Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरेंचा...

महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरेंचा आरोप निव्वळ हास्यास्पद!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात काल ज्या तोफा डागल्या त्यांचा रोख येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडेच होता. त्यांनी मुख्यतः भारतीय जनता पक्ष हाच रज्यातील आपला शत्रू क्रमांक एक आहे, हेही स्पष्ट केले. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांबरोबरची आपली आघाडी ही अधिक घट्ट मैत्रीत परावर्तित करण्याचीही पावले टाकायला सुरूवात केली आहे.

भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दुरावल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रतिमेवरच चिखलफेक करण्याचे काम करतो आहे. जसे एखादा मुखभंग झालेला प्रेमवीर आपल्या प्रेससीच्या चेहऱ्यावर एसिड फेकून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे भाजपाने महाराष्ट्रालाच विद्रूप करण्याची पावले टाकायला सुरुवात केली आहे. यातील एसिड टाकणे ही भाजपावरची ठाकरेंनी केलेली आजवरची सर्वात जळजळीत टीका होती असेही म्हणता येईल!

राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दलाचे (एनसीबी) मुंबईतील संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रवादी दररोजच लक्ष्य करत असताना आता शिवसेनेनही त्यांचीच री ओढण्याचे धोरण घेतलेले दिसते. शाहरूख खानच्या मुलाला पकडणे ही बॉलीवुडची व महाराष्ट्राची बदनामी कशी काय होते, हेही ठाकरेंना सांगावे लागेल. खरेतर अंमली पदार्थांचा सुळसुळाट महाराष्ट्रात कसा व किती झाला आहे अन् शाळांच्या कोपऱ्यांवरून एमडी ड्रगच्या गोळ्या पुरवणाऱ्या टोळ्या कशा वावरत असतात याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या सरकारमधील अनेक नेत्यांनीही त्या प्रकारांविषयी चिंता व्यक्त केली आहे. पण सुशांतसिंग राजपूतची आत्महत्त्या व त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक सिताऱ्यांच्या ड्रगप्रकरणी झालेल्या चौकशांच्या पार्श्वभूमीवर शाहरूखच्या मुलाला, आर्यनला, झालेली अटक उठून दिसते. इथे दररोज जणू नाक्या-नाक्यावर ड्रग सापडत आहेत असे वातावरण भाजपाने फूस लावलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत, असा आरोप ठाकरेंचा आहे.

ठाकरे

शोभा डेंसारख्या कला व सिने जमगतात सतत वावरणाऱ्या लेखिकाही प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्रांमधून फिल्मी पार्ट्यांमध्ये ड्रगचा वापर कसा सर्रास होतो हे वरचेवर लिहित असतात. त्यांचे सध्याचे म्हणणे इतकेच असते की, अशा प्रकरणात आर्यनसारख्या तरुणाला उगीच पकडले गेले आहे, इतर अनेक आर्यन समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. पण फिल्मी लोकांचे काहीही म्हणणे असले तरी ड्रगप्रकरणी पकडला गेलेला बड्या बापाचा पोरगा आणि रस्त्यावरचा एखादा सामान्य तरूण दोघांसाठीही कायदा समान पद्धतीनेच काम करेल. आणि समाजातील ड्रगची विकृती रोखण्याची पावले सरकारी यंत्रणा टाकत असताना सरकारच्या नेत्यांनी त्यांना पाठबळ द्यायचे की त्यांचा पाणउतारा करायचा, यंत्रणांचे खच्चीकरण करत राहायचे? हाही प्रश्न जनता ठाकरे सरकारलाच विचारणार आहे. पण ड्रग प्रसार व प्रचारात पकडले गेलेल्यांमुळे भाजपाचे महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान कसे काय सिद्ध होते हाही एक सवाल आहेच!

शरद पवारांनी त्या दिशेने हल्ले सुरू केल्यानंतर आता ठाकरे त्यांचीच री ओढत आहेत. पवारांनी दखवलेल्या दिशेनेच सरकार काम करत आहे हेही या दसरा मेळाव्यातून दिसून आले. शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्यातही सीबीआय, ईडी व आयकर विभागाने घातलेल्या धाडी तसेच एनसीबीची कार्यपद्धती यावर हल्ला चढवला होता. नेमकी तीच लाईन ठाकरे पुढे चालवत आहेत. केंद्र सरकारच्या यंत्रणा या ज्या धाडी घालत आहेत त्या केवळ भाजपाला इथले सरकार पाडता येत नाही म्हणूनच आहेत हा ठाकरेंचा रोख होता. त्यातच त्यांनी भाजपा महाराष्ट्राची प्रतिमा हनन करू पाहते आहे हा आणखी एक गंभीर आरोप केला आहे. हे सारेच आरोप अतिशय गंभीर आहेत व याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्यासही सुरूवातही लगेचच झालेली आहे. ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्राने आता बंगालकडून धडा घेऊन भाजपाला पराभूत केले पाहिजे हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. संघाचे हिंदुत्व व शिवसेनेच हिंदुत्व एकच आहे, पण संघाचे विद्यार्थी म्हणजेच भाजपाचे नेते हिंदुत्वाला नवा फोडा-फोडीचा पीळ देत आहेत. त्यांच्या फोडा व झोडा या नीतीच्या विरोधात महाराष्ट्रातील मराठी माणसाने सर्व हिंदुंची घट्ट आघाडी उभी केली पाहिजे असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

बंगालमध्ये भाजपाला बंगालची वाघीण ममता बॅनर्जी यांनी जी व जशी झुंज दिली, दिल्लीचे सारे मनसुबे उधळून लावले त्याच पद्धतीने महाराष्ट्राने भाजपाचे मनसुबे उधळून लावावेत अशीही अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या म्हणण्याचे वस्तुस्थितीच्या आधारे मूल्यमापन केले तर बंगालमधील राजकीय स्थिती व महाराष्ट्रातील राजकारण यात काहीही साम्य शोधता येणार नाही हेच दिसते. बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्याच्या बळावर, 2009पासून सलग दहा वर्षे सत्तेत होत्या. मावळत्या विधानसभेत भाजपाचे केवळ तीन आमदार होते. नव्याने स्थापन झालेल्या विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 82 इतके आहे. पण ममता व मोदी या दोन पक्षांच्या हत्तींच्या साठमारीत बंगालमध्ये काँग्रेस व कम्युनिस्ट या आधीच्या विधानसभेतील दोन्ही मोठ्या पक्षांची पार दैना उडाली हेही निकालांनी दाखवले आहे.

याउलट महाराष्ट्रात शिवसेना भाजपासमवेत 2014पासून सत्तेत सहभागीच होता व 2019च्या निवडणुकीला सामारे जातानाही ठाकरेंनी (मनात नसतानाही कदाचित, पण..) भाजपाबरोबर युती करूनच निवडणुका लढवल्या होत्या. निवडणुकीत भाजपापेक्षा अधिक जागांवर आपले शिवसेनेचे आमदार निवडून आले पाहिजेत व मुख्यमंत्रीपदावर आपल्याला दावा करता आला पाहिजे ही रणनीती ठाकरेंनी आखली होती हेही स्पष्ट होते. पण जवळपास 144 जागा लढवून शिवसेनेला केवळ 54 जागीच विजय मिळवता आला हे विसरून चालणार नाही. याउलट भाजपाने तितक्याच जागा लढवल्या आणि तब्बल 105 जागंवर विजय मिळवला. लढवलेल्या जागा व मिळालेल्या विजयाचे गुणोत्तर भाजपाच्या बाबतीत सत्तर टक्के जागांवर विजय असे येते तर शिवसेनेच्या बाबतीत जेमतेम 45 टक्के जागी विजय असे येते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबाबतीत तर हे गुणोत्तर अधिक वाईट आहे. तरीही राजकीय जुळणी व मांडामांड नव्याने करून हरलेल्या तीन पक्षांनी मिळून संख्याबळात भाजपावर मात केली व सरकार स्थापन केले.

ठाकरे

या सरकारला स्थापनेपासूनच ग्रहण लागले आहे. कोरोना व वादळे, अतिवृष्टी व पूर ही नैसर्गिक संकटे बाजूला ठेवली तरी दर चार-सहा महिन्यांनी या सरकारमधील एक-एक मंत्री घायाळ झालेला शिवसेनेला पाहावा लागला आहे. आधी संजय राठोड यांना एका मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर घरी जावे लागले. पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही तशाच पद्धतीने आरोप एका महिलेने केले. पण त्यांचे पद पवारांनी वाचवले. पुढच्या काळात अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, तो शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे. त्यांच्या घरी गेल्या दोन महिन्यांत सहा वेळा धाडी पडल्या आणि स्वतः देशमुख नेमके कुठे आहेत हे पवारही सांगू शकत नाहीत.

मुकेश अंबानीच्या घराजवळ बाँब पेरणारा, हकालपट्टी झालेला पोलीस अधिकारी वाझे व देशमुखांवरच राळ उडवणारे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या प्रकरणात सरकारची दररोज बदनामी होत असतानाच सेना नेते अनिल परब यांच्याविरोधात त्यांच्याच परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांनी वारेमाप पैसा गोळा करण्याचे आरोप लावले. त्यांच्या चौकशा सुरू आहेत. न्यायालयात जाऊन त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच एका इंजीनिअरला उचलून घरी आणले व बेदम मारहाण केली, अशी तक्रार त्या पीडित इंजिनिअरने पोलिसांत दिली होती. आव्हाड यांना तेव्हा काहीच झाले नाही. त्यांच्यासोबतच्या पाच-सहा लोकांना अटका झाल्या. आता प्रकरण उच्च न्ययालयात गेल्यानंतर आव्हाड यांनाही तांत्रिक अटक दाखवावी लागली आहे. सायंकाळी अटक व दहा हजारांच्या व्यक्तीगत जात-मुचलक्यावर तत्काळ जामीन असे आव्हाडांच्या बाबतीत झटपट अटकनाट्य रंगवले गेले.

अशाप्रकारे एका पाठोपाठ एक धक्कादायक प्रकरणे पुढे येत असताना यात भाजपा नेतृत्त्वाचा दोष होता असे म्हणता येईल का, की ठाकरे सरकारमधील आमदार व मंत्र्यांच्या कारभाराचीच लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दिवसांत अजित पवारांशी संबंधित कंपन्या, कारखाने व मुलाच्या कार्यालयांवरही धाडी पडल्या. आता दसऱ्याच्या मुहुर्तावरच त्या धाडीत काहीतरी गंभीर सापडल्याची माहिती आयकर विभागानेच दिली आहे. डी बी रिअल्टी व डायनामिक्स अशा दोन बिल्डरांवर गोवा, मुंबई, बारामती इत्यादी ठिकाणी तसेच संबंधित लोकांच्या अन्य ठिकाणी अशा एकूण सत्तर एक धाडी टाकल्या गेल्या. ऑक्टोबरच्या सुरूवातीपासून झालेल्या या धाडसत्रात महाराष्ट्रातील एका अतिशय महत्त्वपूर्ण कुटंबाचा संबंध असल्याची नोंद पत्रकात आहे. मात्र ते पवार कुटूंब आहे की नाही याचा कोणताही उल्लेख पत्रकात नाही. पण अधिकाऱ्यांनी डी बी व डायनामिक्स ही नाव तसेच अजितदादांचा संबंध उघड केल्याचे विविध बातम्यांतून म्हटले गेले आहे. हे प्रसिद्धीपत्रक आयकर विभागाने दिल्लीतून जारी केले आहे. हे प्रकरण पुढे आणखी वाढणार आहे याचेच हे सूतोवाच आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपा नेते आखत आहेत असे म्हणणे हास्यास्पदच ठरणार आहे.

Continue reading

राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते...

मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेने ट्रम्पचा इराणवरील हल्ला!

“युद्ध नको, मज बुद्ध हवा” असे म्हणणाऱ्या भारताला युद्धाच्या झळा जाणवत आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांच्या हट्टाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप बळी पडल्यामुळे सुरु झालेले इराणविरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि कट्टर इस्रायल, हे युद्ध आता तिसऱ्या सप्ताहात पोहोचले आहे. त्याचा...

नातवाबरोबर ‘खेळण्या’साठी थोरले पवार राज्यसभेत?

दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च 16ला निवडणुका होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जागाही आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, 5 मार्च...
Skip to content