Homeमाय व्हॉईसस्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत,...

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या ‘दरबारात’ आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.

सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना करून जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त केल्या. ज्या काळात गाईला देव मानून तिचे मलमूत्र प्राशन करणे हाच धर्म मानला जात होता, त्या काळात सावरकरांनी ठणकावून सांगितले की, ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे, तिचे पालन करा, उपयुक्ततेच्या आधारावर पूजन करा.’ सावरकर हे बुद्धीप्रामाण्यवाद जपण्यात कोणापेक्षाही पुढे होते. चमत्कार आणि अमानवीय शक्तींवर विश्वास ठेवणे म्हणजे बुद्धीचा पराभव आहे, असे ते मानत. सावरकर हे कमालीचे विज्ञाननिष्ठ होते. “जो धर्म विज्ञानाशी सुसंगत नाही, तो फेकून द्यावा,” असे उघडपणे सांगण्याचे धैर्य त्यांच्यात होते. बुवाबाजी, अघोरी प्रथा, थोतांड, मंत्र-तंत्र आणि छूमंतर यासारख्या अंधश्रद्धांना त्यांच्या विचारात तिळमात्रही थारा नव्हता.

सावरकरांच्या नावाने राजकारणाचे दुकान आणि ‘भोंदू’ निष्ठा

आज सावरकरांच्या नावाचा जयघोष करत सत्तेच्या खुर्च्या उबवणारे अनेक नेते प्रत्यक्षात मात्र अघोरी तांत्रिक प्रयोगांच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात तांत्रिकांच्या पाया पडणारे आणि दिवसा सावरकरांच्या प्रतिमेला हार घालणारे हे दुटप्पी चेहरे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. अघोरी प्रथा आणि भोंदूगिरीला राजाश्रय देणाऱ्या या नेत्यांना सावरकरांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. ज्या ‘बुवाबाजी’ला सावरकरांनी बुद्धीचा शत्रू म्हटले, त्याच थोतांडासमोर नतमस्तक होणारे हे नेते सावरकरांचे अनुयायी कसे असू शकतात?

कायद्याचा धाक आणि वैचारिक दिवाळखोरी

आज महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ (जादूटोणाविरोधी कायदा) अस्तित्त्वात आहे. हा कायदा केवळ सर्वसामान्यांसाठी आहे की काय? असा प्रश्न पडतो. जेव्हा सत्तेतील किंवा राजकारणातील बडी प्रस्थे अशा भोंदूंच्या तांत्रिक दरबारात ‘लीन’ होतात, तेव्हा हा कायदा कुठे जातो? सावरकरांनी ज्या बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला, त्याचा या नेत्यांना पूर्णतः विसर पडला आहे. कायद्याचे रक्षकच जर अघोरी कृत्यांचे भक्षक बनत असतील, तर अघोरी प्रकारांच्या नादी लागलेली ही नेतेमंडळी पुरोगामी महाराष्ट्राला अंधारयुगाकडे घेऊन जात आहेत, हे स्पष्ट आहे. तेव्हा कायद्याचे आणि विज्ञानाचेही धिंडवडे निघतात. सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत असतानाही विज्ञानाचा आणि तर्काचा आधार सोडला नाही. पण आजचे नेते नरबळीसदृश विकृत कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या भोंदूंकडे जात आहेत. सत्तेच्या अमरपट्ट्यासाठी नरबळी किंवा अघोरी कृत्यांचा आधार घेणारे हे ‘आधुनिक’ नेते सावरकरांच्या क्रांतीचा अपमान करत आहेत. हा सावरकरांच्या विचारधारेचा घोर अवमानच नाही, तर ती एका महान विचाराची हत्त्या आहे.

सावरकर

सावरकर नक्कीच माफ करणार नाहीत!

ज्यांना सावरकर कळलेच नाहीत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव घेऊ नये. सावरकरांचा विचार म्हणजे केवळ घोषणा नसून ते ‘विज्ञानाचे अस्त्र’ आहे, जे अंधश्रद्धेच्या काळोखाला चिरून टाकते. जे नेते भोंदू, तांत्रिकांच्या दरबारात सत्तेसाठी लाळ घोटतात आणि अघोरी प्रयोगांना बळी पडतात, त्यांना सावरकरांचा प्रखर विज्ञानाग्नी कधीच माफ करणार नाही. ज्यांना सावरकर कळलेच नाहीत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव घेऊ नये. सावरकरांच्या नावाने त्यांची केवळ आरती गाण्यापेक्षा, त्यांच्या विचारांमधील तर्क आणि विज्ञाननिष्ठ विचारधारा आपल्या आचरणात उतरवणे, हाच खरा सावरकरांचा बहुमान ठरेल. अन्यथा, सावरकरांचे नाव घेणे हे केवळ राजकीय ढोंग आणि वैचारिक दिवाळखोरीच!

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

शिवसेना कोणाची? न्यायालयातला युक्तिवाद जसाच्या तसा…

शिवसेना, हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूकचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या आव्हानावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील...

शिवसेना पक्ष व चिन्हाचा वादः संपूर्ण युक्तिवाद जसाच्या तसा..

शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाकडे पुन्हा जाणार की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार यांच्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल या विषयावर बराच वेळ युक्तिवाद झाला. या कामकाजाचे हे इतिवृत्त... सर्वोच्च न्यायालयाचे...

मोदी सरकारला बसला ‘जेन-झी’ वादळाचा तडाखा!

भारताच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत जे घडले, ते केवळ अनपेक्षितच नव्हे तर अभूतपूर्व आहे. सलग १२ वर्षे देशावर एकछत्री आणि भक्कमपणे सत्ता गाजवणाऱ्या, 'अजेय' आणि 'बलाढ्य' मानल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला एका मुद्यावर सपशेल माघार घ्यावी लागली. आणि...
Skip to content