गेल्या महिन्यात भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो खंजीर उकरून काढला. त्यांनी तो उल्लेख केला, कारण त्यांना शिवसेनेला टोकायचे होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यामुळेच देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार २०१९च्या नोव्हेंबरमध्ये सत्तेवर येऊ शकले नाही, अशी मांडणी करत आता भाजपाने शिवसेनेविरोधातील प्रचाराला नवी धार दिली आहे. पण शिवसेनेमधीलच एखादा नेता त्याच चालीवर विधान करेल असे कुणाला कधी वाटले नव्हते, ते सरत्या सप्ताहात घडून गेले.
अनंत गिते हे रायगड-रत्नागिरी मतदारसंघामधून पाच वेळा लोकसभेवर गेले आहेत. सहाव्या वेळी सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीसाठी त्यांना घरी पाठवले. अनंत गिते हे शिवेसनेचे जुनेजाणते नेतेही आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनात घडले, वाढले आहेत. १९९०च्या आगेमागे मुंबई महापालिकेमधून अनेक सैनिकांना ठाकरेंनी कोकणात निवडणुका लढवण्यासाठी पाठवले होते. नारायण राणे सिंधुदुर्गात तेव्हाच गेले होते. रामदास कदम, शाम सावंत, असे कितीतरी नगरसेवक कोकणात निवडणुका लढण्यासाठी उतरले होते. गिते तेव्हा रत्नागिरीमधून लोकसभा लढण्यासाठी गेले व वारंवार संसदेत जाऊ शकले. जेव्हा वाजपेयींनी सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला केंद्रीय मंत्रीपद देऊ केले, तेव्हा आधी मनोहर जोशी व कालांतराने जोशी लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर गितेंना बाळासाहेबांनी केंद्रीय राज्यमंत्री व मंत्रीपदाची संधी दिली.
मागील, २०१९च्या निवडणुकीत गिते पराभूत झाले तेव्हा अरविंद सावंताना केंद्रीय मंत्रीपदाची संधी लाभली. रायगडमधील तीन आणि रत्नागिरीतील तीन मतदारसंघ मिळून जो रायगड-रत्नागिरी असा लोकसभेचा मतदारसंघ तयार झाला, त्यात गितेंनाच वारंवार लोकसभेत जाण्याची संधी मिळत राहिली. २०१४मध्ये राष्ट्रवादीचे कोकणातील महत्त्वाचे नेते सुनील तटकरेंना शरद पवारांनी लोकसभा लढण्यासाठी पाठवले. तिथे तटकरेंचा पराभव गितेंनी केला. पण तटकरे हे मतदारसंघात काम करत राहिले. त्यांना लोकसभा हरल्यानंतरही विधान परिषदेत पवारांनी संधी दिली. तटकरेंनी २०१९पर्यंतची पाच वर्षे मतदारसंघाची बांधणी पक्की केली आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा गितेंना टक्कर देत, यावेळी विजय संपादन केला. सहाजिकच गितेंचे व तटकरेंचे राजकीय वैर असल्यास नवल नाही.
सरत्या सप्ताहात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे गितेंनी शिवसेना मेळाव्यात भाषण केले. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसमधून शिवसेनेत त्यावेळी प्रवेश केला होता. गिते असे सांगत होते की, राज्यात आपले सरकार आहे, पण आपल्याला राज्याच्या राजकारणात काय होते हे न पाहता आपल्या गावात पक्षसंघटन मजबूत करायचे आहे. मुख्यमंत्री आपले आहेत, बाकी आघाडी सरकारमधले पक्ष आपले नाहीत. काँग्रेसचा विचार शिवसेनेचा असू शकत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेली आहे. अशा पक्षाचे नेते शरद पवार हे आपले, शिवसैनिकांचे गुरू, होऊ शकत नाही. आपले नेते एकच, बाळासाहेब ठाकरे..
आता अनंत गितेंचे हे भाषण त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने योग्यच आहे. ते शिवसेनेची भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस वा तटकरेंवर घसरले असते, तरी ते रायगडच्या व त्यांच्या मतदारसंघातील राजकीय स्थितीच्या दृष्टीने पाहिले तरी योग्य ठरले असते. पण त्यांनी कारण नसताना राष्ट्रवादीला ठरवून डिवचल्याप्रमाणे शरद पवारांवर आघात केला. तिथे गडबड झाली. यात गितेंना संजय राऊतांच्या विरोधातील मळमळही व्यक्त करायची होती का, हाही सवाल आहेच. कारण, राऊत शरद पवारांचे सतत जे गुणगान करतात ते अनेक सैनिकांना नकोसेही वाटत असते. शिवसेनेचे भवितव्य पवारांच्या हातात सोपवल्यावर पक्षाचे नुकसान होईल असे त्यांना प्रामाणिकपणाने वाटतच असते. त्याचदृष्टीने भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, सर्वसामान्य शिवसैनिकांचे मनोगत खऱ्या अर्थाने जाणून घेतले तर तेही गितेंसारखेच बोलतील!!

तो जुना, सत्तरच्या दशकातील कथित खंजीर पुन्हा एकदा शरद पवरांच्या मागे हात धुऊन लागला आहे. गेली चार दशके ते याच गोष्टीचा सामना पुन्हा पुन्हा करत राहिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये १९७८मध्ये शरद पवार कृषीमंत्री होते आणि यशवंतराव चव्हाणांच्या जुन्या सहकाऱ्यांना त्या सरकारमधील उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडेंचे वागणे, बोलणे, तिरपुडेंचा गृहमंत्री म्हणून असणारा तोरा सारेच खुपत होते, खटकत होते. त्यांच्या विरोधातील सारा असंतोष धुमसत होता आणि एकेदिवशी त्याचा राजकीय स्फोट झाला. दादांचे ते एस काँग्रेस आणि काँग्रेस आयचे संयुक्त सरकार, विधिमंडळ अधिवेशन सुरु असतानाच कोसळले. वसंतदादांच्या कानावर असंतोषाची चाहूल नक्कीच पोहोचत होती. पण शरद असे काही करणार नाही असे ते सहकाऱ्यांना सांगत असत. पण राजकीय दबावात पवारांच्या नेतृत्त्वाखाली जनतादलाचे व काँग्रेस एसचे संयुक्त सरकार तेव्हा स्थापन झाले आणि दादांनी ते ऐतिहासिक उद्गार काढले की, शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला.
खरे तर दादांचे व पवारांचे संबंध ती एक-दोन वर्षे सोडली तर पुढेही चांगलेच राहिले होते. पवारांना राजीव गांधींनी मुख्यमंत्रीपदी बसवले तेव्हा ते दादांचा आशीर्वाद घेऊनच सत्तारूढ झाले होते. पण तरीही जनमानसात तो खंजीर सातत्याने पवारांच्या नावाबरोबर तरळत राहिला. आज संसदीय कारकीर्दीची पन्नास वर्षे ओलांडल्यानंतरही, पवारसाहेबांच्या सर्व कार्यकर्तृत्त्वाच्या बरोबरीने, त्या खंजीराचा उल्लेख सातत्याने कुणी ना कुणी, करत राहतेच.
एरवी सारेच पक्षीय नेते आपापल्या पक्षाचेच गुणगान करत असतात. कार्यकर्त्यांना जोष आणण्यासाठी आघाडी आणि युती असतानाही स्वबळाची भाषा बोललीच जाते. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपला पक्ष पुन्हा एकदा देशात सत्तेत येणार असेच बोलले पाहिजे, तरच त्यांच्या कार्यकर्त्यांना ते आवडेल, रुचेल. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणूनच शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही शत प्रतिशत भाजपा, अशा घोषणा देतच होते. आणि अलिकडेच शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी पुण्यात सैनिकांशी बोलताना, अशाच प्रकारची भाषा केली होती. आपले मुख्यमंत्री आहेत म्हणजे सत्ता आपलीच आहे. बाकीच्या पक्षांची चिंता कऱण्याचे तुम्हाला कारण नाही. कारण हे सरकार ठाकरे सरकार आहे. ज्याचा मुख्यमंत्री त्याचीच सत्ता असे उद्गार राऊतांनी काढलेच होते.
त्या-त्या पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना नेते हे अशाच पद्धतीने बोलत आले आहेत. पण तसे बोलताना सरकारमध्ये आपण तीन पक्ष एकत्र बसलो आहोत तिथल्या मित्रपक्षांच्या नेत्यांविषयी सावधतेनेच बोलणे अपेक्षित असते. ती मर्यादा गितेंनी ओलांडली. लगेचच सुनील तटकरे मैदानात उतरले. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गितेंचा उल्लेख वैफल्यग्रस्त नेते असा करून टाकला. गितेंना त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही असेही तटकरेंनी सांगून टाकले.
गिते, तटकरे यांचे भांडण हे आणखी गडद झाले आहे ते कुणबी समजाच्या मतांसाठी. रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत कुणबी समाज मोठा आहे. त्यांची मते तटकरे व गितेंसाठी महत्त्वाची आहेत. ज्या दिवशी गिते पवारांच्या विरोधात तोफा डागत होते तेव्हा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि सुनील तटकरे मुलुंडमध्ये होणाऱ्या कुणबी समाजोन्नती मंडळाच्या मोठ्या वास्तुसाठी निधी देण्याचे काम करत होते. गितेंच्या भाषणातील कडवटपणाला कुणबी मतांच्या बेगमीसाठी चाललेल्या राष्ट्रवादीच्या खटपटीमुळेही धार चढली असावी.
सत्तेतील शिवसेना आणि सत्तेतली काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील चढाओढही लपलेली नाही. दोन्ही काँग्रेसचे हुषार नेते पुढच्या राजकीय रणनीतीचे भान ठेवूनच सत्तेतील सहभाग सुरू ठेवत आहेत. त्यांच्या विद्यमान आमदारांबरोबरच पराभूत आमदारांच्याही बैठका दोन्ही पक्षांचे नेते वारंवार घेत असतात. खरा धोका या दोघांच्या पक्षवाढीमुळे शिवसेनेलाच होणार आहे. त्याचे भान कदाचित गितेंसारखे नेते दाखवत असताना शिवसेनेचे शीर्षस्थ नेते का दाखवत नसावेत असा प्रश्न सैनिकांना पडत आहे.

