नसते. त्यामुळेच नेमके आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे करायचे नाही तेच नेमके करतो. त्यामुळे अनेक आजारांना लहान वयातच आपण निमंत्रण देतो. अनमोल अशा शरीराकडे आपण लक्ष देत नाही. यावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, दंड, बैठका, सूर्यनमस्कार, योगा यांची साथ घेतली तर विविध आजारांपासून आणि औषधांपासून आपण नक्कीच दूर राहून उत्तम आयुष्य जगू शकतो. परंतु तशी मानसिकता आजच्या तरुण पिढीत तयार होणे गरजेचे आहे. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेने मल्लखांब या खेळाचा जागर उभारण्याचा संकल्प केला असून विविध शहरांमध्ये प्रात्यक्षिके, कार्यशाळा, प्रचारात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशपांडे सरांनी भारतात अथवा भारताबाहेर एकूण १०० ठिकाणी मल्लखांब प्रशिक्षणवर्ग सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. यंदाच्या शिबिराचे उद्घाटन भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांनी केले तर समारोप सोहळ्याला सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Continue reading

त्रिसा-गायत्रीनेच केली त्यातल्यात्यात चांगली कामगिरी‌!

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतीय खेळाडूंची कामगिरी काहीशी निराशाजनक झाल्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांची मात्र‌ निराशा झाली. भारताचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी‌ करु शकले नाहीत. महिला दुहेरीत...

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...
Skip to content