पंजाबी अभिनेता आणि २६ जानेवारीला राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील एक प्रमुख आरोपी दीप सिद्धूला मंगळवारी पहाटे दिल्ली पोलिसांच्या एसडब्ल्यूआर रेंजच्या विशेष पथकाने अटक केली. त्याची माहिती देणाऱ्याला एक लाख रूपयांचे बक्षिस पोलिसांनी जाहीर केले होते.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मार्चच्या आंदोलनात हिंसक जमावाने लाल किल्ल्याच्या परिसरात उच्छाद मांडला होता. त्यातल्या काही जणांनी लाल किल्यावर फडकत असलेला भारतीय तिरंगा उतरवून त्याजागी शेतकऱ्यांचा आंदोलनातला ध्वज लावला होता. दिल्ली पोलिसांची विविध पथके या हिंसाचार प्रकरणी तपास करत असून जवळपास ४० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेव्हापासून आरोपी दीप सिद्धू फरार होता.
या घटनेनंतर आरोपी दीप विविध समाजमाध्यमांच्या सहाय्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता. अलीकडेच त्याने स्वतःचा एक व्हिडिओ प्रसारित करत आपण रडत असल्याचे दाखवले होते. आपल्याला शेतकऱ्यांच्या संघटनांनी भरीस पाडले आणि नंतर विश्वासघातकी ठरवल्याचा दावा त्याने केला होता. आपण पंजाब आणि पंजाबी जनतेसाठी आवाज उठवला होता आणि आपल्यालाच यांनी विश्वासघातकी ठरवल्याचेही त्याने फरार असताना जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले होते.
१९८४ साली पंजाबच्या मुक्तसरमध्ये जन्मलेला दीप सिद्धू किंगफिशरच्या मॉडेल हंटमध्ये विजयी झाला होता. मुंबईत हेमंत त्रिवेदी, रोहित गांधी आदी डिझायनर्ससाठी त्याने मॉडलिंगही केले होते. मात्र, यात तो रमला नाही. कायद्याचे शिक्षण घेतलेला सिद्धू वकिली करू लागला. चित्रसृष्टीतल्या काही कंपन्यांसाठी त्याने कायदेशीर सल्लागार म्हणून कामही केले होते. २०१९ साली त्याने राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे गरूदासपूरचे खासदार सनी देओल यांच्या प्रचारात त्याने भाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्याने आणि लख्खा सदाना यांनी जमावाला चिथावल्याचा आरोप आहे.